अमेरिकेतून मोठ्या संख्येने विदेशी विद्यार्थ्यांना हद्दपार केले जात आहे. चुकीच्या रस्त्यावरून वाहने चालवणे आणि अगदी सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केल्याप्रकरणीही त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इमिग्रेशन कारवाईचा एक भाग म्हणून विदेशी विद्यार्थ्यांविरुद्धची कारवाई अचानक कठोर केली आहे. पूर्वी विद्यापीठातील काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले होते, भूतकाळात कॅम्पस अॅक्टिव्हिझममध्ये भाग घेतल्याच्या आरोपाखाली काही विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले होते. अशा प्रकारे अमेरिकन अधिकारी विदेशी विद्यार्थ्यांवर कारवाई करीत आहेत, ज्यात अनेक भारतीय विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविषयाविषयी चिंता निर्माण झाली आहे. या कारवाईमागील कारण काय आहे? त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार? जाणून घेऊ…
किरकोळ गुन्ह्यांसाठी विद्यार्थ्यांची देशातून हकालपट्टी?
काही दिवसांपासून अमेरिकेतील अनेक भारतीय आणि इतर देशांतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अचानक त्यांचा F-1 व्हिसा म्हणजेच विद्यार्थी व्हिसा रद्द करण्याबाबतचा मेल आला आहे. हा मेल मार्चच्या अखेरच्या आठवड्यात अमेरिकन परराष्ट्र विभागाने (डीओएस) पाठवला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या मेलमुळे विद्यार्थ्यांना माहिती मिळाली की, आता त्यांचा F-1 व्हिसा वैध नाही. त्यांना तातडीने देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात व्हिसा रद्द करण्याचे कारण म्हणून मागील गुन्हेगारी आरोपांचा उल्लेख केला गेला आहे. या आरोपांमध्ये चुकीच्या रस्त्यावरून वाहने चालवणे, मद्यपान करून वाहने चालवणे आणि दुकानात चोरी करणे यांसारख्या किरकोळ गुन्ह्यांचा समावेश आहे.
या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे, “इंटरनॅशनल स्टुडंट सर्व्हिस (आयएसएस) तुम्हाला कळवीत आहे की, तुमचा स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम (एसईव्हीआयएस) रेकॉर्ड रद्द करण्यात आला आहे.” स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये स्थलांतरितांची माहिती आणि त्यांच्या कायदेशीर स्थितीची माहिती असते. “हा रेकॉर्ड रद्द केला गेल्याने तुमचा वैध F-1 नॉन-इमिग्रंट व्हिसा आता रद्द करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की, आता तुम्हाला अमेरिकेत राहण्याची कायदेशीर परवानगी नाही. तुमचा फॉर्म आय-२० आता वैध नाही. तुमचे एम्प्लॉयमेंट ऑथरायझेशन डॉक्युमेंट्स आता वैध नाहीत आणि तुम्हाला आता देशात काम करण्याचीदेखील परवानगी नाही,” असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
या ईमेलमध्ये पुढे असे नमूद करण्यात आले आहे, “तुमचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचा अर्थ तुमच्या पासपोर्टमधील F-1 व्हिसा आता वैध नाही. जर तुम्ही अमेरिकेत असाल, तर तुम्हाला तातडीने देश सोडावा लागणार आहे.” स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम रेकॉर्ड एकदा जर का संपुष्टात आला, तर विद्यार्थ्याचा अमेरिकेतील कायदेशीर परवाना रद्द होतो. त्यानंतर संबंधितांना १५ दिवसांच्या आत देश सोडावा लागतो किंवा त्यांचा दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना आवश्यक ती पावले उचलावी लागतात. वेळेत विद्यार्थ्यांनी पावले न उचलल्यास त्यांना देशातून हद्दपार केले जाऊ शकते आणि भविष्यातही व्हिसा मिळण्यात त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सामान्यतः हद्दपारीची कारणे कोणती असतात?
पन्नास वेगवेगळ्या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी माहिती दिली आहे की त्यांचे व्हिसा ४ एप्रिलच्या सुमारास रद्द करण्यात आले होते. अनेकांनी हेदेखील मान्य केले आहे की, त्यांची नावे गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये आहेत; मात्र ते गुन्हे किरकोळ स्वरूपाचे होते. या विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या ईमेलमध्ये त्यांना स्वतःहून हद्दपार होण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांनी असे न केल्यास, त्यांना सक्तीने हद्दपार केले जाऊ शकते आणि भविष्यात त्यांना व्हिसा मिळविताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असेदेखील सांगण्यात आले आहे. गृह सुरक्षा विभागाला किरकोळ गुन्ह्यांसाठी हद्दपारीचा आदेश देण्याचा अधिकार आहे. मात्र, आजवर अशा पद्धतीची कारवाई कधीही करण्यात आलेली नाही.
या ईमेलमध्ये अनेक विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे की, मद्यपान करून गाडी चालवणे, चुकीच्या रस्त्यांवरून वाहने चालवणे किंवा जास्त वेगाने गाडी चालवणे यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांचा स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम रेकॉर्ड रद्द करण्यात आला. शेजारी बसलेल्या परवानाधारक ड्रायव्हरशिवाय शिकाऊ परवाना घेऊन गाडी चालवणे यांसारख्या किरकोळ वाहतुकीचे उल्लंघन केल्यामुळेदेखील त्यांचा रेकॉर्ड रद्द करण्यात आला असल्याची माहिती इमिग्रेशन वकील चांद परवाथनेनी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली आहे. अनेक इमिग्रेशन वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांचे व्हिसा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळेही रद्द करण्यात आले होते. “हे सर्व किरकोळ गुन्हे आहेत आणि यापूर्वी अशा गुन्ह्यांमुळे आम्ही क्वचितच कोणाचा स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम रेकॉर्ड रद्द होताना पाहिला आहे,” असे परवाथनेनी यांनी सांगितले.
विद्यापीठांच्या निवेदनामधील माहितीनुसार आतापर्यंत ३९ विद्यार्थ्यांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे, त्यात यूसी बर्कले, यूसीएलए, यूसी सॅन दिएगो, स्टॅनफोर्ड, ओहायो स्टेट, टेनेसी युनिव्हर्सिटी, केंटकी युनिव्हर्सिटी, मिनेसोटा स्टेट युनिव्हर्सिटी व ओरेगॉन युनिव्हर्सिटीचा समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाच्या पहिल्या कार्यकाळात, पॅलेस्टिनी समर्थन किंवा भाषणात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात होते.
तज्ज्ञांनी अशी चिंता व्यक्त केली आहे की, अटक आणि व्हिसा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. अमेरिकन कौन्सिल ऑन एज्युकेशनमधील उपाध्यक्षा सारा स्प्रेइट्झर यांनी ‘एपी’ला सांगितले की, व्हिसा रद्द केल्या जात असल्याच्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठांकडून मेल आले आहेत. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, व्हिसा रद्द करण्याचे कारण काय याबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला व पासपोर्ट आणि संबंधित इमिग्रेशन कागदपत्रे सोबत ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.