एरो इंडिया २०२५ मध्ये अमेरिकेचे F-35 लढाऊ विमान आणि रशियाचे SU-57 यांचे प्रदर्शन पाहायला मिळाले. अमेरिका आणि रशिया दोघेही आपापल्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने भारताला देण्यास इच्छुक आहेत. १३ फेब्रुवारीला आशियातील सर्वांत मोठ्या एअर शोदरम्यान SU-57 आकाशात झेपावले आणि F-35 नेही आपली प्रतिभा दाखवली. परंतु, भारतासाठी कोणते विमान गेम चेंजर ठरणार? दोन्ही विमानांमध्ये नक्की काय फरक आहे? भारताला लढाऊ विमानांची गरज का आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
F-35 आणि SU-57 मध्ये फरक काय?
F-35 आणि SU-57 फेलॉन ही दोन्ही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत. F-35 या विमानाची निर्मिती अमेरिकेतील पॉवरहाऊस शस्त्रे विकसित करणाऱ्या लॉकहीड मार्टिन या कंपनीने केली आहे. लॉकहीड मार्टिनच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे, “F-35 युद्ध क्षेत्रात निर्णायक ठरते. ते मल्टी-डोमेन स्पेक्ट्रममध्ये अनेक फायदे प्रदान करते. “F-35 ची परिवर्तनीय क्षमता वैमानिकांना कोणत्याही वातावरणात, कोणत्याही धोक्याविरुद्ध कार्य करण्यास सक्षम करते.” अमेरिका, ब्रिटन, इटली, नेदरलँड, तुर्की, कॅनडा, डेन्मार्क, नॉर्वे व ऑस्ट्रेलिया या नऊ देशांकडे F-35 आहे. ‘सीएनबीसी’नुसार, प्रत्येक F-35 युनिटची किंमत ८० दशलक्ष डॉलर्स ते ११५ दशलक्ष डॉलर्सदरम्यान आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/US-and-russia-fifth-generation-fighter-jet.jpg?w=830)
SU-57 हे रशियन विमान कंपनी सुखोईने तयार केले आहे. सुखोईच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे, “हवा, जमीन व सागरी लक्ष्यांविरुद्ध याची सक्षमता वाढविण्यासाठी सुखोई लढाऊ विमानाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.” रशियाने SU-57 हे अमेरिकेच्या F-35 च्या समतुल्य असल्याचे सांगितले आहे. F-35 हे जगातील सर्वांत प्रगत मल्टीरोल फायटर जेट मानले जाते. शीतयुद्ध संपल्यानंतर रशियाने तयार केलेले SU-57 हे पहिले अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ‘द वॉर झोन’नुसार, रशियाने दावा केला आहे की SU-57 हे F-35 पेक्षा लक्षणीयरीत्या स्वस्त आहे; परंतु त्याची किंमत अद्याप समोर आलेली नाही.
विमानांची वैशिष्ट्ये काय?
F-35 हे सिंगल सीटर अन् सिंगल-इंजिन विमान आहे; तर SU-57 हे दोन-इंजिनांचे सिंगल सीटर लढाऊ विमान आहे. F-35 मध्ये जगातील सर्वांत शक्तिशाली इंजिन ‘Pratt & Whitney F135’ आहे. ते मॅच १.६ पर्यंतची उच्च गती गाठू शकते. परंतु, रशियाच्या सुखोईमध्ये ‘Saturn AL-41F1’ हे आफ्टर-बर्निंग टर्बोफॅन इंजिन आहे, ते मॅच १.८ पर्यंतची उच्च गती गाठू शकते. F35 हे लांब पल्ल्याचे सुपरसॉनिक फायटर आहे. त्याची इंधन क्षमता १८,४९८ पौंड आहे आणि ते ८,१६० किलो वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकते. त्याची रेंज २,१७२ किलोमीटर आहे. त्याची कमाल ऑपरेटिंग उंची ५०,००० फूट आहे. F-35 च्या इलेक्ट्रॉनिक सेन्सर्समध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल डिस्ट्रिब्युटेड अपर्चर सिस्टीम (DAS) आहे; ज्यामुळे क्षेपणास्त्राचे सिग्नल, विमानाचे सिग्नल मिळतात.
F-35 मध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल टार्गेटिंग सिस्टीम (EOTS)देखील आहे. ही प्रणाली अंतर्गतरीत्या बसविली जाते. ही प्रणाली लढाऊ विमानाला जमिनीवरील लक्ष्यांविरुद्ध अचूक स्ट्राइक तसेच हवाई धोक्यांची लांब पल्ल्याची ओळख वाढविण्यास सक्षमता प्रदान करते. F-35 ची हेल्मेट माउंटेड डिस्प्ले सिस्टीम ही विमानातील सर्वांत प्रगत प्रणाली आहे. F-35 वैमानिकाला मोहीम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती हेल्मेटच्या व्हिझरवर प्रदर्शित केली जाते.
‘PWIAS’नुसार, SU-57मध्ये एक सेरेटेड एक्झॉस्ट नोझल आहे. SU-57 मध्ये हवेतून हवेत मारा करणाऱ्या आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह ७.४ टन शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. त्याची कमाल ऑपरेटिंग उंची ५४,१०० फूट आणि त्याची रेंज २,९९९ किलोमीटर आहे. SU-57 हवाई, जमिनीवर व नौदलाच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असल्याचे म्हटले जाते. इलेक्ट्रॉनिक सेकंड पायलट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तिशाली ऑनबोर्ड संगणकासह हे विमान सर्वांत प्रगत ऑनबोर्ड रेडिओ-इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह येईल, असे मानले जाते. विमानातील एआय प्रणाली विमान उडवू शकते आणि शस्त्रांचा वापर सेट करू शकते.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/russia-fifth-generation-fighter-jet.jpg?w=830)
जगभरात लढाऊ विमाने कार्यरत
फॉर्च्युन इंडियाच्या मते, सध्या जगभरात १,००० हून अधिक F-35s कार्यरत आहेत. दुसरीकडे, रशियाने कोमसोमोल्स्क-ऑन-अमुर एव्हिएशन प्लांटमध्ये फक्त ४० SU-57 तयार केले आहेत. सुखोईला त्याच्या विकासामध्ये बराच काळ विलंब झाला. सुखोईच्या निर्मात्यानुसार, विमानाचा विकास २०२२ मध्ये सुरू झाला. ‘द वॉर झोन’नुसार, रशियन संरक्षण फर्म रोसोबोरोन एक्सपोर्टने गेल्या वर्षी दावा केला होता की, त्यांनी SU-57 विकण्यासाठी करार केला होता. मात्र, खरेदीदाराचे नाव त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ‘फॉर्च्युन इंडिया’नुसार, SU-57 विमानाच्या स्टेल्थ क्षमतेबद्दलही चिंता कायम आहे.
भारताला पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची गरज का?
‘फॉर्च्युन इंडिया’नुसार, भारतीय हवाई दलाकडे सध्या सुमारे ६०० लढाऊ विमानांसह २,२२९ विमाने आहेत. परंतु, भारताकडे पाचव्या पिढीचे फायटर जेट नाही. रशिया, चीन व अमेरिका या तिन्ही राष्ट्रांकडे पाचव्या पिढीचे फायटर जेट आहे. डसॉल्ट राफेलला भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु, ते ४.५ व्या पिढीचे लढाऊ विमान आहे. ‘द प्रिंट’नुसार, भारत स्वत:च्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानावर काम करीत आहे. अॅडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एमएमसीए)ची रचना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि ‘डीआरडीओ’च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने (एडीए) केली आहे. परंतु, एएमसीए विकसित होण्यास अनेक वर्षं लागतील. ‘वॉर झोन’ने नमूद केले की, एएमसीएचा २०३६ पर्यंत सेवेत प्रवेश होईल, असे नियोजन आहे. परंतु, एचएएल २०१० पासून प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे भारताचे हवाई दल चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मागे पडल्याने तज्ज्ञ चिंतेत आहेत. चीनने पाचव्या पिढीचे J-35A फायटर जेट विकसित केले आहे, जे F-35 सारखे आहे. युरेशियन टाइम्सनुसार, २०३५ पर्यंत १,५०० पेक्षा जास्त पाचव्या आणि सहाव्या पिढीचे लढाऊ विमाने तयार करण्याचे चीनचे लक्ष्य आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीन आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध मोठे युद्ध झाल्यास भारतीय हवाई दलाचे मोठे नुकसान होईल.
तज्ज्ञ काय सांगतात?
चीनला उत्तर म्हणून रशियाने SU-57 विकसित केले आहे. भारतीय संरक्षण पत्रकार अंगद सिंग यांनी ‘द वॉर झोन’ला सांगितले, “द फेलॉन कदाचित सर्वांत कमी सक्षमता असलेले पाचव्या पिढीतील सर्वांत जुने लढाऊ विमान आहे. मला त्यात पाचव्या पिढीतील विमानासारखी उपयुक्तता दिसत नाही.” तसेच, इतर तज्ज्ञांनाही खात्री नाही की, F-35 भारतासाठी योग्य आहे की नाही. ‘झेन टेक्नॉलॉजीज’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अशोक अटलुरी यांनी ‘सीएनबीसी’शी बोलताना F-35 चा उल्लेख ‘व्हाईट एलिफंट’, असा केला आहे. अगदी एलॉन मस्क यांनीही F-35 ला अप्रचलित म्हटले आहे. अटलुरी म्हणाले की, भारताने ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणा घेणे अधिक चांगले ठरेल.