डेटिंग ॲप्सचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका अमेरिकन महिलेने डेटिंग ॲप्सचा वापर करून, अनेक वृद्ध नागरिकांची फसवणूक केली आहे. लास वेगासमधील अरोरा फेल्प्स या ४३ वर्षीय महिलेवर प्राणघातक असा रोमान्स स्कॅम केल्याचा आरोप आहे. खोट्या प्रेमाचे नाटक करून आयुष्यात एकट्या असणाऱ्या पुरुषांना तिने तिच्या सापळ्यात अडकवण्यासाठी डेटिंग ॲप्सचा वापर केला. डेटवर बोलावून, त्यांना ड्रग्ज देऊन त्यांची फसवणूक केली. त्यात काही जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. आता अमेरिकेची सर्वोच्च तपास संस्था फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)ने या प्रकरणाची माहिती देत, चोरीची संपत्ती, फसवणूक व दुःखद मृत्यू असे धक्कादायक तपशील समोर आणले आहेत. तपासात नक्की काय आढळून आले? नेमके हे प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ…

स्टिरॉइड्स रोमान्स स्कॅम

‘एफबीआय’च्या म्हणण्यानुसार, अरोरा फेल्प्सने अनेक बनावटी नावांचा वापर केला. तिची लास वेगास व ग्वाडालजारा या दोन्ही ठिकाणी घरे आहेत. टिंडर, हिंज व बंबल यांसारख्या डेटिंग ॲप्सद्वारे ती वृद्ध पुरुषांना लक्ष्य करायची. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तिने जाणीवपूर्वक आणि नियोजनासह वृद्ध पुरुषांना ड्रग देऊन लुटले. त्यांच्या बँक, सामाजिक सुरक्षा व सेवानिवृत्ती खात्यांची माहिती मिळवली आणि त्यांच्याकडील अनेक मौल्यवान वस्तूंचीदेखील चोरी केली. “हा तांत्रिकदृष्ट्या रोमान्स स्कॅम आहे; परंतु हा स्टिरॉइड्स रोमान्स स्कॅम आहे,” असे एफबीआयच्या लास वेगास विभागाच्या प्रभारी विशेष एजंट स्पेन्सर इव्हान्स म्हणाल्या. “आम्ही अलीकडच्या काळात यासारखे एकही प्रकरण पाहिलेले नाही. हे अतिशय भीषण आहे,” असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत तपासकर्त्यांनी ११ पीडितांची ओळख पटवली आहे. त्यापैकी तिघांनी २०१९ आणि २०२२ दरम्यान फेल्प्सच्या घोटाळ्यामुळे आपला जीव गमावला होता.

डेटिंग ॲप्सचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

जुलै २०२१ मध्ये फेल्प्सच्या गुन्ह्यांना सुरुवात झाली, असे मानले जाते. या काळात ती ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मद्वारे तिच्या पहिल्या पीडिताला भेटली. लास वेगासमध्ये दुपारचे जेवण करून तिने त्याला तिच्याबरोबर मेक्सिकोला येण्याची शिफारस केली. काही महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये तिने त्याच्या घरी जाऊन जेवणाची व्यवस्था केली; पण जेवल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्याचे भान गमावले आणि पाच दिवस तो याच अवस्थेत राहिला. फिर्यादी सांगतो की, तिने त्याच्या घराची तोडफोड केली. त्याचा आयफोन, आयपॅड, ड्रायव्हरचा परवाना व बँक कार्ड चोरले. तिने त्याच्या आर्थिक खात्यांमध्ये प्रवेश केला, पैसे हस्तांतरित केले, अनधिकृतपणे खरेदी केली आणि ३.३ दशलक्ष डॉलर्स किमतीचा अॅपल स्टॉक विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्याच्या खात्यातून पैसे काढू शकली नाही.

डिसेंबर २०२१ पर्यंत तिने दुसऱ्या एका व्यक्तीची फसवणूक केली. त्यांची भेट मेक्सिकोच्या ग्वाडालजारा येथील हॉटेलमध्ये झाली होती. तिने त्याच्याबरोबर काय केले हे स्पष्ट केले नाही. परंतु तो वर्षभर गायब होता. पुढच्या वर्षभरात तिने त्याच्या खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढले, ते पैसे स्वतःकडे ट्रान्सफर केले आणि त्याची बीएमडब्ल्यू गाडीही चोरली. फेडरल अधिकारी म्हणतात की, तिने स्वत:ला त्याच्या युनियन निवृत्ती खात्याचा लाभार्थी करण्याचाही प्रयत्न केला. मे २०२२ मध्ये फेल्प्सला ग्वाडालजारामध्ये आणखी एक जण भेटला. त्यांनी एकत्र वेळ घालवला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलीने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने कधीही उत्तर दिले नाही. चिंताग्रस्त मुलीने मेक्सिकन पोलिसांकडे धाव घेतली, ज्यांनी या प्रकरणाची तपासणी केली. तपासात तिचे वडील घराच्या छतावर मृतावस्थेत आढळले.

आरोपी नक्की कोण आहे?

डिसेंबर २०२३ मध्ये डझनभर एफबीआय एजंट आरोपी महिलेच्या घरी पोहोचले आणि रोमान्स स्कॅमअंतर्गत तिच्या सहभागाबद्दल तिला अटक करण्यात आली. आरोपीच्या पतीसाठी हा एक धक्का होता. पत्नीच्या सहभागाबद्दल धक्कादायक आरोप उघडकीस आल्यावर पती विल्यम फेल्प्स नि:शब्द झाला. “आम्ही एकमेकांना १४ वर्षांपासून ओळखतो आणि ती असे काही करत आहे, याचे संकेतही तिने कधी दिसू दिले नाहीत,” असे त्याने टाइम्सला सांगितले. “जर तिने हे केले असेल, तर तिने मलाही फसवले,” असा आरोप त्याने केला. विल्यमसाठी अरोरा नेहमीच एक सामान्य गृहिणी होती. तिचा कोणत्याही गुन्हेगारीत सहभाग असू शकतो, असा त्याला कधीच संशय आला नाही. “ती कोणाला मारण्याची किंवा कोणाला अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडणारी व्यक्ती नाही; परंतु, कोण, कधी व कसा बदलेल, हे सांगता येणे कठीण आहे,” असे तो म्हणाला.

‘द एलए टाइम्स’च्या मते, हे जोडपे पहिल्यांदा आय हॉपमध्ये काम करत असताना भेटले होते. विल्यमला माहीत होते की, ती तिच्या पूर्वपतीपासून विभक्त झाली आहे आणि त्या लग्नापासून तिला तीन मुले आहेत. त्यापलीकडे त्याला तिच्या भूतकाळाबद्दल फारशी माहिती नव्हती. ४३ वर्षीय महिलेकडे मेक्सिको आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे. तिने तिचे बालपण दोन्ही देशांमध्ये घालवले होते. एफबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा सुरुवातीला विल्यमला संशय आला. कारण- त्याच्या पत्नीने त्याच्या खात्यात काही पैसे हस्तांतरित केले होते. परंतु, नंतर त्याने पॉलीग्राफ चाचणी उत्तीर्ण केली आणि त्याचा यात कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.

किती जणांची फसवणूक?

‘एफबीआय’ला संशय आहे की, तिने अनेक जणांची फसवणूक केली आहे आणि माहिती असलेले अनेक जण पुढे येण्यास तयार नाहीत. एजन्सीने अधिकृत नोटिशीमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला अरोरा फेल्प्सच्या घोटाळ्यात बळी पडलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास, कृपया त्यांना स्वतः तक्रार नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करा. फेल्प्सवर बँक फसवणूक, अपहरण व मृत्यूला कारणीभूत असलेले अपहरण यांसह २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ती मेक्सिकोमध्ये तुरुंगात आहे. कारण- अधिकारी तिचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यासाठी न्याय विभाग आणि मेक्सिकन अधिकाऱ्यांसह काम करीत आहेत, अशी माहिती ‘एपी’च्या वृत्तात देण्यात आली आहे. सर्व आरोपांमध्ये दोषी ठरल्यास तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

Story img Loader