घातक स्वरूपाच्या क्लस्टर बॉम्बपाठोपाठ अमेरिकेकडून आता संपुष्टात आलेल्या (डिप्लिटेड) युरेनियमवर आधारित दारूगोळादेखील युक्रेनला दिला जाणार आहे. अमेरिका एम-१ ए-१ अब्राम्स या आपल्या मुख्य रणगाड्यात या शस्त्राचा वापर करते. शीतयुद्धाच्या काळात तत्कालीन सोव्हिएत रशियाचे रणगाडे भेदण्यासाठी हा विशेष प्रकारचा दारूगोळा विकसित झाला होता. त्यात युरेनियमचे गुणधर्म असल्याने अमेरिकेच्या कृतीवर संताप व्यक्त करीत रशियाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
डिप्लिटेड युरेनियम म्हणजे काय?
अणू इंधन आणि शस्त्रांमध्ये वापरलेले दुर्मीळ, समृद्ध युरेनियम तयार करण्याच्या प्रक्रियेतील हे एक उपउत्पादन आहे. समृद्ध युरेनियमपेक्षा ते कमी शक्तिशाली मानले जाते. त्याच्या वापरातून निर्मिलेल्या दारूगोळ्यात काही किरणोत्सारी गुणधर्म असतात. मात्र ते अण्वस्त्रांप्रमाणे आण्विक प्रतिक्रिया निर्माण करू शकत नाहीत. शिशापेक्षा अधिक घनता हेच त्याचे बलस्थान. या वैशिष्ट्यामुळे प्रक्षेपास्त्र म्हणून ते वापरले जाते. त्याची घनता, वेग इतका आहे की, लोखंडी कवचावर आदळल्यानंतर प्रचंड उष्णता निर्माण करून ते पेट घेते, असे तज्ज्ञ सांगतात. डिप्लिटेड युरेनियमच्या आधारे निर्मिलेला दारूगोळा जेव्हा लक्ष्यावर धडकतो, तेव्हा डोळे दीपवणारी ऊर्जा तयार होऊन टाकीतील इंधन व दारूगोळ्याचा स्फोट होतो आणि रणगाडा, चिलखती वाहने नष्ट होतात.
या दारूगोळ्याचा वापर कसा, कुठे?
संपुष्टात आलेल्या युरेनियमवर आधारित युद्धसामग्री अमेरिकेने अनेकदा वापरली आहे. १९९०-९१च्या आखाती युद्धात इराकचे टी -७२ रणगाडे भेदण्यासाठी त्याचा वापर झाला होता. नंतर इराकवर आक्रमणावेळी पुन्हा हेच आयुध वापरले गेले. सर्बिया आणि कोसोव्होत अमेरिकन रणगाड्यांनी हा दारूगोळा वापरल्याचा इतिहास आहे. आखाती युद्धादरम्यान सुमारे ३४० टन डिप्लिटेड युरेनियम युद्ध सामग्रीत वापरले गेले. तर १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात बाल्कनमध्ये अंदाजे ११ टन युरेनियम वापरण्यात आल्याचा अंदाज आहे.
धोक्याबाबत मत मतांतरे काय?
संपुष्टात आलेले युरेनियम अण्वस्त्र मानले जात नाही. पण, त्यातून कमी पातळीच्या किरणोत्सर्गाचा धोका असतो. त्यामुळे या प्रकारचा दारूगोळा वापरताना दक्षता घेण्याची गरज आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने मांडलेली आहे. त्याची कमीत कमी हाताळणी आणि तीदेखील संरक्षणात्मक पोशाखात व्हायला हवी. सामान्य नागरिकांनी तो दारूगोळा हाताळू नये. कारण, संपुष्टात आलेले युरेनियम एक विषारी रसायन आहे. त्याचा वापर जोखमीचा ठरतो. श्वसनातून शरीरात प्रवेश करणारे युरेनियमचे धुलीकण आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम व कर्करोगाला निमंत्रण मिळू शकते. या दारूगोळ्यावर बंदीसाठी आग्रही भूमिका घेणारा गट ही युद्धसामग्री भूजल आणि मातीत विष कालवू शकते, याकडे लक्ष वेधतो. परंतु, याबाबत मतमतांतरे आहेत. या शस्त्रास्त्रांच्या वापरावर अभ्यास करणाऱ्या लंडनच्या रॉयल सोसायटीच्या अहवालात त्याचे युद्धक्षेत्रातील सैनिक आणि या संघर्ष क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्यांच्या अवयवांवर होणारे धोके फार कमी असल्याचे म्हटले आहे. अत्यंत बिकट स्थितीत हे धोके निर्माण होण्याचा संभव असल्याचे ही संस्था मान्य करते. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणीय अहवालात या शस्त्राने व्यापक प्रदूषण झाले नसल्याचे अधोरेखित केले आहे. त्यास सर्बियातील काहींनी विरोध करीत या शस्त्राच्या वापराने ट्यूमरमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा केला आहे.