एका नामांकित कंपनीने आपल्या २०० कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकले आहेत. त्यामध्ये भारतीय अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे आणि प्रामुख्याने यात तेलुगू कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनुदान कार्यक्रमाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ‘फॅनी मे’ कंपनीने भारतीय अमेरिकन कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई केली आहे. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, काही कामगारांनी तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (टीएएनए)सारख्या गैर-नफा गटांशी हातमिळवणी केली आणि अनुदान योजनेद्वारे कंपनीच्या पैशाचा गैरवापर केला.

त्यामुळेच कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अनुदान कार्यक्रमात कंपनीद्वारे धर्मादाय कामांसाठी कर्मचाऱ्यांना देणगी स्वरूपात निधी दिला जातो. हा निधी पात्र असलेल्या कर्मचारी व संस्थांना देण्यात येतो. हा निधी कर्मचाऱ्यांच्या योगदानाला प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी असतो. निधीच्या गैरवापरासंबंधित हे प्रकरण काय आहे? कंपनीने २०० कर्मचाऱ्यांना कामावरून का काढले? जाणून घेऊ.

अनुदान कार्यक्रमाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ‘फॅनी मे’ कंपनीने भारतीय अमेरिकन कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई केली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

नेमके प्रकरण काय?

फॅनी मे ही कंपनी अधिकृतपणे फेडरल नॅशनल मॉर्टगेज असोसिएशन (एफएनएमए) म्हणून ओळखले जाते. ही सरकारद्वारे चालवली जाणारी अमेरिकेतील एक आर्थिक संस्था आहे. कंपनीने आपल्या अहवालात असे नमूद केले आहे की, या प्रकरणात गैरवर्तनाचा आरोप असलेल्या २०० कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक तेलुगू वंशाचे आहेत. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाने तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकामध्ये प्रादेशिक उपाध्यक्षपद भूषवले होते; तर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याचे अमेरिकन तेलुगू असोसिएशन (एटीए)च्या अध्यक्षांशी लग्न झाले होते.

८ एप्रिल २०२५ रोजी फॅनी मे यांनी सांगितले की, कंपनीने १०० हून अधिक लोकांना अनैतिक वर्तनासाठी काढून टाकले होते. त्यामध्ये फसवणुकीत मदत करणाऱ्यांचादेखील समावेश आहे. “फसवणुकीला मदत करणाऱ्या आणि अनैतिक वर्तनाविरोधात कारवाई करण्यासाठी फॅनी मे यांना अधिकार दिल्याबद्दल मी संचालक पुल्टे यांचे आभार मानते. आम्ही सर्वोच्च मानकांचे पालन करतो आणि ते करत राहू,” असे फॅनी मेच्या अध्यक्ष व सीईओ प्रिसिला अल्मोडोवार यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सूत्रांनी माहिती दिली की, तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ही एकमेव गैर-नफा संस्था नसून, या पद्धतीच्या इतरही संस्थांवर लक्ष ठेवले जात आहे. नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक जण उत्तर व्हर्जिनियामध्ये राहणारे भारतीय अमेरिकन आहेत. ‘द अमेरिकन बाजार’ने वृत्त दिले आहे की, काँग्रेस (अमेरिकन संसद) सदस्य सुहास सुब्रमण्यम यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलेय, की कर्मचाऱ्यांनी कोणतेही चुकीचे काम केल्याचे नाकारले आहे आणि फॅनी मे यांनी आरोपांची योग्य रीतीने चौकशी केलेली नाही, असा दावा केला आहे.

सुहास सुब्रह्मण्यम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत काय म्हणाले?

फॅनी मे कंपनीने कर्मचाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईवर सुब्रह्मण्यम यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, कंपनीने फसवणुकीच्या दाव्यांची योग्यरीत्या चौकशी केलेली दिसत नाही. त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की, केवळ भारतीय अमेरिकन समुदायाचा भाग असल्यामुळे किंवा भारतीय अमेरिकन गटांना देणगी दिल्याने या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे का.

ते पुढे म्हणाले, “फॅनी मेने भारतीय-अमेरिकन समुदायातील माझ्या मतदारांवर फसवणुकीचे अनेक आरोप केले आहेत आणि पूर्ण चौकशी न करता किंवा त्यांच्याविरोधात पुरावे सादर न करता, त्यांना कामावरून काढून टाकले आहे. मी आमच्या समुदायातील या कर्मचाऱ्यांशी बोललो आहे.” सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या पत्रात असेदेखील लक्षात आणून दिले की, ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढले आहे, त्यापैकी अनेकांनी फॅनी मे येथे वर्षानुवर्षे काम केले आहे आणि त्यांच्या कामगिरीचा रेकॉर्डही उत्तम आहे. त्यांना कोणताही इशारा दिल्याशिवाय कंपनीने अचानक काढून टाकल्याचे सांगितले गेले आहे.

तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकाचा ‘अॅपल’शी संबंध काय?

कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टमधील एका न्यायालयाने डिसेंबर २०२४ मध्ये तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकाला समन्स बजावले होते आणि या संस्थेला न्यायाधीशांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. या दरम्यान संस्थेला २०१९ ते २०२४ दरम्यान मिळालेल्या देणग्या, पैसे कसे खर्च केले गेले आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती सादर करावी लागली होती. या वर्षी अॅपल’ टेक फर्ममधील कर्मचाऱ्यांबाबत याच स्वरूपाचे दावे समोर आले. कंपनीने १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यात ‘अॅपल’च्या क्यूपर्टिनो मुख्यालयातील जवळपास ५० कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

‘अ‍ॅपल’च्या ‘मॅचिंग गिफ्ट्स प्रोग्राम’अंतर्गत, कंपनी धर्मादाय कामांसाठी कर्मचाऱ्यांना देणगी स्वरूपात निधी देते. या फसवणूक प्रकरणात कर्मचाऱ्यांनी संस्थांना देणग्या दिल्याचे भासवले होते; परंतु दिल्या नाहीत. बे एरियामधील अधिकाऱ्यांनी ‘अॅपल’च्या सहा माजी कर्मचाऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. सांता क्लारा काउंटी जिल्हा वकील कार्यालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, अॅपलच्या कार्यक्रमातून अंदाजे १,५२,००० डॉलर्स काढले गेले आणि करकपात म्हणून सुमारे १,००,००० डॉलर्सच्या धर्मादाय देणग्यांचा अतिरेक केला.”