US Deports illegal indian immigrants : अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात परत आणलं जात आहे. टेक्सास शहरातून २०५ नागरिकांना घेऊन अमेरिकेचं लष्करी विमान बुधवारी (५ फेब्रुवारी) भारतात येणार आहे. सुरुवातीला हे विमान दिल्ली-एनसीआरमध्ये उतरणार, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, आता ते पंजाबमध्ये उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेनं रवाना केलेल्या भारतीयांचं मायदेशात परतल्यावर नेमकं काय होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात बेकायदा स्थलांतरितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. राष्ट्राध्यक्षांनी सत्तेत आल्यानंतर बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्याची मोहीम हाती घेऊन, अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. आतापर्यंत अमेरिकन लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू व होंडुरास येथील नागरिकांना त्यांच्या मायदेशी सुखरूप पाठवलं आहे.
आणखी वाचा : बेकायदेशीर स्थलांतरितांची घरवापसी करण्यासाठी अमेरिका ५ पट महाग लष्करी विमाने का वापरत आहे?
अमेरिकेने भारतीयांना केले हद्दपार
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, भारतीय नागरिकांना घेऊन येणारे अमेरिकेचे लष्करी विमान दिल्ली-एनसीआरमध्ये उतरणार नाही. ते पंजाबमधील अमृतसर येथील श्री गुरू रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे. हा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला आहे. अमेरिकेतून परत पाठविण्यात आलेले बहुतांश भारतीय नागरिक हे पंजाब आणि शेजारच्या राज्यांमधून आले आहेत, असे वृत्त द ट्रिब्यूनने दिले आहे. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाची सुरुवातीला पडताळणी करण्यात आली आणि नंतर त्यांना विमानात बसवण्यात आलं.
अमृतसरला जाण्यापूर्वी हे लष्करी विमान जर्मनीतील रामस्टीन विमानतळावर इंधन भरणार आहे. अमेरिकेने बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी लष्करी विमाने तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जेट इंजिन असलेल्या सी-१७ या लष्करी विमानात फक्त एकच शौचालय असते. त्याशिवाय अमेरिकन सैनिकांना विमानात हालचाल करता यावी यासाठी मोकळी जागा ठेवलेली असते. विमानात ठरावीक आसनांची (सीट्स) व्यवस्था केलेली असते.
अमेरिकन दूतावासाने नेमके काय सांगितले?
अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्यानं सांगितलं, “बेकायदा स्थलांतरितांना घेऊन येणाऱ्या विमानासंदर्भात आमच्याकडे असंख्य लोकांनी चौकशी केली. या संदर्भात मी अधिक तपशील देऊ शकत नाही. पण, मी हे सांगू शकतो की, अमेरिकेनं आपल्या सीमेसंदर्भात अतिशय काटेकोर धोरण अनुसरलं आहे. आम्ही देशात प्रवेश करण्यासंदर्भात अतिशय कठोर कायदे अमलात आणले आहेत. बेकायदा पद्धतीनं अमेरिकेत घुसखोरी केलेल्या स्थलांतरितांना बाहेर काढलं जात आहे. अवैध पद्धतीनं स्थलांतराला अमेरिकेत जराही थारा नाही हा संदेश पोहोचवणं गरजेचं आहे.”
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी टेक्सासमधील एल पासो आणि कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो शहरातून पाच हजारांहून अधिक स्थलांतरितांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना आपापल्या मायदेशी परत पाठविण्यासाठी अमेरिकेकडून विमानं पुरवली जात आहेत.
भारतीयांचं मायदेशी परतल्यावर काय होणार?
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, बुधवारी अमेरिकन लष्करी विमान पंजाबमध्ये उतरल्यानंतर विमानातील प्रत्येक भारतीय नागरिकाची प्रथम माहिती घेतली जाईल. अमेरिकेत बेकायदा प्रवेश करणाऱ्या लोकांची पार्श्वभूमी सरकारनं जाणून घेतली पाहिजे, असं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेत घुसखोरी करणारे लोक खरंच भारतीय आहेत की इतर ठिकाणांहून आले आहेत याची पडताळणी होणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. या नागरिकांना बेकायदा सीमा ओलांडण्यास मदत करणाऱ्यांची ओळख पटवणं हेदेखील आवश्यक असल्याचं सूत्रांनी न्यूज १८ ला सांगितलं.
अमेरिकेला उड्डाणांसाठी किती खर्च येतोय?
बेकायदा स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेली मोहीम अमेरिकेसाठी महागडी ठरत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात ग्वाटेमाला येथील स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी लष्करी विमानाला प्रतिव्यक्ती चार हजार ६७५ डॉलर्स (सुमारे चार लाख रुपये) खर्च आल्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत त्याच मार्गावर अमेरिकन एअरलाइन्सच्या एकतर्फी प्रथम श्रेणीच्या तिकिटाची किंमत ८५३ डॉलर्स (सुमारे ७४,००० रुपये) इतकी आहे. यूएस इमिग्रेशन एण्ड कस्टम इन्फोर्समेंट (ICE) बेकायदा स्थलांतरितांसाठी नियमित व्यावसायिक विमानांसारखाच खर्च आकारत आहे.
ICE च्या २०२१ च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, विमानाच्या उड्डाणाचा खर्च प्रति तास आठ हजार ५७७ रुपये (७.४ लाख) इतका होता. रॉयटर्सच्या मते, आयसीईचे कार्यकारी संचालक टाय जॉन्सन यांनी एप्रिल २०२३ च्या अर्थसंकल्पात कायदे मंडळाच्या सदस्यांना माहिती दिली की, “स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी उड्डाणांचा खर्च प्रति तास १७ हजार डॉलर्स (अंदाजे १५ लाख रुपये) येतो आणि प्रवासाला साधारणपणे पाच तास लागतात. हा खर्च प्रति व्यक्ती ६३० डॉलर्स (५४ हजारपेक्षा जास्त) इतका असतो.” दरम्यान, अमेरिकेच्या लष्करी विमानासाठी प्रति तास अंदाजे २८ हजार ५०० डॉलर्स (२५ लाख रुपये) खर्च येतो. भारतात स्थलांतरितांना परत पाठविण्याचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा प्रवासखर्च आहे.
हेही वाचा : टाटांचा युवा शिलेदार आता टाटा समूहात उच्चपदस्थ
अमेरिकेत किती ‘बेकायदा’ भारतीय आहेत?
अमेरिकेत राहत असलेल्या अंदाजे सात लाख २५ हजार भारतीय नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत. ब्लूमबर्गच्या आधीच्या अहवालानुसार, अमेरिकेने सुमारे १८ हजार बेकायदा भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्याची योजना आखली आहे. अमेरिकेत किती बेकायदा भारतीय स्थलांतरित राहतात याबद्दल अनिश्चितता असल्यानं ही संख्या जास्त असू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरावर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं अमेरिकेत प्रवेश केलेल्या नागरिकांना परत आणण्यात भारत अमेरिकेला सहकार्य करीत आहे.
इंडियन एक्स्प्रेसनुसार, अमेरिकेत बेकायदा निवास करीत असलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी म्हटले होते की, अमेरिकेसह इतर देशांमध्ये बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. जर आमचे कोणतेही नागरिक तिथे बेकायदा राहत असतील, तर आम्ही त्यांना भारतात आणण्यासाठी नेहमीच तयार आहोत. फक्त त्या व्यक्ती भारतीय नागरिक असायला हवेत”, असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे.