Ancient Sanskrit love poem: प्रेमाचं नेमकं स्वरूप काय, किंवा प्रेमाची नेमकी व्याख्या आहे तरी काय यावर नेहमीच उहापोह होताना दिसतो. जितक्या प्रकृती तितकी या प्रश्नांची उत्तरं. किंबहुना त्यामुळेच प्रेम किंवा प्रणय हा कवी, लेखकांचा नेहमीच आवडीचा विषय राहिलेला आहे. भारतीय साहित्याचा इतिहास प्रगल्भ आहे. याच परंपरेतील एक प्रसिद्ध काव्यरचना म्हणजे चौरपञ्चाशिका. चौरपञ्चाशिका म्हणजे ‘प्रेमाचा चोर’. यावरून कदाचित अनेकांना गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेलं ‘कल रात मेरे घर एक चोर आया’ हे गाणं आठवलं असेल. माझं जे काही आहे ते तुझचं आहे, हा त्या गाण्याचा आशय. अनेकांना हे गाणं आवडलं तर वेगळ्या अर्थाने या गाण्याला विरोध करणारेही होते. तो भाग वगळल्यास श्रोत्यांनी या गाण्याचा अर्थ आपापल्या परीने काढला. कोणाला त्या चोराच्या रूपात बालकृष्ण दिसला, तर कोणाला प्रेयसीला भेटायला आलेला प्रियकर, तर काहींना इतर काही. एकूणच या गाण्यातील चोराने अनेकांना मोहीत केले होते. हाच प्रेमाचा चोर वेगळ्या रूपात चौरपञ्चाशिका या काव्यातही येतो.
चोर आणि राजकन्या
चौरपञ्चाशिका ही एक संस्कृत प्रेमकाव्यरचना असून या काव्यातील ५० श्लोकांमध्ये एका चोरातील आणि राजकन्येमधील गूढ प्रेमकथेचे वर्णन केले आहे. या हजार वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या कवितेचा अनुवाद अनेक भाषांमध्ये करण्यात आला आहे, तसेच प्रांतिक बदलानुसार त्याचे पुनर्लेखन देखील करण्यात आले आहे. या कवितेची मांडणी अनेक स्वरूपात झाल्यामुळे तिचे मूळ स्वरूप नेमके काय आहे? हेच रहस्य ठरले आहे. चौरपञ्चाशिकेच्या रचनेमागे एका चोराच्या आणि राजकन्येच्या प्रेमकथेचा दाखला दिला जातो. प्रसिद्ध विदुषी बार्बरा स्टोलर मिलर यांनी म्हटले आहे की, ‘चौर’ म्हणजे हृदय चोरणारा चोर, प्रेमाचा चोर किंवा साधा चोर. जेव्हा त्याचे गुप्त प्रेम उघडकीस येते, तेव्हा त्याला पकडून तुरुंगात टाकले जाते आणि मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.
प्रांतपरत्वे काव्याचा शेवट
फासावर जाण्याच्या प्रतिक्षेत असताना त्याने आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे हे काव्य रचले. प्रांतप्ररत्वे या काव्याचा शेवट बदलतो. उत्तरेकडच्या आवृत्तीत हा शेवट दुःखद आहे. तर पश्चिमेकडच्या आणि दक्षिणेकडच्या आवृत्त्यांमध्ये सुखांत आहे. कथेत म्हटल्याप्रमाणे राजा चोराच्या कवितेने प्रभावित होतो आणि आपल्या कन्येचा चोर-कवीशी विवाह लावण्यास संमती देतो. प्रांतपरत्वे होणारा बदल बार्बरा स्टोलर मिलर यांनी दिला आहे. त्यांच्या १९७१ मधील “Phantasies of a Love Thief: the Caurapañcāśikā Attributed to Bilhana” या पुस्तकात त्यांनी चौरपञ्चाशिकेच्या दोन प्रमुख आवृत्त्यांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. हा फरक त्यांच्या संशोधनातील पहिला महत्त्वाचा निष्कर्ष होता.
एकच कविता, परंतु लेखक अनेक
एकूणच कवितेच्या प्रसिद्ध विषयामुळे या कवितेचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. काही कवींनी आपल्या पद्धतीने त्याचे पुनर्लेखन केले. त्यामुळे एकाच काव्यरचनेच्या अनेक आवृत्या निर्माण झाल्या. काही आवृत्त्यांमध्ये चोराची ओळख प्रत्यक्ष कवीशी मिळती- जुळती करण्यात आली आहे. त्यामुळे कथा आणि काव्य एकमेकांत मिसळून जातात. तर इतर आवृत्त्यांमध्ये कवीने हा चोराचा अनुभव त्याच्या मृत्यूनंतर संकलित केला आहे. त्यामुळे चोर आणि कवी वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे, तर काही आवृत्त्यांमध्ये केवळ राजकन्येचेच नाही तर राजाचेही नाव बदलण्यात आले आहे. या दोन प्रमुख आवृत्त्यांमध्ये तसेच काही नंतरच्या काव्यांमध्ये लेखक म्हणून बिल्हण याचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. म्हणूनच काही आवृत्त्या बिल्हणकाव्य म्हणून ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, मिलर यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू असलेली चौरपञ्चाशिका ही १६ व्या शतकातील राजस्थानी चित्रमय आवृत्ती होती (ही आवृत्ती गुजरात म्युझियम सोसायटी, अहमदाबाद येथे आहे). या काव्यात बिल्हण राजकन्या चंपावतीचा प्रियकर म्हणून चित्रित केला आहे.
मूळ कवी नक्की कोण?
तरीदेखील, ह्या काव्याचा मूळ कवी नक्की कोण? यावर सुरुवातीपासूनच शंका घेतली जात आहे. या काव्यात उल्लेख असलेला राजा वीरसिंह हा बिल्हणाच्या आधी राज्य करत होता. त्यामुळे या काव्याची संपूर्ण पार्श्वभूमी अद्याप गूढच राहिली आहे. पूर्वेकडे लिहिल्या गेलेल्या आवृत्तीत चोराचे नाव भिन्न आहे. या आवृत्तीत कविता कालिका देवीच्या स्तुतीपर आहेत आणि त्या आवृत्तीचा रचनाकार चौरपल्लिचा राजकुमार सुंदर आहे. त्याने विद्येवर प्रेम केले आणि त्याच्या प्रेमामुळेच तिच्या वडिलांनी राजा वीरसिंहाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. परंतु सरते शेवटी त्याचा राजकन्येशी विवाह होतो.
एक काव्य, अनेक रूपं
वेगवेगळ्या आवृत्त्या अगदी बिल्हणाच्या हयातीतच विकसित झाल्या. इतिहासकार रॉबर्ट फ्रेझर यांचे मत आहे की, प्राचीन ग्रंथांच्या विविध आवृत्त्या असणे अपरिहार्यच होते. ११ व्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतात भाषिक वैविध्य मोठ्या प्रमाणात फुलू लागले. संस्कृतसारख्या वैश्विक भाषेत रचले गेलेले ग्रंथ विविध प्रादेशिक भाषांमध्ये पुन्हा लिहिले जाऊ लागले.
कवी कोण हे महत्त्वाचे आहे का?
काही अर्थांनी या काव्याचा खरा कवी कोण हे फारसे महत्त्वाचे नाही. अनेक प्राचीन ग्रंथांचे अनेकदा पुनर्लेखन होत असते. थॉमस ट्रॉटमन यांनी याबाबत म्हटले आहे की, अर्थशास्त्राचा देखील हा प्रवास असाच झाला. अर्थशास्त्राच्याही अनेक आवृत्या आहे. परंतु, चाणक्याच्या आवृत्तीला सर्वाधिक महत्त्व मिळाले आणि तीच सर्वस्वी प्रस्थापित झाली.
चौरपञ्चाशिका
चौरपञ्चाशिका संस्कृत काव्यपरंपरेतील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. भर्तृहरी आणि अमरु यांसारख्या श्रेष्ठ कवींच्या परंपरेत ही काव्यरचना मोडते. तसेच, या काव्यात एक चोर राजकन्येचे हृदय जिंकतो, ही कल्पना अनेकार्थाने उलथापालथ करणारी आहे. या कवितांमध्ये एक विशेष शैली आहे. प्रत्येक श्लोक अद्यापि या शब्दाने सुरू होतो. त्याचा अर्थ आजही किंवा अजूनही असा होतो. बार्बरा स्टोलर मिलर (१९७१) यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरात श्लोक अद्यापि याच शब्दाने सुरु होतात. रिचर्ड गोंब्रिच यांच्या आवृत्तीत हे श्लोक अद्यापि ऐवजी मी अजूनही आठवतो किंवा मी अजूनही स्मरतो अशा प्रकारे सुरू होतात.
कवीचे रहस्योद्घाटन
कवीचा शोध लावण्याचा किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचे तर बिल्हणच हा कवी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न अनेक शतकांतील आणि प्रदेशांतील अभ्यासकांसाठी एक आव्हान होते. हा ग्रंथ केवळ १८४० च्या सुमारास पौर्वात्य विषयातील विद्वानांनी शोधून काढला असा काही अभ्यासकांनी दावा केला. परंतु, हा दावा चुकीचा आहे. चौरपञ्चाशिका हा काव्यग्रंथ नेहमीच लोकप्रिय होता आणि त्याच्या भारतीय भाषांतील अनेक आवृत्त्या त्याचेच द्योतक आहेत.
बिल्हणाच्या लेखनसिद्धतेचा शोध
हा ग्रंथ खरोखरच बिल्हणाने लिहिलाय का, हे सिद्ध करण्यासाठी विविध ठिकाणांहून हस्तलिखितांचे संशोधन करण्यात आले. बार्बरा स्टोलर मिलर यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि युरोपातील काही विद्यापीठांमध्ये याची काही हस्तलिखिते सापडली. परंतु, त्याशिवाय भारतभर पन्नासाहून अधिक प्रति उपलब्ध होत्या. चेन्नईतील अडयार, मुंबई, बडोदा, पुण्यातील डेक्कन कॉलेज आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, तसेच अहमदाबाद, जयपूर आणि जम्मूतील संग्रहालये व ग्रंथालये येथेही या ग्रंथाच्या विविध हस्तलिखित आवृत्त्या सापडल्या आहेत. या हस्तलिखितांतील फरक अभ्यासणे हे एक वेगळे संशोधन क्षेत्र आहे. लेखनशैली कशी विकसित झाली, मजकूर वेगवेगळ्या प्रदेशांत कसा प्रसृत झाला आणि त्याच्या आवृत्त्यांमध्ये कोणते बदल झाले याचा अभ्यास यामधून करता येतो.
बिल्हणाची ओळख
हा ग्रंथ नेमका कोणी लिहिला, हा अनेकार्थाने संशोधनाचा विषय असला तरी बिल्हणाचा उल्लेख शोधणे फारसे कठीण नव्हते. बिल्हणाचे नाव चौरपञ्चाशिके व्यतिरिक्त विक्रमांकदेवचरित या ग्रंथातही आढळते. ही काव्यात्मक राजचरित्ररचना असून चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा (१०७६-११२६ ) याच्या जीवनाचा इतिहास सांगणारी आहे. (भारतीय इतिहासात १४ विक्रमादित्य होऊन गेले आणि यातील हा एक अत्यंत प्रसिद्ध राजा मानला जातो.
चौरपञ्चाशिका आणि विक्रमांकदेवचरित यामधील समानता
यापैकी विक्रमांकदेवचरित हा वेगळ्या प्रकारचा ग्रंथ आहे, पण तरीही चौरपञ्चाशिका आणि यातील काही भागांमध्ये समानता आढळते. विशेषतः अध्याय ८ आणि ९ मध्ये एका राजकन्येच्या विवाहाचा उल्लेख येतो आणि तिचे नाव चंद्रलेखा असे आहे. हे नाव चौरपञ्चाशिकेच्या काही आवृत्त्यांमध्ये देखील आढळते. तसेच, बिल्हणाच्या काव्यशैलीत स्त्रीसौंदर्याचे वर्णन करण्याची हातोटी दिसते. अगदी युद्धाच्या वर्णनातही तो सौंदर्यदृष्टी ठेवतो. उदाहरणार्थ, राजाच्या तलवारीच्या काळ्या धारेचे वर्णन तो स्त्रीच्या काजळासारखे करतो. ही शैली आणि वर्णनपद्धती पाहता, चौरपञ्चाशिका ही बिल्हणानेच रचली असावी, असा निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी काढला आहे.
बिल्हणाच्या ‘कर्णसुंदरी’ नाटकातील समानता
बिल्हणाने रचलेल्या चार अंकी ‘कर्णसुंदरी’ नाटकातही काही समानता दिसून येते. ही कथा राजा कर्णाच्या एका अप्सरेसारख्या सुंदर राजकन्येशी झालेल्या विवाहाविषयी आहे. यावरून त्याची चौफेर साहित्यिक प्रतिभा स्पष्ट होते.
‘विक्रमांकदेवचरित’ आणि बिल्हणाचा आत्मपरिचय
परंतु विक्रमांकदेवचरित या ग्रंथात बिल्हणाने स्वतःबद्दल अधिक माहिती दिली आहे. अशा ग्रंथांमध्ये लेखक स्वतःच्याही जीवनाविषयी लिहितो, ही एक प्रथा होती. उदाहरणार्थ, बाणभट्टाच्या ‘हर्षचरित’ मध्ये लेखकाचे आत्मपरिचयात्मक विवरण ग्रंथाच्या सुरुवातीलाच दिलेले आहे. बिल्हणाच्या बाबतीत त्याने आपली माहिती ग्रंथाच्या शेवटी दिली आहे. या माहितीतून कवीची द्विधा मनःस्थिती दिसते. याबाबतीत संशोधक यिगाल ब्रोनर यांनी एक मनोरंजक निरीक्षण नोंदवले आहे. बिल्हणाचा हा संभ्रम कवीच्या भूमिकेबद्दल त्याला वाटणाऱ्या द्विधा मनस्थितीचा आणि त्याच्या राजाशीसंबंधीत असलेल्या संलग्नतेचा संकेत देतो. राजाश्रय मिळवणाऱ्या कवीने नेमके काय करावे, राजाचा यथार्थ इतिहास सांगावा का, त्याच्या पराक्रमाचे उदात्तीकरण करावे का आदी प्रश्नांशी बिल्हणही झुंजत होता. शतके लोटली तरीही अशा प्रश्नांची व्याप्ती तशीच राहिली आहे.
बिल्हणाचे जीवन: एक व्यापक प्रवास
बिल्हणाने सांगितल्याप्रमाणे, तो काश्मीरमधील प्रवारपूर (सध्याच्या श्रीनगरजवळ) येथे जन्मला. आपली जन्मभूमी सोडल्यावर त्याला कायमच तिची आठवण येत राहिली आणि त्याला परतण्याची तीव्र इच्छा होती. एका पंडित कुटुंबात जन्मलेला बिल्हण मोठा झाल्यावर अनेक ठिकाणी प्रवास करत राहिला. मथुरा, कन्नौज, वाराणसी इत्यादी ठिकाणी जाऊन त्याने विविध राजदरबारांमध्ये मान मिळवला. त्यानंतर तो गुजरातमधील अन्हिलवाड (सध्याचे पाटण) येथे गेला. याच प्रवासात तो सोमनाथ मंदिराला भेट देऊन पश्चिम किनाऱ्यावरून कर्नाटकाकडे गेला. तिथे सहाव्या राजा विक्रमादित्याने त्याच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन राजदरबारी स्थान दिले. त्याला राजेशाही निळं छत्र आणि हत्ती देऊन सन्मान केला.
राजा विक्रमादित्य आणि बिल्हणाचे वर्णन
बिल्हणाने संपूर्ण ग्रंथात विक्रमादित्याला ‘रामासारखा आदर्श राजा’ म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने राजाच्या प्रत्यक्ष कारकीर्दीतील वादग्रस्त घटनांबद्दल फारसे लिहिले नाही. विक्रमादित्याने चालुक्य राजवंशाच्या अंतर्गत कलहात स्वतःच्या मोठ्या भावाला पदभ्रष्ट करून सत्ता बळकावली. त्याने आपल्या धाकट्या भावाला जयसिंह याला तुरुंगात डांबले. चोलांशी चाललेल्या प्रदीर्घ संघर्षाचा उल्लेख बिल्हणाच्या ग्रंथात तुलनेने कमी आहे. हीच द्विधा स्थिती यिगाल ब्रोनर यांनी नमूद केली आहे. राजाश्रय लाभलेला कवी म्हणून बिल्हणाने इतिहासाची मांडणी आपल्या राजाच्या प्रतिमेला अनुरूप करून केली आहे. बिल्हणाच्या सर्जनशीलतेची गूढताच त्याच्या महानतेची खूण आहे.
आधुनिक काळातील ‘चौरपञ्चाशिका’ची लोकप्रियता
१९४० च्या दशकात ‘चौरपञ्चाशिके’ला नव्याने लोकप्रियता मिळाली. १९४८ मध्ये तामिळ सिनेमांत या कवीवर दोन चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांपैकी ‘बिल्हण’ या सिनेमात राजा आपल्या अपंग कन्येसाठी बिल्हणाला शिक्षक म्हणून नेमतो. परंतु राजकन्या पडद्याआड राहील, असे आदेश देतो. तर कवीला तिच्याबद्दल ती ‘कुरुप’ असल्याचे सांगितले जाते. नंतर कथा रंगत जाते. हा चित्रपट सुखांत आहे.
पश्चिमी जगतात ‘चौरपञ्चाशिके’चे पुनरुत्थान
१८९६ साली एडविन अर्नोल्डने ‘चौरपञ्चाशिका’चे स्वतःचे एक रूपांतर लिहिले होते. पण या काव्याचा सर्वांत प्रसिद्ध आणि सतत उद्धृत केला जाणारा अनुवाद एडवर्ड पॉयस माथर्स (Edward Powys Mathers) यांचा ‘Black Marigolds’ (१९१९) आहे. माथर्सने ‘The Garden of Bright Waters’ या काव्यसंग्रहातही आशियातील प्रेमकवितांचे अनुवाद केले आहेत.
साहित्य आणि चित्रपटात ‘चौरपञ्चाशिका’
१९४५ मध्ये जॉन स्टाइनबेकच्या ‘Cannery Row’ या कादंबरीतही माथर्सच्या ‘Black Marigolds’ मधील काही अंश वापरण्यात आले. ही कादंबरी कॅलिफोर्नियातील ओशन व्ह्यू ड्राइव्ह येथे वसलेल्या सार्डिन प्रक्रिया कारखान्यांभोवती फिरते. ही काल्पनिक कथा असली तरी त्यात स्टाइनबेकच्या स्वतःच्या जीवनातील अनेक पैलू, पर्यावरणविषयक दृष्टिकोन आणि माणसाच्या वर्तनाचा अभ्यास अंतर्भूत आहे.यातील ‘डॉक’ हे पात्र स्टाइनबेकच्या मित्रावर आधारित आहे. प्रसिद्ध सागरी जीवशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ एड रिकेट्स (Ed Ricketts). या कादंबरीच्या पुढच्या भागात ‘Sweet Thursday’ मध्येही ‘चौरपञ्चाशिके’चा संदर्भ येतो. विशेषतः मॅक आणि त्याच्या मित्रांनी ‘डॉक’साठी दिलेल्या एका जल्लोषपूर्ण पार्टीत तो ‘चौरपञ्चाशिका’मधील काही उतारे वाचतो.
‘चौरपञ्चाशिका’ – एक चिरंतन प्रभाव
‘चौरपञ्चाशिका’ची भारतीय भाषांमध्ये अनेक संस्करणे आहेत आणि ती सतत विविध रूपांत सादर होत राहिली आहे. यामुळे पूर्वीची ही प्रेमकथा नव्या पिढ्यांमध्येही रुजलेली दिसते.