संदीप नलावडे
रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रात तणाव निर्माण होऊन चीन आणि अमेरिका या जगातील बडय़ा राष्ट्रांमध्ये वाद निर्माण झाला आहे. ‘तैवान’ हा या दोन्ही राष्ट्रांतील सर्वात स्फोटक मुद्दा बनला आहे.
चीन-अमेरिका तणावाचे कारण काय?
चीनची आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांविरोधात आक्रमक आणि विस्तारवादी भूमिका असताना तैवान या भूमिकेला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. स्वतंत्र तैवानला अमेरिकेचा उघड पािठबा आहे. तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा चीनचा दावा असून त्यासाठी लष्करी दबाव टाकला जात आहे. चीनच्या या वृत्तीचा अमेरिकेसह तैवाननेही निषेध केला असून स्वत:च्या बचावासाठी प्रसंगी लष्करी संघर्ष करू, असा तैवानने इशारा दिला आहे. त्यासाठी तैवानला आम्ही सर्वतोपरी मदत करू, तैवानच्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
दक्षिण चीन समुद्रात काय घडते आहे?
दक्षिण चीन समुद्रात काही दिवसांपूर्वी एक चिनी युद्धनौका तैवान सामुद्रधुनीत अमेरिकी विनाशिकेच्या जवळ १५० यार्डाच्या आत आली. अमेरिकेने तिला मागे जाण्यास भाग पाडले. गेल्या महिनाभरात कुरघोडी करण्याची ही चीनची दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस चिनी लढाऊ विमानाने दक्षिण चीन समुद्रावर अमेरिकेच्या लष्करी विमानासमोर उड्डाण केले होते आणि याबाबत अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. युद्धनौकेच्या चकमकीनंतर अमेरिका प्रशासनाने चीनवर वाढत्या आक्रमकतेचा आरोप केला आहे, तर चीननेही आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात अशा अमेरिकन लष्करी हालचाली जाणूनबुजून धोका निर्माण करत आहेत, असा आरोप करून अमेरिकेची दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
दोन्ही राष्ट्रांचे आरोप काय आहेत?
अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते चीनने इतिहासातील सर्वात मोठी शांतताकालीन लष्करी उभारणी केली आहे. आपली वाढती लष्करी क्षमता आणि आर्थिक दबदबा वापरून चीन आशियातील अमेरिकी लष्करी वर्चस्व मागे ढकलत आहे. अमेरिका स्वत:कडे शांतता व स्थिरतेची शक्ती म्हणून पाहत असला तरी असा हस्तक्षेप करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही, असा चीनचा दावा आहे. तणावाचे आणखी एक कारण म्हणजे जलवाहतुकीचे स्वातंत्र्य. अमेरिका व तिचे सहयोगी देश तैवान सामुद्रधुनी आणि दक्षिण चीन समुद्रातून नौदल जहाजे नेतात. त्यावर असलेल्या अमेरिकी जहाजांच्या गस्तीस चीनचा विरोध आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की सर्व देशांच्या आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी ही गस्त घातली जाते. चीनने तैवान सामुद्रधुनीत आणि दक्षिण चीन समुद्रातील बेटांजवळ अमेरिकी जहाजे आणि विमाने थांबविल्याबाबत तक्रार केली आहे. या सागरी भागात चीनचे नियंत्रण असताना अमेरिकेने अशा प्रकारे कुरघोडी करणे योग्य नाही, असे चीनचे म्हणणे आहे. चिनी लष्करी कमांडर्सना अमेरिकी लष्करी जहाजे व विमानांविरोधात हल्ले करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्धाची शक्यता किती?
तैवान आणि दक्षिण चीन समुद्रातील अमेरिकी हस्तक्षेपामुळे चीन आक्रमक झाला आहे. चीन आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक युद्धाची तयारी करत असून या युद्धाला ‘कूटनीती युद्ध’ म्हटले जात आहे. हे युद्ध पारंपरिक शस्त्रास्त्रांनी नाही तर ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या साहाय्याने लढले जाईल, असे सांगितले जाते. अशा प्रकारचे युद्ध तैवान आणि अमेरिका या देशांविरोधात करण्याची योजना चीनने आखली आहे. तैवानबाबतच्या अमेरिका व चीन यांच्यातील मतभिन्नता या युद्धास कारण ठरू शकते. अमेरिका दक्षिण चीन समुद्रात हस्तक्षेप करत असल्याने चीनने त्यांना तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष अमेरिकेच्या त्या कृतींना प्रक्षोभक मानतो आणि अमेरिकेच्या लष्करी वर्चस्वाचा पाठपुरावा हेच या प्रदेशातील धोक्यांचे खरे कारण आहे, असे चीनचे अधिकारी सांगतात.
दोन्ही राष्ट्रांमध्ये संवादाचा अभाव आहे का?
चीन व अमेरिका या राष्ट्रांमध्ये युद्ध होऊ नये यासाठी दोन्ही बाजूने संवाद होणे आवश्यक आहे. मात्र उभय राष्ट्रांच्या प्रतिनिधींमध्ये संवादाचा अभाव आहे. उभय राष्ट्रांमध्ये लष्करी भडका उडण्याचा धोका कमी करण्यासाठी अमेरिकी लष्कराने चीनच्या ‘पीपल्स लिब्रेशन आर्मी’शी उच्च व निम्न अशा दोन्ही स्तरांवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी दबावही आणला जात आहे, मात्र त्यास चीनकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. चीनचे नेते लष्करी संपर्क प्रस्थापित करण्यास टाळाटाळ करत असून राजनैतिक तणावामुळे त्यांनी संपर्क साधने त्वरित बंदी केली आहेत, असा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिका प्रतिनिधीगृहाच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी गेल्या उन्हाळय़ात तैवानला भेट दिल्यानंतर चीनने पेंटागॉनबरोबरचे अनेक उच्चस्तरीय लष्करी संवाद स्थगित केले. अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात चिनी गुप्तहेर बलून पाडल्यानंतर दोन्ही देशांच्या संरक्षण प्रमुखांमध्ये दूरध्वनी संवाद करण्याची अमेरिकेची विनंती नाकारली गेली होती.
sandeep.nalawade@expressindia.com