अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना वार्धक्याच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्याने आता उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव राष्ट्राध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. पक्षांतर्गत बहुमत मिळविण्यातही त्या यशस्वी ठरल्याने त्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असतील, अशी सर्वाधिक शक्यता आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या, तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याहून त्या अनेक मुद्द्यांवर सरस ठरू शकतील. अमेरिकेतील गर्भपाताच्या अधिकाराचा मुद्दा हा त्यापैकीच एक म्हणता येईल.
हेही वाचा : US Election 2024: मिशेल ओबामा राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदार? निवडणूक लढवण्याची शक्यता किती?
अमेरिकेमध्ये गर्भपाताच्या मुद्द्यावर मतमतांतरे आहेत. अनेक वर्षांपासून हा विषय वादाचा ठरला असल्याने निवडणुकीमध्येही हा मुद्दा सतत चर्चिला जातो. अमेरिकन राजकारण आणि सांस्कृतिक वादामध्ये गर्भपाताचा मुद्दा प्रचलित आहे. अमेरिकेतील बहुसंख्य लोक गर्भपाताचा अधिकार मान्य करीत असले तरीही अमेरिकेमध्ये राज्यानुसार विविध प्रकारचे गर्भपात कायदे अस्तित्वात आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्येही हा मुद्दा नक्कीच कळीचा ठरणार आहे. कमला हॅरिस यांनी नुकतेच एक ट्वीट करून या मुद्द्याला वाचा फोडली होती. त्यांनी म्हटले होते, “मी ठामपणे सांगते! डोनाल्ड ट्रम्प जर निवडून आले, तर ते ‘राष्ट्रीय गर्भपातबंदी’ कायदा आणतील. ते संततिनियमन प्रतिबंधित करतील.”
गर्भपाताचा मुद्दा हा अमेरिकेच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये नेहमीच वादाचा आणि चर्चेचा मुद्दा राहिला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘रो विरुद्ध वेड’ खटल्यामध्ये निर्णय दिल्यानंतर होणारी ही पहिलीच अध्यक्षीय निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत गर्भपात हा निर्णायक मुद्दा ठरू शकतो. अनेक राज्यांनी गर्भपातावर वेगवेगळे कायदे केलेले असून सर्वोच्च न्यायालयाने ‘रो विरुद्ध वेड’ आणि ‘डो विरुद्ध बोल्टन’ यांच्या बाबतीत दिलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरले आहेत. १९७३ मधील ‘डो विरुद्ध बोल्टन’च्या निर्णयाने देशभरामध्ये गर्भपात करणे गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिला; तर ‘रो विरुद्ध वेड’च्या निर्णयाने देशव्यापी कायदा लागू करण्याची वाट मोकळी करून दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जून २०२२ मध्ये ‘रो’चा निर्णय रद्द करून, गर्भपाताबाबत असलेला घटनात्मक अधिकार संपवला. या निर्णयानंतर आता २०२४ ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असून, हा मुद्दा त्यामध्ये गाजण्याची शक्यता आहे. कमला हॅरिस यांची उमेदवारी अद्याप अधिकृतपणे घोषित केली गेलेली नसली तरी हे आता सर्वांनीच गृहीत धरलेले आहे की, त्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असतील. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘गर्भपाताचा अधिकार’ या मुद्द्यावरून लक्ष्य करणे अधिक सोपे जाऊ शकते. त्यातही जेडी व्हान्स हे रिपब्लिकन पक्षाचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत; ज्यांनी कमला हॅरिस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे व्हान्स यांच्यावर भरपूर टीकाही झाली होती. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर कमला हॅरिस यांचे पारडे जड दिसून येते.
गर्भपाताबद्दल अमेरिकेची भूमिका काय?
जून २०२२ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘रो विरुद्ध वेड’ हा निर्णय मागे घेऊन, गर्भपाताचा अधिकार घटनात्मक नसल्याचा निर्वाळा दिला. गर्भपाताचे नियमन करण्याचे अधिकार पुन्हा एकदा राज्यांना परत करण्यात आले. तेव्हापासूनच या मुद्द्यावरील जनक्षोभ वाढला आहे आणि त्यामुळे अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला यश मिळाले आहे. गर्भपाताच्या अधिकाराला विरोध करणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये फटका बसल्याचे दिसून आले आहे. कॅन्सस व केंटकी यांसारख्या पुराणमतवादी राज्यांमध्येही हे घडले आहे. त्यामुळे या सगळ्याचा प्रभाव राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडेलच, असे म्हटले जात आहे. अलीकडील प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार ६३ टक्के अमेरिकन लोकांचा असा विश्वास आहे की, गर्भपात सर्वच किंवा बहुतांश प्रकरणांमध्ये कायदेशीरच असायला हवा. २०२१ च्या तुलनेत ही आकडेवारी चार टक्क्यांनी वाढली आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन-तृतियांश मॉडरेट रिपब्लिकनदेखील गर्भपाताच्या अधिकारांना समर्थन देतात. गॅलप पोलमध्ये, नोंदणीकृत मतदारांपैकी जवळजवळ एक-तृतियांश मतदार म्हणाले की, ते फक्त अशाच उमेदवाराला मतदान करतील, जो गर्भपाताबद्दल त्यांचे मत सार्वजनिक करील. त्यामुळे हा मुद्दा अमेरिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे आकडेवारीतूनही दिसून येते.
हेही वाचा : अमेरिकन नागरिक कृष्णवर्णीय महिलेला राष्ट्राध्यक्षपदी निवडून देणार का? इतिहास काय सांगतो?
कमला हॅरिस यांची गर्भपाताबद्दलची मते काय आहेत?
गर्भपाताचा अधिकार महत्त्वाचा असल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाला वाटते. गेल्या महिन्यात पहिली प्रेसिडेन्शियल डिबेट झाली होती; त्यामध्येही याबाबत प्रभावीपणे बोलण्याचा प्रयत्न बायडेन यांनी केला होता. मात्र, बायडेन यांना वार्धक्यामुळे हा मुद्दा प्रभावीपणे मांडता आला नाही; तर ट्रम्प यांनी हा मुद्दा अधिक प्रभावी होऊ नये यासाठी चर्चेवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले. बायडेन यांना पुरेशा प्रभावीपणे आपला मुद्दा पटवून देता आला नाही. ट्रम्प हे २०१६ पासून पुन्हा याबाबतचे खोटे दावे करताना दिसून आले. याउलट गर्भपाताबद्दल बोलताना कमला हॅरिस अधिक ठाम व आत्मविश्वासपूर्ण असल्याचे दिसतात. २०१७ मध्ये हॅरिस अमेरिकन सिनेटवर निवडून आल्या होत्या. ट्रम्प यांनीही त्याच वर्षी व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला होता. अमेरिकन सिनेटमध्ये प्रजननाच्या हक्कासंदर्भात काम करणाऱ्या त्या एकमेव वकील होत्या. त्यांनी याआधीही वारंवार या मुद्द्यावरून भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी जेडी व्हान्स यांची उपराष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवड केली आहे. व्हान्स यांची प्रजनन हक्क आणि प्रजनन आरोग्यासंदर्भातील मते टोकाची आहेत. व्हान्स यांनी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) अधिकारांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याच्या विरोधात मतदान केले आहे.