मुलीने घराचा उंबरठा ओलांडायचा नाही, अशी मानसिकता गडद असलेल्या काळात एक मुलगी चक्क पृथ्वीचा उंबरठा ओलांडून अवकाशात भरारी घेते, ही बाबच जगातील समस्त स्त्रीजातीला प्रेरणा देणारी ठरते. १६ जून १९६३ रोजी असेच घडले आणि व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांनी अंतराळात उड्डाण करण्याचा विक्रम केला. अशाप्रकारे अंतराळात झेपावणारी त्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांच्या या कृतीने जगभरातील महिलांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धारिष्ट्य प्राप्त झाले. या सगळ्या अभूतपूर्व कामगिरीला पृथ्वीवरील दोन देशांमध्ये असलेल्या एका वैमनस्याचीही पार्श्वभूमी होती. त्यावेळी अमेरिका अन् रशिया (तत्कालीन सोव्हियत युनियन) यांच्यात दुसऱ्या महायुद्धानंतर ‘शीतयुद्ध’ सुरू होते. त्या शीतयुद्धामध्ये जमिनीबरोबरच अवकाशदेखील कोण काबीज करू शकते, अशी ईर्षा सुरू होती. या ईर्षेतूनच रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा या महिलेला अंतराळात पाठवून नवा विक्रम केला. हा पराक्रम करताना व्हॅलेन्टिना फक्त २६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या या यशस्वी मोहिमेमुळे त्या जगभरात चर्चेत आल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. रशियातील एअरफोर्समधील सर्वोच्च स्थान भूषवणारी त्या पहिल्या अन् आजवरच्या एकमेव महिला ठरल्या. नंतरही त्या रशियामध्ये अनेक मानाची पदे भूषवत राहिल्या. रशिया आणि अमेरिकेत कोणत्या प्रकारचे शीतयुद्ध होते आणि या मोहिमेसाठी व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांची निवड कशी झाली, हे पाहणे रंजक ठरेल.
हेही वाचा : विश्लेषण: परदेशी शिष्यवृत्तीच्या नवीन धोरणाला बहुजन विद्यार्थ्यांचा विरोध का?
जमिनीबरोबरच अवकाशही काबीज करण्याचे ‘शीतयुद्ध’
१९४५ साली झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये अधिक शक्तिशाली होण्याची तसेच दुसऱ्यापेक्षा अधिक प्रभावी ठरण्याची चढाओढ सुरू झाली. अर्थात, हे थेट युद्ध नव्हते; म्हणूनच त्याला ‘शीतयुद्ध’ म्हटले गेले. जवळपास काही दशके हे शीतयुद्ध सुरू होते. दुसऱ्या देशापेक्षा आपण अधिक पुढे कसे असू, या ईर्षेतून अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्याकाळी दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आली होती. त्यामुळे ईर्षेची जागा सूडाने घेतली तर मानवी अस्तित्व क्षणार्धात जळून खाक होईल, या एकाच भीतीच्या सावटाखाली संपूर्ण जग होते. ब्रिटीश लेखक जॉर्ज ऑरवेल यांनीच या प्रकारासाठी ‘कोल्ड वॉर’ अर्थात ‘शीतयुद्ध’ ही संज्ञा प्रथम वापरली. ‘यू अँड द ॲटम बॉम्ब’ आपल्या वैचारिक लेखामध्ये ही संज्ञा वापरत त्यांनी शीतयुद्धामुळे जग भीतीच्या सावटाखाली असल्याचे म्हटले होते. अमेरिका आणि रशियामध्ये असलेल्या याच वैमनस्यातून ‘स्पेस रेस’ अर्थात अवकाश काबीज करण्याचीही स्पर्धा सुरू झाली. १९५५ पासूनच हे दोन्ही देश यावरून अतोनात स्पर्धा करत होते. अंतराळात पहिला उपग्रह कुणाचा जाईल इथपासून ते अंतराळात पहिली व्यक्ती कोणत्या देशाची जाईल इथपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा झाली. रशियाने युरी गागारिनला १९६२ साली अवकाशात पाठवून अमेरिकेपुढे बाजी मारली. त्यानंतर सोव्हिएत रशियात स्त्री-पुरुष समानता कशी नांदते आहे, हा संदेश जगाला देण्यासाठी स्त्रीला अवकाशात पाठवण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला
अंतराळात झेपावणारी पहिली महिला
व्हॅलेन्टिना व्लादिमिरोव्हना तेरेश्कोवा यांचा जन्म १९३७ साली रशियातील बोलशोये मास्लेनिकोव्हो या ठिकाणी झाला. तिचे वडील युद्धात शहीद झाले होते. स्त्रीला अंतराळात पाठवण्याची घोषणा केल्यानंतर या निवडीसाठी सुमारे चारशे स्त्रियांचे अर्ज आले होते, त्यातून पाच जणी निवडण्यात आल्या. त्यांचा ‘फिमेल कॉस्मोनट ग्रुप’ स्थापन करण्यात आला. त्यांना प्रत्यक्ष ट्रेनिंग देण्यास सुरुवात झाली. यातील व्हॅलेन्टिना या अधिक प्रभावी उमेदवार ठरल्या. कारण शिक्षण घेत असतानाच व्हॅलेन्टिना यांना पॅराशूटमधून उडी मारायच्या खेळाची आवड निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. एका बाजूला एखाद्या महिलेला अंतराळात पाठवण्यासाठी अमेरिका तेवढा उत्सुक नव्हता, तर दुसऱ्या बाजूला रशियाला या माध्यमातून जगभरात एक वेगळा संदेशही द्यायचा होता आणि अमेरिकेवर चढाईदेखील करायची होती. जेव्हा रशियामध्ये व्हॅलेन्टिना यांची अंतराळात जाण्यासाठी निवड होऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात होते, तेव्हा अमेरिकेतही एका महिलेने अंतराळात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत ‘नासा’च्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की, “नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) कडून आलेले उत्तर फारसे उत्साहवर्धक नव्हते. अंतराळामध्ये महिलांना पाठवण्यासाठी सध्या आम्ही कोणतीही योजना आखलेली नाही.”
हेही वाचा : आता तरुणींमध्ये वाढत आहे एआय बॉयफ्रेंडची लोकप्रियता; कारण काय?
दुसरीकडे, रशियाने निवडलेल्या पाचही महिलांना सोव्हिएत हवाई दलात सामील करून घेतले. त्यांना कठोर लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच रॉकेट तंत्रज्ञान, खगोलशास्त्र आणि हवाई वाहतूक तंत्रांचे शिक्षणही दिले. १६ जून १९६३ रोजी व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांनी वॉस्टोक-६ या अवकाशयानातून अंतराळात उड्डाण केले. उड्डाणापूर्वी तिने काढलेले उत्स्फूर्त उद्गार प्रसिद्ध आहेत. “हे आकाशा, तुझी टोपी काढून ठेव. मी येत आहे.” (हे स्काय, टेक ऑफ युवर हॅट, आय ऍम कमिंग) त्यानंतर आपल्या अंतराळयानाच्या खिडकीतून बाहेर पाहत ती म्हणाली की, “मी क्षितिजाला पाहिले. हा निळ्या रंगाचा एक सुंदर असा पट्टा आहे. ही आपली वसुंधरा आहे. किती सुंदर आहे ती! सगळे काही छान होईल.” आजपर्यंत तेरेश्कोवा ही अंतराळात उड्डाण करणारी सर्वात तरुण महिला आहे. तसेच एकट्याने अंतराळ प्रवास करणारी ती एकमेव महिला अंतराळवीर आहे. ती जवळजवळ तीन दिवस अवकाशात राहिली. पृथ्वीभोवती ४८ फेऱ्या मारून स्त्रियांच्या शरीरावर शून्य गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो, याची टिपणेही तिने घेतली होती. तसेच क्षितिजाचे प्रथमच वरून फोटो काढले होते.
पृथ्वीवर परतल्यानंतर व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांची कामगिरी
अंतराळात झेपावून पृथ्वीवर परतल्यानंतरही व्हॅलेन्टिना रशियातील तेवढ्याच महत्त्वाच्या व्यक्ती आजतागायत राहिल्या आहेत. त्या कम्युनिस्ट पार्टीच्या महत्त्वाच्या नेत्या ठरल्या. त्यांची १९६८ मध्ये सोव्हिएत महिला समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. सोव्हिएत रशियामध्ये पुरुषी वर्चस्व होतेच, त्यामुळे त्यांनी महिलांचे प्रतिनिधित्व वेगवेगळ्या ठिकाणी वाढत राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी अंतराळातील मोहिमेच्या पाच वर्षांनंतर आपले शिक्षण पूर्ण केले. त्या डिस्टीक्शनमध्ये कॉस्मोनट इंजिनीयर झाल्या. १९७७ साली त्यांनी याच विषयात पीएच.डी. मिळवली. १९९७ साली त्या रशियन हवाई दलातून निवृत्त झाल्या. २०११ पासून त्या रशियाच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्य आहेत.