Polygamy in India:उत्तराखंड सरकारने अलीकडेच बहुपत्नीत्वाचा कायदा रद्द करत समान नागरी कायदा पारीत केला. बहुपत्नीत्व असे म्हटले की, आपल्या नजरेसमोर केवळ मुस्लीम समाजच येतो. मात्र याच भारतात मानाने वावरणाऱ्या अनेक समाजांमध्येही बहुपत्नीत्व प्रथा होती. आणि महत्त्वाचे म्हणजे मध्ययुगात या प्रथेला विशेष महत्त्वही होते. समान नागरी कायदा आणि बहुपत्नीत्व प्रथा रद्द करण्याच्या निमित्ताने मध्ययुगीन भारतातील बहुपत्नीत्व असलेल्या समाजांपैकी राजपूत परंपरांचा घेतलेला वेध.
राजपूत म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते घोड्यावर बसलेल्या आणि हातात तालावर घेतलेल्या योद्ध्याचे. मध्ययुगीन इतिहास हा राजपुतांच्या शौर्यासाठी ओळखला जातो. याच पराक्रमाची परंपरा अबाधित ठेवण्याकरता राजपुतांनीही विवाह संस्थेचा आधार घेतला. उच्चभ्रू राजपूतांनी योद्धे निर्माण करण्यासाठी विवाह संस्थेचा वापर केला. याचा परिणाम म्हणून, मध्ययुगीन राजस्थानी समाजात – विशेषतः राजपूतांमध्ये – स्त्रियांची पुनरुत्पादक भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली, असे सबिता सिंग यांनी त्यांच्या “द पॉलिटिक्स ऑफ मॅरेज इन मिडीवल इंडिया: जेण्डर अँड अलायन्स इन राजस्थान” या ग्रंथात नमूद केले आहे. त्याकाळात विवाह आणि त्या संदर्भातील विचार पूर्णपणे राजकीय हेतूंच्या अधीन होते, या कालखंडात वराला आधीपासूनच किती पत्नी आहेत किंवा त्याचा या आधी किती वेळा विवाह झाला आहे हे महत्त्वाचे नव्हते. बहुपत्नीत्त्व हे तत्कालीन राजकीय खेळीचा भाग होते. बहुतांश वेळा हे विवाह आपत्कालीन परिस्थितीत देखील होत असत.
अधिक वाचा: Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय?
बहुपत्नीत्त्व कशासाठी?
इतिहासचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यन्त बहुपत्नीत्व ही प्रथा वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्त्वात होती. वैदिक विवाह संस्था ही एकपत्नीत्त्वाला प्रोत्साहन देणारी असली तरी राजघराण्यांमध्ये एकापेक्षा अधिक पत्नी करण्याची परंपरा होती. वेदोत्तर कालखंडात बहुपत्नीत्त्व ही पद्धत समाजाकडून पूर्णतः स्वीकारली गेली. तरी धर्मशास्त्रानुसार पहिल्या पत्नीला अपत्य प्राप्ती होत नसेल तरच दुसरा विवाह करण्याची मुभा होती. मध्ययुगीन काळात केवळ आई होणे हे महत्त्वाचे नव्हते तर पुत्र असणं हे अधिक महत्त्वाचे होते. किंबहुना ही स्थिती सांगणारी अनेक लोकगीते आजही उपलब्ध आहेत. एका मारवाडी गीतात याच भीषण परिस्थितीचे वर्णन करण्यात आलेले आहे, या गीतात मुलगी होणार असेल तर त्या स्त्रीचा बिछाना कचराकुंडीजवळ लावण्यात येत असे आणि जर मुलगा होणार असेल तर त्या स्त्रीच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जात असत अशा स्वरूपाचे संदर्भ सापडतात.
राजपूत समाजातील बहुपत्नीत्त्वाची उदाहरणे
निहालदे सुलतान ही राजस्थानी लोककथा आहे, यातील संदर्भानुसार फुल कुमारला १७ राण्या आणि गलालेंगला तीन पत्नी होत्या. गुर्जर प्रतिहार यांच्या इतिहासातील महेंद्र पाल (इ. स. ८९२-९१०) हा महत्त्वाचा राजा होता. त्याच्या कालखंडात त्याने गुर्जर-प्रतिहार राज्याचा विस्तार नर्मदेपलीकडे केला होता. याला दोन पत्नी होत्या, परंतु नंतरच्या कालखंडातील संदर्भानुसार पृथ्वीराज तिसरा (इ. स. ११७७-११९२) याच्या काळापर्यंत, महेंद्र पाल याच्या पत्नींच्या संख्येत वाढ झाल्याचे संदर्भ आढळतात.
रावल बाप्पा यांची मेवाडच्या इतिहासातील भूमिका महत्त्वाची होती. रावल बाप्पाने एकूण १४० महिलांशी विवाह केल्याचे मानले जाते. ही अतिशयोक्ती असू शकते परंतु उच्चभ्रू राजपूतांमध्ये असणाऱ्या बहुपत्नीत्त्वाची प्रचिती यातून येते. किंबहुना ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये बाप्पा रावल याने पराभूत केलेल्या राजांनी आपल्या मुलींचे विवाह त्याच्याशी लावून दिले. याशिवाय चुडा हा मंडोवरचा शासक होता त्याला १० राण्या आणि १४ पुत्र होते. राव मालदेव यांना १६ राण्या असल्याचा उल्लेख आहे. मारवाडचा राजा उदयसिंग यांना २७ राण्या होत्या, जवळपास ५० पुत्र आणि आणि असंख्य मुली होत्या. राजा उदयसिंग यांना २७ पत्नी असूनही एका ब्राह्मण मुलीचा मोह झाला होता. म्हणूनच, दुसऱ्या विवाहासंबंधी उच्चभ्रू राजपूतांमध्ये प्रत्यक्षात काय संकल्पना होत्या हा विषय अभ्यासकांमध्ये संशोधनाचा ठरला आहे. प्राचीन ‘हिंदू’ कायद्यांनुसार पहिली पत्नी संततीने संपन्न असेल दुसरा विवाह निषिद्ध होता, परंतु राजपूत अभिजात वर्गाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
अधिक वाचा: लडाखी जनता रस्त्यावर का उतरली? गिलगिट-बाल्टिस्तान संदर्भात त्यांची मागणी नेमकी काय आहे?
राजपूत राण्यांनी केलेला विरोध
मेहवाच्या रावल जगमाल चौहान याला पहिली पत्नी होती. तिच्यापासून तीन पुत्र होते, त्यामुळे मूलतः लग्नाचा उद्देश पूर्ण झाला होता, राज्याला उत्तराधिकारी होते. तरीही जगमालने गेहलोत राजकुमारीशी लग्न केले. यामुळे जगमाल चौहान यांची प्रथम पत्नी नाराज झाली आणि निषेध म्हणून ती तिच्या वडिलांच्या ठिकाणी बहरमेरला गेली. किंबहुना जगमालने तिला परत आणण्याचे कष्टही घेतले नाहीत. पतीच्या बहुपत्नीक विवाहाविरुद्ध पत्नीने केलेला हा निषेध अपवाद ठरला, कारण या प्रकारची सामाजिक व्यवस्था तत्कालीन समाजाने मान्य केली होती. पत्नी, उपपत्नी असणे हे स्त्रियांकडूनही स्वीकारले गेले होते. तरीही विरोधाची तुरळक उदाहरणे सापडतात. राणी उमाडे भटियानी ही तिच्या विरोधासाठी आजही ओळखली जाते. उमाडे भटियानी ही जैसलमेरच्या रावल लुणकरन यांची कन्या होती. तिने आपल्या पतीच्या राजा मालदेवाच्या घरी जाण्यास नकार दिला होता. राजा मालदेव हा भारमाली नामक दासीवर भाळला होता, त्यामुळे राणीने हे सहन न होऊन राजा सोबत नांदण्यास नकार दिला होता.
विवाह संस्था आणि मध्ययुगीन राजकीय उद्देश
तत्कालीन समाजात विवाह संस्था ही राज्यसत्तेच्या देखभाल आणि एकत्रिकरणासाठी महत्त्वाची मानली जात होती. बहुपत्नीत्त्वाच्या माध्यमातून स्पर्धात्मक सत्ताधारी वर्गामध्ये लष्करी आणि राजकीय युती करण्यात आली. किंबहुना विवाह संस्थेचा वापर राज्यविस्तारासाठी राजरोसपणे करण्यात आला. विवाह संबंधातून जमीन, प्रभाव, सत्ता, सन्मान, दर्जा, युती अशा अनेक गोष्टी साधता, मिळविता येते होत्या. यामुळेच मध्ययुगीन राजपूत समाजात विवाह हा परिस्थिती सुधारण्याचा एक मार्ग म्हणून पाहिला गेला. पंधराव्या शतकाच्या मध्यात मारवाडचे राठोड प्रसिध्द झाले, तेव्हा त्यांच्याशी विवाहबंधनाची उत्सुकता होती. त्याचप्रमाणे शेखावत आणि वाघेला यांसारख्या कुळांचा मुघलांच्या मनसबदारी व्यवस्थेत प्रवेश झाल्यामुळे त्यांची वाढलेली प्रतिष्ठा वैवाहिक क्षेत्रातही दिसून आली.
अधिक वाचा: पुलवामा: दहशतवादी हल्ल्याची पाच वर्षे- नक्की काय घडले होते?
विवाह आणि मानापमान
बहुपत्नीत्वाच्या प्रथेचे अस्तित्व राजपूतांमधील सन्मानाच्या कल्पनेशी देखील जोडलेले होते. मुलींच्या बाजूने विवाह प्रस्ताव नाकारणे हा अपमान मानला जात होता. विवाहाचा प्रस्ताव पाठवला की, तो कृपापूर्वक स्वीकारायचा अशीच पद्धत होती. प्रस्ताव नाकारला गेला तर तो अपमान समजला जात होता. जयपूरचा महाराजा माधो सिंग याने बुंदीचे महाराजा उम्मेद सिंग यांनी पाठवलेला प्रस्ताव नाकारला होता, त्या वेळेस दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला होता. किंबहुना प्रस्ताव नाकारणे हे वर पक्षाकडून ही होत असे. यासंदर्भातील अनेक दाखले उपलब्ध आहेत.
एकूणच मध्ययुगीन कालखंडात विवाह हे केवळ प्रेम, नाते संबंध इतक्यापुरता मर्यादित नव्हते. तर त्यामागे साम्राज्य विस्तार हा प्रमुख राजकीय हेतू असल्याचे उघड आहे.