उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि राजकारणी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली असून या कारवाईचे काही लोकांनी स्वागत केले आहे, तर काही राजकीय पक्षांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या एन्काऊंटरची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. अतिक अहमद उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड समजला जातो. त्याच्याविरोधात १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सध्या तो गुजरातमधील तुरुंगात आहे. दरम्यान, अतिक अहमद, असद अहमद तसेच अतिक अहमद याच्या परिवाराचा उमेश पाल आणि राजू पाल यांच्या हत्येशी संबंध आहे, असा दावा केला जातो. याच पार्श्वभूमीवर अतिक अहमद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचा राजकारणातील प्रवेश, अहमद परिवाराचा उमेश पाल आणि राजू पाल यांच्या हत्येशी असलेला कथित संबंध काय? यावर नजर टाकू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असद अहमदचे एन्काऊंटर

अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीत असद अहमदसोबत त्याचा साथीदार गुलाम हादेखील ठार झाला आहे. उत्तर प्रदेशमधील झासी येथे गुरुवारी (१३ एप्रिल) ही चकमक झाली. याबाबत विशेष पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे. “असद आणि गुलाम यांचा उमेश पाल हत्या प्रकरणात शोध घेतला जात होता. त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या विशेष पोलीस पथकासोबत या दोघांची चकमक झाली. या चकमकीत असद आणि गुलाम ठार झाले,” असे प्रशांत कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा >> विश्लेषण : नवीन कर प्रणालीकडे जावे का?, कोणती कर रचना तुमच्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या

राजू पाल निवडणुकीत पराभूत पण चांगली कामगिरी केली

२००५ साली बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती. उमेश पाल या हत्येचे साक्षीदार होते. याच वर्षी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांचीदेखील त्यांच्या दोन साथीदारांसह हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्यांच्या केंद्रस्थानी अतिक अहमद आणि असद अहमद आहेत. २००२ साली राजू पाल यांनी अतिक अहमदविरोधात निवडणूक लढवली होती. अतिक अहमदने १९८९ साली पहिल्यांदा अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे त्याने ही निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून सलग १५ वर्षे अतिक अहमदने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अतिक अहमदने १९९६ साली समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. तसेच २००२ सालची निवडणूक लढण्यासाठी त्याने अपना दलमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीतही अतिक अहमदचा विजय झाला. मात्र अतिकविरोधात उभ्या राहिलेल्या राजू पाल यांनी तुलनेने चांगली कामगिरी केली.

हेही वाचा >> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी, पण महात्मा गांधींचा विरोध; जाणून घ्या ‘पुणे करारा’त काय ठरले?

राजू पाल यांनी बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवली

पुढे २००४ साली लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अतिक अहमदने आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अतिक अहमदचा लहान भाऊ अश्रफ याचा या निवडणुकीत विजय होईल, असे म्हटले जात होते. मात्र राजू पाल यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत पाच हजार मताधिक्याने विजय मिळवला. हा पराभव म्हणजे अतिक अहमदसाठी मोठा धक्का होता.

राजू पाल यांचा पोटनिवडणुकीत विजय

निवडणुकीच्या सहा महिन्यांनंतर म्हणजेच २५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल यांची हत्या करण्यात आली. ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपल्या गावी जात होते. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये त्यांच्यासोबत आणखी दोघांचा मृत्यू झाला होता. २००४ साली राजू पाल यांचा पोटनिवडणुकीत विजय झाला होता. याच कारणामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा पोलिसांनी केलेला आहे. या हत्येनंतर राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांनी धुमनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी अतिक अहमद, अश्रफ अहमद तसेच अन्य सात जणांवर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास करताना पुढे अलाहाबाद पोलिसांनी एकूण दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये अतिक अहमद, अश्रफ अहमद यांचा समावेश होता. दरम्यान, राजू पाल यांच्या हत्येनंतर अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अश्रफ अहमदचा विजय झाला. तर राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल पराभूत झाल्या. या खटल्यावर लखनौ येथील विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : गेहलोत-पायलट वादात राजस्थानचा ‘पंजाब’ होणार? नेत्यांमधील सत्तासंघर्षामुळे काँग्रेसची सत्ताच जाणार?

उमेश पाल यांचे अपहरण करून धमकी

राजू पाल हत्या प्रकरणात उमेश पाल हे प्रमुख साक्षीदार होते. २००७ साली त्यांनी एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत अतिक अहमदकडून मला सातत्याने धमकी दिली जात आहे. न्यायालयात माझ्या बाजूने साक्ष दे, असे सांगितले जात आहे; असा आरोप उमेश पाल यांनी केला होता. यासह अपहरण करून शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचाही दावा त्यांनी केला होता. उमेश पाल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर प्रयागराज पोलिसांनी अतिक अहमद, अश्रफ अहमद तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच वर्षी २८ मार्च रोजी उमेश पाल अपहरण प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमद, खान शौकत हनिफ, दिनेश पासी या तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अतिक अहमदविरोधात याआधाही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र या पहिल्याच प्रकरणात अतिक अहमद दोषी ठरला.

दबदबा कायम असल्याचे दाखवायचे होते म्हणून खून

उमेश पाल यांची या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात उमेश पाल यांच्यासह त्यांच्या दोन अंगरक्षकांचाही मृत्यू झाला. अतिक अहमद, त्यांची पत्नी शाहिस्ता परवीन, भाऊ अश्रफ अहमद, मुलगा असद अहमद यांचा उमेश पाल यांच्या हत्येत सहभाग आहे, असा दावा उमेश पाल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या हत्येच्या माध्यमातून, मी तुरुंगात असलो तरी माझा दबदबा अद्याप कायम आहे, असा संदेश अतिक अहमदला प्रयागराजच्या लोकांना द्यायचा होता; असा दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : श्रीमंतांच्या हौसेमुळेच शहरांमध्ये पाणीसंकट? केपटाऊन शहराविषयी केसपेपर काय सांगतो?

पाचपैकी चार जणांचा मृत्यू

उमेश पाल यांच्या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. या हत्याकांडात एकूण पाच जण सामील होते. या प्रकरणात विजय चौधरी अलियास उस्मान, अरबाज, असद अहमद, गुलाम, गुड्डू मुस्लीम हे पाच आरोपी सामील आहेत. यांपैकी एकूण चार जणांचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे.

अतिक अहमद कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास

अतिक अहमदच्या कुटुंबीयांवरही वेगवेगळ्या आरोपांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अतिक अहमदविरोधात सध्या १०० पेक्षा जास्त खटले आहेत. तर अतिक अहमदचा भाऊ अश्रफ याच्याविरोधात ५० गुन्हे दाखल आहेत. अतिक अहमदवर प्रयागराजमधील सॅम हिगिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अतिक अहमदला फेब्रुवारी २०१७ मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून अतिक अहमद तुरुंगात आहे. सध्या त्याला गुजरातमधील साबरमती येथील तुरुंगात हलवण्यात आलेले आहे

हेही वाचा >> आजारी असल्याचे सांगून १५ दिवसांची पोलीस कोठडी टाळता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

मुलाचा मृत्यू, पत्नी फरार

आता अतिक अहमदवरील आरोपांमध्ये उमेश पाल हत्या प्रकरणाची भर पडलेली आहे. उमेश पाल हत्या प्रकरणात पोलिसांनी अतिक अहमद, अतिक अहमदचा मुलगा असद, पत्नी शाहिस्ता परवीन, भाऊ अश्रफ तसेच इतरांवर गुन्हा दाखल केलेला आहे. असद अहमदचा मृत्यू झाला आहे. अश्रफ अहमद बरेली येथील तुरुंगात आहे. तर शाहिस्ता परवीन सध्या फरार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh gangster atiq ahmed son asad ahmed encounter know umesh pal raju pal murder case prd
Show comments