-अनिकेत साठे

पाकिस्तान हवाई दलाच्या ताफ्यातील एफ-१६ लढाऊ विमाने सक्षमपणे कार्यरत राखण्यासाठी अमेरिकेने ४५ कोटी डॉलरची लष्करी सामग्री पुरविण्याच्या घेतलेल्या निर्णयावर भारताने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. दहशतवादविरोधात लढाईसाठी पाकिस्तानला ही रसद दिली जात असल्याचा बचाव अमेरिकेने नेहमीप्रमाणे केला. स्थानिक दहशतवादी संघटनांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात अपयश आल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला लष्करी मदत थांबविली होती. अफगाणिस्तानातील सैन्य माघारीनंतर बायडेन प्रशासनाचे पाकिस्तानविषयक धोरण लवचिक झाले. या निर्णयाचा भारतावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पडणार आहे.

अमेरिकेने मंजूर केलेला प्रस्ताव काय आहे?

बायडेन प्रशासनाने पाकिस्तानच्या ताफ्यातील एफ-१६ लढाऊ विमानांच्या अद्ययावतीकरणासाठी ४५ कोटी डॉलरची सामग्री व उपकरणे पुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याअंतर्गत विमान आणि इंजिनचे सुटे भाग, आज्ञावली प्रणालीत सुधारणा, सुट्या भागांची दुरुस्ती, गरजेनुसार बदल, इंजिन सुधारणा, आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र सहाय्य, विमानाची संरचनात्मक अखंडता यासह अन्य तांत्रिक समन्वय गटात सहकार्य करण्यात येणार आहे.

धोरणात बदल कसे?

एफ-१६ विमानांचा देखभाल-दुरुस्ती कार्यक्रम अमेरिका-पाकिस्तानच्या द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे पाकिस्तानची एफ-१६ विमाने सक्षमपणे कार्यरत राहतील. दहशतवाद विरोधी कारवाईत हवाई क्षमता सुधारेल. हा निर्णय परकीय धोरण व राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे प्रादेशिक लष्करी संतुलन बिघडणार नसल्याचा दावा अमेरिका करीत आहे. गेल्या चार वर्षांत अमेरिकेकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला प्रथमच मदत मिळणार आहे. तालिबान आणि हक्कानी या दहशतवादी गटांना रोखण्यात, देशातील त्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानची दोन अब्ज डॉलर मदत रोखली होती. या निर्णयाने अमेरिकेच्या धोरणात बदल होऊन ते पुन्हा जुन्या वळणावर गेल्याचे मानले जात आहे.

भारताचा आक्षेप का?

दहशतवाद विरोधातील लढाईसाठी मिळालेल्या लष्करी आयुधांचा पाकिस्तान भारताला शह देण्यासाठी वापर करीत असल्याचा इतिहास आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल एफ-१६ विमाने भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी तैनात केली. एफ-१६ विमाने देताना अमेरिकेने काही अटी-शर्ती घातलेल्या आहेत. त्यांचे उल्लंघन झाल्याचे पुरावे सादर करूनही अमेरिकेने पाकिस्तानची कानउघाडणी करण्यापलीकडे काहीही केले नव्हते. पाकिस्तानकडील एफ-१६ विमानांच्या अद्ययावतीकरणाने पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्याचा संभव आहे. अमेरिकेच्या प्रस्तावाला भारतीय आक्षेपाचे ते मुख्य कारण आहे. अमेरिकन परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकांमध्ये एफ-१६ विमानांसाठी दिले जाणारे तंत्रज्ञान व उपकरणांवर भारताने चिंता व्यक्त केली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी देखभाल-दुरुस्ती करारातील तो एक भाग असल्यावर बोट ठेवले. अमेरिकेच्या निर्णयावर भारताने जाहीरपणे भूमिका मांडलेली नाही. पाच वर्षांपूर्वी अमेरिका पाकिस्तानला एफ-१६ विमाने विक्रीच्या विचारात होता. तेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यास निराशाजनक संबोधत निवेदनाद्वारे जाहीर भूमिका मांडली होती.

जागतिक हवाई शक्ती मानांकनात भारत, पाकिस्तान कुठे?

कोणत्याही हवाई दलाचे सामर्थ्य केवळ संख्यात्मक आकारमान नव्हे, तर कार्यक्षमता, लढाऊ शक्ती, पुरवठा व्यवस्थेतील पाठबळ, आधुनिकीकरण, तत्परतेने हल्ला चढविण्याची आणि  संरक्षणाची क्षमता आदी निकषांवर जोखली जाते. वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्टच्या (डब्लूडीएमएमए) २०२२मधील जागतिक हवाई शक्ती मानांकनानुसार तब्बल १६४५ सक्रिय लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, मालवाहू व प्रशिक्षण विमाने बाळगणारे भारतीय हवाई दल सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी हवाई दलाकडे ८०० लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर व मालवाहू विमाने असून ते जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानी आहे. या दलाकडे सुमारे ८५ बहुद्देशीय एफ-१६ विमाने आहेत. शीतयुद्धाच्या कालखंडापासून ती टप्प्याटप्प्याने मिळाली. त्यांच्या व्यवहारास भारताने वारंवार विरोध दर्शविला. अमेरिकेतील काही लोकप्रतिनिधी पाकिस्तानला विमाने, लष्करी मदत देण्यास नाखूश असतात. 

एफ-१६च्या अद्ययावतीकरणाने काय होईल?

विशिष्ट उड्डाण तास झाल्यानंतर लढाऊ विमानाची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती (ओव्हरहॉल) करावी लागते. सुट्या भागाची टंचाई, आधुनिक उपकरणांचा अभाव व तत्सम कारणांनी एफ-१६ विमाने कार्यप्रवण राखण्यास पाकिस्तानला मर्यादा आली होती. त्याचा हवाई शक्तीवर परिणाम झाला. ही स्थिती भारतीय हवाई दलासाठी फायदेशीर ठरली. एफ-१६ हे पाकिस्तानी हवाई दलातील प्रमुख बॉम्बफेकी विमान आहे. अण्वस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. अद्ययावतीकरणामुळे पाकिस्तानी हवाई दलाची कार्यक्षमता, लढाऊ क्षमतेला बळ मिळेल. भारतीय हवाई दलासाठी पूर्वीची स्थिती असणार नाही. दहशतवादविरोधी लढाईच्या नावाखाली पाकिस्तानला अमेरिकेकडून पुन्हा रसद मिळण्याचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. उभय देशातील संबंध वृद्धिंगत होण्यास नव्याने हातभार लागणार आहे.

Story img Loader