अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि डेमोक्रॅटिक पक्षातर्फे कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. कमला हॅरिस यांना पक्षांतर्गत बहुमत मिळवण्यात यश आले असले तरीही अद्याप अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा डेमोक्रॅटिक पक्षाने केलेली नाही. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आव्हान म्हणून त्याच उभ्या राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे. सध्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कुणाला उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा सुरू झाली आहे. संभाव्य उमेदवारांची नावेही सध्या बरीच चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांना सर्वाधिक पसंती असल्याने आता उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी पुरुष उमेदवाराची निवड करून संतुलन साधले जाईल, असेही म्हटले जात आहे. पाहूयात, कोणत्या उमेदवारांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.
हेही वाचा : Kathmandu Plane Crash: नेपाळमध्ये विमान अपघातांचे प्रमाण सर्वाधिक का आहे?
जोश शापिरो
५१ वर्षीय शापिरो यांची २०२२ मध्ये पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर म्हणून निवड झाली आहे. त्यापूर्वी ते २०१७ पासून राज्याचे ॲटर्नी जनरल होते. त्यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये चार वेळा; तर माँटगोमेरी काउंटीचे आयुक्त म्हणून दोन वेळा कामकाज पाहिले आहे. डेमोक्रॅट्सच्या विजयासाठी पेनसिल्व्हेनिया हे राज्य फारच महत्त्वपूर्ण आहे. २०२२ च्या विजयानंतर डेमोक्रॅट्समध्ये शापिरो यांचीही लोकप्रियता वाढली आहे. शापिरो यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डग मास्ट्रियानो यांच्याविरुद्ध ५६ टक्के मते मिळवून ही निवडणूक जिंकली होती.
मार्क केली
ॲरिझोनाचे सिनेटर मार्क केली हे २०११ साली अधिक चर्चेत आले. त्यांची पत्नी गॅबी गिफर्ड्स या एका जीवघेण्या अयशस्वी हल्ल्यातून वाचल्या होत्या. त्यानंतर केलींबाबत अधिकच चर्चा झाली. केली सध्या ६० वर्षांचे आहेत. ते नौदलाचे अनुभवी अधिकारी तसेच माजी अंतराळवीरही आहेत. पत्नीवर अयशस्वी हल्ला झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेत बंदुकीच्या वापरावर कडक नियंत्रण प्राप्त व्हावे, यासाठी मोहीम सुरू केली. २०२० मध्ये त्यांनी सिनेटची जागा जिंकली.
त्यांनी ॲरिझोनामध्ये एक संयमी नेता म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांनी उपनगरातील श्वेतवर्णीय महिला आणि तरुण लॅटिनो मतदारांना आपल्या पाठिशी उभे करण्यात यश मिळवले आहे. २०२० मध्ये बायडेन यांना ॲरिझोना जिंकण्यात मदत करण्यासाठी याच मतदारांच्या गटाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा : कावडयात्रा मार्गात दुकानदारांनी नेमप्लेट लावण्याच्या आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालय नक्की काय म्हणाले?
अँडी बेशियर
४६ वर्षीय अँडी बेशियर हे केंटकीचे दोन-टर्मचे डेमोक्रॅटिक गव्हर्नर आहेत. केंटकी हा खरे तर रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वी केंटकीमध्ये ३० टक्के मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, गेल्या वर्षी डेमोक्रॅटिक बेशियर यांनी ही निवडणूक सहज जिंकली.
जे. बी. प्रित्झकर
५९ वर्षीय प्रित्झकर २०१९ पासून इलिनॉयचे गव्हर्नर आहेत. प्रित्झकर हे स्वत: अब्जाधीश आहेत. ते हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेला सहज आर्थिक मदत करू शकतात. ट्रम्प यांना अलीकडे खूप आर्थिक मदत मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रित्झकर यांची उमेदवारी फायद्याची ठरू शकते. प्रित्झकर कुटुंबीयांकडे ‘हयात’ हॉटेल चेनची मालकी आहे. इलिनॉयचे गव्हर्नर असताना आपल्या कार्यकाळात गर्भपातासंदर्भातील महिलांना उपयोगी पडतील अशा तरतुदी त्यांनी अमलात आणल्या.
रॉय कूपर
रॉय कूपर हे उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर आहेत. ओबामा यांनी २००८ मध्ये नॉर्थ कॅरोलिना जिंकले होते. रॉय कूपर हे मातब्बर उमेदवार असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरचे आव्हान वाढू शकते.