US Child Marriages बालविवाह हा मागच्या शतकातला विषय आहे, अशी अनेकांची समजूत आहे. पण, जगभरात आजही बालविवाह होत आहेत. दारिद्र्य, रूढी-परंपरा, अज्ञान यांसारख्या कारणांमुळे बालविवाह घडून येतात असे सांगितले जाते. परंतु, अगदी पुरोगामित्वाचा बोभाटा करणार्या देशातही मोठ्या संख्येने बालविवाह होत आहेत. अशा देशात या समस्येविषयी कोणताही कठोर कायदा नाही. जागतिक महासत्ता अमेरिकेत गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने बालविवाह झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या समस्येसाठी केलेल्या अनेक उपाययोजनांनंतरही बहुतांश अमेरिकी राज्यांमध्ये बालविवाह आजही कायदेशीर आहेत. यामागील कारण काय? अजूनही हे बालविवाह कायदेशीर का आहेत? अमेरिकेत ही एक व्यापक समस्या कशी ठरत आहे? याविषयी जाणून घेऊ.
अमेरिकेतील बालविवाहाचे प्रमाण
बालविवाहाचे सर्वाधिक प्रमाण सामान्यत: दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये आहेत. मात्र, अमेरिकेतही ही एक व्यापक समस्या ठरत आहे. बळजबरीने करण्यात येणारे विवाह आणि बालविवाहावर बंदी आणण्यासाठी काम करणार्या ‘अनचेन्ड ॲट लास्ट’ या स्वयंसेवी संस्थेच्या संशोधनानुसार, २००० ते २०१८ या कालावधीत अमेरिकेत तीन लाखांपेक्षा जास्त लहान मुलांचे लग्न झाले आहे. यातील बहुसंख्य विवाहांमध्ये अल्पवयीन मुलींचा प्रौढ पुरुषांशी विवाह झाला. धक्कादायक म्हणजे, २०१७ पर्यंत अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये बालविवाह कायदेशीर होता. २०१८ साली डेलावेर आणि न्यू जर्सी ही बालविवाहावर बंदी घालणारी पहिली राज्ये ठरली.
“बालविवाह ३७ राज्यांमध्ये कायदेशीर आहे आणि अमेरिकेत याचा दर वाढला आहे, जो चिंताजनक आहे,” असे ‘अनचेन्ड ॲट लास्ट’ या संस्थेने म्हटले आहे. संस्थेच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, देशभरात १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे लग्न झाले आहेत. अमेरिकेत विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षे आहे.
अमेरिकेतील बहुतांश राज्यांमध्ये बालविवाह कायदेशीर का आहे?
अमेरिकेमध्ये बालविवाहाची व्यापक घटना असूनही, यासंबंधी कायदा नाही. अमेरिकेत विवाहासाठी किमान वय हे वैयक्तिक राज्यांद्वारे निर्धारित केले जाते, फेडरल सरकारद्वारे नाही. त्यामुळे इथे बालविवाहासंबंधी कायदे नाहीत. २०२४ पर्यंत डेलावेअर, न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनिया, मिनेसोटा, ऱ्होड आयलंड, न्यूयॉर्क, मॅसॅच्युसेट्स, व्हरमाँट, कनेक्टिकट, मिशिगन, वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि न्यू हॅम्पशायरसह १३ राज्यांनी बालविवाहावर पूर्णपणे बंदी घालणारे कायदे पारित केले आहेत. परंतु, ३७ राज्ये अजूनही काही विशिष्ट अटींसह बालविवाहास परवानगी देतात. उदाहरणार्थ, पालकांची संमती किंवा न्यायालयीन मान्यता.
“विशेष म्हणजे जोवर मुलांचे पालक किंवा इतर प्रतिनिधी मुलांना परवानगी देत नाही, तोवर कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याची परवानगी या मुलांना दिली जात नाही. उदाहरणार्थ, संरक्षणात्मक आदेश मागणे किंवा घटस्फोटाची,” असे अनचेन्ड ॲट लास्टचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक फ्रेडी रीस सांगतात. २००० ते २०१८ पर्यंत सर्वाधिक बालविवाह टेक्सास राज्यात झाले आहेत. इथे एकूण ४१,७७४ बालविवाहांची नोंद करण्यात आली आहे. इतर राज्यांमध्ये कॅलिफोर्निया (२३,५८८), फ्लोरिडा (१७,२७४), नेवाडा (१७,४०३) नॉर्थ कॅरोलिना (१२,६३७) या राज्यांचा समावेश आहे. त्या कालावधीत सर्वात कमी बालविवाह झालेले राज्य रोड आयलंड होते; जिथे १७१ प्रकरणे नोंदवण्यात आली. राज्य कायद्यातील विसंगती अनेकदा अशा परिस्थितीस कारणीभूत ठरते. “जेव्हा एखादे राज्य बालविवाहावर बंदी आणते, तेव्हा शेजारच्या राज्यात बघितल्यास त्याला अजूनही परवानगी दिली जाते किंवा अगदी काही राज्यांमध्ये, तुम्हाला ती संख्या वाढलेली दिसते,” असे फ्रेडी रीस यांनी ‘न्यूजवीक’ला सांगितले.
बालविवाहाचा पीडितांवर कसा परिणाम होतो?
बालविवाह ही केवळ कायदेशीर समस्या नसून हिंसाचाराशी संबंधित एक गंभीर समस्या आहे. लहान वयात लग्न केल्याने अनेकदा जबाबदार्या झेपवत नाही; ज्यामुळे अल्पवयीन मुले घरगुती आणि लैंगिक हिंसाचारास बळी पडतात. अमेरिकेमध्ये ८६ टक्के बालविवाहांमध्ये अल्पवयीन मुलींनी प्रौढ पुरुषांशी लग्न केले आहे; ज्यामुळे संभाव्य शोषणाची स्थिती निर्माण होते. पॉप्युलेशन इन्स्टिट्यूटच्या बिहाइंड क्लोस्ड डोअर्सच्या ‘एक्सपोझिंग अँड अॅड्रेसिंग हार्मफूल जेंडर बेस्ड प्रॅक्टीस इन युनायटेड स्टेट’ या अभ्यासानुसार, बालविवाह हा किशोरवयीन मुलींचा शैक्षणिक स्तर कमी करणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जागतिक स्तरावर, मुलींनी शाळा सोडण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे.
अमेरिकेमध्ये वयाच्या १९ वर्षांच्या आधी लग्न करणाऱ्या मुली महविद्यालयातून शिक्षण सोडण्याची शक्यता ५० टक्के अधिक आहे, तर ३१ टक्के मुले गरिबीमुळे शिक्षण सोडत आहेत. यातून गरिबीचे चक्र आणि त्याचे परिणाम प्रखरपणे दिसून येतात. “बालविवाह हा लिंग-आधारित हिंसाचाराचा एक प्रकार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे,” असे पॉप्युलेशन इन्स्टिट्यूटमधील संशोधन सहयोगी मनिझा हबीब यांनी ‘अल जझीरा’ला सांगितले. “यामुळे अल्पवयीनांना गरिबी आणि शोषणाचा धोका जास्त असतो आणि त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे नाकारले जाते,” असेही त्या म्हणाल्या.
अमेरिका यासाठी काय करत आहे?
संपूर्ण अमेरिकेमध्ये बालविवाहावर बंदी घालण्याच्या प्रयत्नांना पुराणमतवादी आणि पुरोगामी, अशा दोन्ही गटांकडून लक्षणीय प्रतिकाराचा सामना करावा लागला आहे. पुराणमतवादी राज्यांमध्ये, धार्मिक स्वातंत्र्य आणि गर्भपात विरोधी भूमिकांबद्दलच्या चिंतेमुळे विरोध होतो आहे. कॅलिफोर्नियासारख्या अधिक उदारमतवादी राज्यांमध्ये, कायद्याच्या निर्मात्यांनी बालविवाहाविरूद्ध कायदे करण्याचे प्रयत्न थांबवले आहेत. “प्राचीन परंपरा जपण्यापेक्षा अमेरिकन मुलांच्या आरोग्यासाठी आणि प्रतिष्ठेसाठी बालविवाह थांबवणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे हबीब यांनी सांगितले. “त्यांना कायदेशीर करारांमध्ये प्रवेश करण्यापासून संरक्षण आवश्यक आहे. जीवनाबद्दल त्यांच्या स्वत:च्या निवडी करण्यासाठी सक्षमीकरण आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पृथ्वीवरून डायनासोर नष्ट करणारा अशनी आला कुठून? नवीन संशोधन काय सांगतं?
जुलै २०२३ पर्यंत चार राज्यांमध्ये म्हणजेच कॅलिफोर्निया, मिसिसिपी, न्यू मेक्सिको आणि ओक्लाहोमा येथ लग्नासाठीचे किमान वय नव्हते. कॅलिफोर्निया, इलिनॉय, मिसूरी आणि दक्षिण कॅरोलिना यांसारख्या राज्यांमध्ये १८ वर्षांखालील बालविवाहावर बंदी घालण्याचा कायदा प्रलंबित आहे. वकिलांचा असा युक्तिवाद आहे की, अल्पवयीन मुलांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी बालविवाहावर संपूर्ण देशात बंदी घालणे आवश्यक आहे. विवाहासाठी किमान वय निश्चित करणाऱ्या सर्वसमावेशक फेडरल कायद्याच्या अभावामुळे अनेक भागांत आजही ही प्रथा सुरू आहे, त्यामुळे हजारो अल्पवयीन मुले गैरवर्तन आणि शोषणास बळी पडत आहेत.