UPSC: स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनी इस्लामच्या भारतातील प्रवेशावर प्रकाश टाकला आहे.

इस्लामाचा उगम ७ व्या शतकात अरबस्तानमध्ये झाला तर त्याचा विस्तार पश्चिमेकडे भूमध्य सागराच्या दिशेने आणि पूर्वेकडे पर्शियापर्यंत झाला. ८ व्या शतकापर्यंत इस्लामने स्पेनपासून सिंधपर्यंत आपले पाय रोवले होते. परंतु, तो भारतात कसा पोहोचला? कदाचित राजकीय दृष्टिकोनातून या प्रश्नाचे उत्तर हिंसा आणि आक्रमण असे आहे. परंतु, शैक्षणिक दृष्टिकोन मात्र या प्रश्नाचे उत्तर बरेच व्यापक देतो. इस्लाम भारतात व्यापारी मार्ग, सैनिकांबरोबर, धर्मप्रसाराच्या माध्यमातून, तुलनेने कमी ज्ञात असलेल्या कृषी मार्गाद्वारे आणि स्थलांतरितांच्या माध्यमातून पोहोचला.

भारतामध्ये इस्लामच्या प्रारंभीच्या खुणा

केरळमधील चेरामन जुमा मशीद, तामिळनाडूमधील पलैया जुमा पळी आणि गुजरातमधील घोघा येथील बडवाडा मशीद (जिचा किबला जेरुसलेमकडे आहे) यांची निर्मिती इसवी सनाच्या ७ व्या शतकात झाल्याचे मानले जाते. या मशिदी अरब सागरी व्यापारी आणि नाविकांनी स्थानिक हिंदू राजांच्या पाठिंब्याने बांधल्या. त्यामुळे इस्लामिक परंपरा भारताच्या किनाऱ्यांवर प्रथम आणणारे हे व्यापारी आणि नाविकच होते. १३ व्या शतकातील एका पर्शियन ग्रंथात ७ व्या आणि ८ व्या शतकातील अरबांच्या सिंधवरील आक्रमणांची कथा सांगितली आहे.

या आक्रमणांमध्ये त्यांनी मुंबईजवळील ठाण्यासारख्या ठिकाणी स्वारी करून भूभाग जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिहारांसारख्या तत्कालीन राजांनी त्यांना यशस्वीरीत्या परतवून लावले. इस्लाम व्यापारी मार्गांद्वारे पसरला हे स्पष्टच आहे. परंतु, तो ७ व्या शतकात लष्करी मोहिमांमार्फतही उपखंडात पोहोचला आणि सिंध प्रदेशात आला. १० व्या शतकाच्या सुमारास मध्य आशियातील महमूद गजनवीसारख्या लुटारूंनी हिंदू कुश पर्वत ओलांडून उत्तर भारतातील मंदिरे संपत्तीच्या लालसेने लुटली. १२ व्या शतकानंतर त्यांनी भारतात वसाहती स्थापन करून येथील समृद्ध कृषिसंपत्तीचा उपभोग घेण्यास सुरुवात केली. हे आक्रमणकर्ते अरब नव्हते, तर मध्य आशियातील तुर्क होते. १५ व्या शतकानंतर तुर्क आणि अफगाण शासकांची सत्ता मुघलांनी झाकोळून टाकली.

सुलतान आणि सूफी

या सुलतानांनी भारतात नवीन पर्शियन दरबारी संस्कृती आणली आणि जुन्या संस्कृतपरंपरांचा प्रभाव कमी केला. त्यांच्या युद्धघोड्यांमुळे त्यांची सैन्यशक्ती अत्यंत प्रभावी होती. याच कारणामुळे राजस्थानमध्ये अनेक अश्वारूढ लोकदैवतं आढळतात. ही दैवतं मुख्यतः ‘पीर’ आणि ‘वीर’ म्हणून ओळखली जातात आणि त्यांची हिंदू तसेच मुस्लिम दोघेही पूजा करतात. दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये वावर आणि रवुत्तनसारखे मुस्लिम अश्वारूढ योद्धे हिंदू देव-देवतांचे रक्षक म्हणून दर्शवले जातात. हे त्या काळातील धार्मिक समन्वयाचे प्रतीक आहे.

दक्षिणेतील श्रीरंगमसारख्या विष्णू मंदिरांमध्ये बिबी-नाचियारचा उल्लेख आहे. ही मुस्लिम राजकन्या आणि भक्त होती आणि तिने त्या देवतेशी विवाह केला. हे सांस्कृतिक एकत्रिकरणाचे स्पष्ट उदाहरण आहे. १२ व्या शतकानंतर सूफी भारतात आले. हे मध्य आशियातील इस्लामिक संत होते. विशेषतः मंगोल आक्रमणानंतर ते अधिक प्रसिद्ध झाले. यामागील मुख्य कारण म्हणजे त्या आक्रमणाने जुने अरबी साम्राज्य उद्ध्वस्त झाले होते. हे संत व्यापार मार्गांद्वारे संपूर्ण भारतभर फिरले. त्यापैकी काही सैनिक किंवा गाझी होते, तर काही उपदेशक होते. त्यांनी लोकांना भावनिक आधार दिला, कायदेशीर सेवा दिल्या, तसेच वैद्यकीय आणि कृषी ज्ञान प्रदान केले. त्यामुळे ते ज्या भागात स्थायिक झाले ते तिथेच लोकप्रिय झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दरगाह किंवा मकबरे अध्यात्मिक केंद्रांमध्ये परिवर्तित झाले. जिथे स्थानिक लोक त्यांच्या आत्म्यांच्या कृपेची- आशिर्वादासाठी जाऊ लागले. हे मुस्लिम पीर हिंदू वीर यांच्यात मिसळले आणि लोकसंस्कृतीचा भाग झाले.

इस्लामचा कृषी मार्गाने प्रसार

बर्‍याचदा दुर्लक्षित केले जाणारे वास्तव म्हणजे इस्लाम कृषी नवसर्जनाच्या माध्यमातूनही पसरला. १० व्या शतकानंतर भारतात आलेल्या सूफींनी पर्शिया आणि स्पेनमध्ये विकसित झालेल्या नवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून दिली, यात भूमिगत जलवाहिन्या आणि पाणी चालवणाऱ्या चक्रांचा समावेश होता. त्यामुळे तुलनेने कोरड्या भागात शेती करणे शक्य झाले. हे तंत्रज्ञान सिंध आणि पंजाबमध्ये आणले गेले, त्यामुळे नवीन सुपीक जमिनी तयार झाल्या. इथे स्थानिक भूमिहीन शेतकरी, विशेषतः जाट जमात हा जमीनदार झाला आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू लागला.

याच प्रदेशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या सर्वाधिक होती आणि नंतर हे भाग भारतापासून पाकिस्तानच्या रूपात वेगळे झाले. मुघल काळात विशेषतः पूर्व भारतात गंगा नदीच्या प्रवाहातील बदलामुळे नवीन कृषी जमिनी अस्तित्त्वात आल्या. मुघल सत्तेने आपल्या महसूलात वाढ करण्यासाठी या प्रदेशांमध्ये शेतीला प्रोत्साहन दिले. मुख्य प्रवाहाबाहेर असलेल्या सीमान्त समुदायांनी या संधीचा फायदा घेतला. दिल्लीमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या अनेक सूफी विद्वानांच्या मदतीने त्यांनी या भागात वसाहती उभारल्या. त्यामुळे पुढे बांगलादेश निर्माण झाला. येथे पंच पीर (पाच मुस्लिम संत) यांची पूजा केली जाते. त्यांचा संबंध पांडवांच्या पाच भावांबरोबरही जोडला जातो. याशिवाय, सुंदरबनमध्ये बोन बीबी सारख्या स्थानिक कृषी मुस्लिम संतांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या भागात अरबी-पर्शियन वास्तुशैलीपेक्षा वेगळ्या बंगाली झोपड्यांसारख्या दिसणाऱ्या टेराकोटा मशिदी आढळतात.

स्थलांतरित मुस्लिम उच्चवर्ग

त्यानंतर मध्य आशिया आणि पर्शियामधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. विशेषतः १३ व्या शतकातील मंगोल आक्रमणानंतर आणि दिल्ली तसेच बहमनी सुलतानशाहीमध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या संधींमुळे हे स्थलांतर झाले. काही स्थलांतरित स्वतःच्या पत्नींसह आले, तर काहींनी स्थानिक महिलांशी विवाह केला. त्यापैकी काही नोकर (पैसे देऊन ठेवलेले सैनिक) आणि चाकर (पैसे देऊन नेमलेले मुनीम) होते. त्यांच्या माध्यमातून इस्लामही भारतात आणला गेला. हे उच्चवर्गीय दरबारी होते. ते पर्शियन भाषा बोलत असत. त्यांनी दक्षिण भारतात पर्शियन शैलीतील मशिदी उभारल्या. बीदरमधील गावान मदरसा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

स्थानिक भारतीय मुस्लिम उच्चवर्गाला स्थलांतरित मुस्लिम उच्चवर्गाविषयी असंतोष होता. या उच्चवर्गीय मुस्लिमांनी तथाकथित ‘निम्न’ जातींमधून इस्लाम स्वीकारलेल्या लोकांकडे तुच्छतेने पाहिले. त्यामुळे भारतातील इस्लामवर जातिव्यवस्थेची छाया पडली. सय्यद (प्रेषित मुहम्मद यांचे वंशज) यांना उच्च जातीचे समजले गेले, तर पसमांदा (पर्शियन शब्द: मुस्लिम समाजातील वंचित वर्गांसाठी वापरण्यात येतो) यांना निम्न श्रेणीत स्थान देण्यात आले. त्यांच्या मध्ये असलेले लोक स्वतःला अरब व्यापारी किंवा पर्शियन सरदारांच्या वंशजांप्रमाणे मानत. म्हणूनच इस्लामचा भारतात प्रवेश हा एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती. सात शतकांहून अधिक काळ चाललेली ही कहाणी व्यापार, युद्ध, धर्मप्रसारक, कृषीविद आणि स्थलांतरित यांच्याशी जोडलेली आहे.

विषयाशी संबंधित प्रश्न:

  • इस्लाम भारतात कोणकोणत्या मार्गांनी पोहोचला?
  • व्यापारी मार्गांनी भारतभर सूफी विचारसरणीच्या प्रसारास कशा प्रकारे मदत केली?
  • सूफींनी कोणती कृषी तंत्रज्ञाने आणली आणि त्याचा सिंध आणि पंजाबमधील शेतीवर कसा प्रभाव पडला?
  • बंगालमधील टेराकोटा मशिदी पारंपरिक अरबी-पर्शियन वास्तुशैलीपेक्षा कशा वेगळ्या आहेत?
  • भारतामध्ये इस्लामवर जातिव्यवस्थेची छाया कशी पडली?