अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत एच-वन बी व्हिसाचे समर्थन करून त्यांच्याच अनेक समर्थकांना धक्का दिला. त्याच्या एक दिवस आधी उद्योगपती आणि आगामी ट्रम्प प्रशासनातील प्रभावी व्यक्ती इलॉन मस्क यांनीही एच-वन बी व्हिसाचे जोरदार समर्थन केले होते. स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेऊन निवडणुकीत घवघीत यश मिळणारे ट्रम्प यांच्या भूमिकेतील हा बदल अनेकांसाठी चक्रावणारा ठरतो. पण त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर खरोखरच एच-वन बी व्हिसासाठी अनुकूल धोरण राबवले, तर त्याचा फायदा हजारो भारतीयांना होऊ शकेल. कारण कुशल व अतिकुशल स्थलांतरित कामगारांसाठी निर्धारित असलेल्या या व्हिसाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक भारतीय आहेत.
एच-वन बी व्हिसा म्हणजे काय?
एच-वन बी व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांना परदेशातून उच्चशिक्षित व प्रशिक्षित मनुष्यबळ आयात करता येते. असे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्यामुळे ही सोय केली जाते. पण एच-वन बी व्हिसा हे हंगामी किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे आणि विशिष्ट कालावधीसाठी असतात. त्यांचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागते. एच-वन बी व्हिसाधारकांकडे किमान पदवी असणे अनिवार्य आहे. एच-वन बी व्हिसा म्हणजे अमेरिकेत नोकरी करण्याचा सरसकट परवाना नव्हे, असे अमेरिकेच्या गृह खात्याने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. दरवर्षी असे ६५ हजार व्हिसा अमेरिकेचा गृह विभाग जारी करतो. पण महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणारे किंवा सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये संशोधन करणाऱ्यांचा यात समावेश नाही.
हेही वाचा : Indus Valley Civilization: मासे, धान्य, डाळी, फळे, भाज्या; सिंधू संस्कृतीचा आहार नेमका कसा होता?
एच-टू ए, एच-टू बी व्हिसा
ट्रम्प यांची ओरड प्राधान्याने या प्रकारांतील व्हिसाधारकांविषयी किंवा स्थलांतरितांविषयी आहे. एच-टू ए व्हिसा हे शेती कामगारांसाठी आहेत. तर एच-टू बी व्हिसा हे अकुशल कामगार म्हणजे उदा. बागकामगार, घरकामगार अशांसाठी असतात. दोन्ही एच-टू व्हिसांसाठी १० महिने अमेरिकेत वास्तव्य व रोजगाराची ठरावीक कालमर्यादा असते. अमेरिकेत बहुतेकदा मेक्सिको, एल साल्वाडोर, कोलंबिया, कोस्टारिका, पनामा, क्युबा अशा देशांतून एच-टू कामगार येतात. तर भारत, चीन, दक्षिण कोरिया, युरोपिय देश येथून मोठ्या संख्येने एच-वन व्हिसाधारक येतात.
ट्रम्प काय म्हणाले…. आता नि तेव्हा?
‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या मुखातीत ट्रम्प यांनी एच-वन बी व्हिसाविषयी प्रशंसोद्गार काढले. ‘एच-वन बी व्हिसा योजना माझ्या आवडीची आहे. माझ्या अनेक कंपन्यांमध्ये असे व्हिसाधारक काम करतात. माझा याला पाठिंबा आहे. म्हणूनच हा व्हिसा अस्तित्वात आहे,’ असे त्यांनी सांगितले. पण ते एच-वन बी व्हिसा असेच खरोखर म्हणाले का, याविषयी दुमत आहे. ट्रम्प यांच्या मालमत्तांवर प्राधान्याने एच-टू ए आणि एच-टू बी व्हिसाधारक काम करतात. ही संख्या जवळपास एक हजार आहे. २०२०मध्ये ट्रम्प यांनी एच-वन बी व्हिसा योजनेचे कौतुक केले होते. पण २०१६मध्ये प्रचार करत असताना हे व्हिसा अतिशय गैर असून, ते संपवले पाहिजेत असे मत त्यांनी मांडले होते. त्याचप्रमाणे अध्यक्षपदाच्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात एच-वन बी व्हिसा वाटपावर निर्बंधही आणले होते.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लडाखमधल्या पुतळ्यावरून वाद; नेमकं प्रकरण काय?
इलॉन मस्कही होता एच-वन बी व्हिसाधारक…
ट्रम्प यांच्या आधी एक दिवस उद्योगपती इलॉन मस्कने या व्हिसाचे समर्थन केले होते. मस्क हा मूळचा दक्षिण आफ्रिकेतला. कधी काळी एच-वन बी व्हिसाच्या आधारावरच अमेरिकेत आला. उच्च इंजिनिअरिंग गुणवत्तेची अमेरिकेत वानवा असून, त्यासाठी बाहेरून कौशल्यधारी गुणवान आणावे लागतील. हे एच-वन बी व्हिसाच्या आधारेच शक्य आहे, असे ट्वीट मस्कने केले होते. सिलिकॉन व्हॅलीमध्ये टेक कंपन्यांसाठी गुणवत्तेचा कायमस्वरूपी तुटवडा असतो, असे ठाम मत त्याने मांडले. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या अनेक समर्थकांनी समाजमाध्यमांवरून मस्कवर जहरी टीका केली. ट्रम्प यांनी मात्र मस्कला पाठिंबाच जाहीर केला.
भारतीयांना काय फायदा?
एच-वन बी व्हिसा प्राप्त करणाऱ्यांमध्ये भारतीयांचे निर्विवाद प्राबल्य दिसून येते. दरवर्षी असे ६५ हजार व्हिसाच जारी करण्याची मर्यादा अमेरिकी प्रशासनावर आहे. तरीही गेल्या दोन वर्षांमध्ये (२०२३, २०२४) प्रत्येकी ७० ते ७२ टक्के भारतीयांना व्हिसा मंजूर झाला होता. यातही जवळपास ६५ टक्के व्हिसा कम्प्युटरशी संबंधित कौशल्यधारकांना मंजूर झाले. ट्रम्प आणि मस्क यांनी या धोरणाला राजमान्यता दिल्यास, त्याचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होणार आहे.