Valentines day 2024 भारत हा एके काळी कामसूत्राची भूमी म्हणून ओळखला जात असे. भारतासाठी प्रणय हा कधीच निषिद्ध नव्हता. भारतीय संस्कृतीत शृंगारालाही मंदिराच्या शिल्पसंभारात महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. आज प्रेम, प्रणय, शृंगार या शब्दांना नकारात्मक छटा असली तरी हिंदू धर्मात मानवी आयुष्यातील चार पुरुषार्थांमध्ये ‘काम’ हा महत्त्वाचा मानला गेला आहे. हे चारही पुरुषार्थ एकमेकांशी संलग्न आहेत. हिंदू धर्मात प्रेमाची, प्रणयाची देवता ‘काम’ देव आहे. काम देव आणि त्याची सहचारिणी रती सजीव सृष्टीत प्रेम टिकून राहावे म्हणून सदैव कार्यरत असतात. त्यामुळे आजच्या प्रेमाच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर याच दैवी जोडप्याच्या प्रेम कथेविषयी जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काम हा शब्द प्रणयातील आनंदासाठी वापरला जातो. या भावनेचा नियंत्रक देव म्हणजे कामदेव होय. कामदेवाला मन्मथ, मदन, अतानु, किंवा अनंग अशा अनेक नावांनी ओळखले जाते. पौराणिक संदर्भानुसार कामदेव हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. तो प्रेम, प्रणय या भावनांची सजीवांमध्ये उत्पत्ती करतो. कामदेव हा पाश्चिमात्य देशांमध्ये आढळणाऱ्या इरॉस किंवा क्युपिड सारखा आहे. कामदेवाची मूर्ती तरुण पुरुषाच्या रूपात साकारण्यात येते. पोपट हे कामदेवाचे वाहन असून त्याच्या हातात ऊसापासून तयार करण्यात येणारे धनुष्य आणि पुष्प बाण दाखविण्यात येतो. त्याच्यासोबत अनेकदा त्याची पत्नी रती असते. रती ही शारीरिक इच्छा, वासना, उत्कटता आणि लैंगिक सुखाची देवी आहे. तरुण सुंदर स्त्री असे तिचे वर्णन पौराणिक कथांमध्ये करण्यात आले आहे. पौराणिक संदर्भानुसार ती दक्ष प्रजापतीच्या अनेक कन्यांपैकी एक आहे. मदन आणि रती यांना दोन पुत्र आहेत, हर्ष आणि यश अशी या मुलांची नावे.

अधिक वाचा: विदर्भ कन्या रुक्मिणीचे हरण कृष्णाने का केले?

मदन- रती यांचे मिलन

एका कथेनुसार रतीचा विवाह मदनाशी होण्यापूर्वी तीचे रूप अत्यंत सामान्य होते. सौंदर्य लक्ष्मीच्या कृपेने तिला सुंदर रूप प्राप्त झाले. देवी लक्ष्मीने रतीला षोडश शृंगार कला दिल्या. त्यामुळे रती विश्वातील अत्यंत सुंदर स्त्री झाली. यानंतर साहजिकच कामदेव तिच्या रूपावर भाळले आणि तिला आपली प्रमुख राणी म्हणून स्वीकारले.

जेव्हा कामदेव भस्म होतो…

कामदेवाच्या भस्म होण्याची कथा प्रसिद्ध आहे. तारकासुर नावाचा असुर माजला होता. त्याने स्वर्गलोक देखील हस्तगत केला होता. तारकासुराने ब्रह्मदेवाकडून केवळ शिवाचाच पुत्र त्याला मारू शकेल असे वरदान मागून घेतले होते. कारण भगवान शिव हे सती दहनानंतर घोर तपश्चर्येत लीन झाले, आणि त्यांची तपश्चर्या भंग करणे शक्य नव्हते. आणि त्यामुळेच तारकासुराने शिवाच्या पुत्राच्या हातून मृत्यू मागून एका अर्थाने अमरत्त्वच मागून घेतले होते. त्यामुळे सर्व देव भलतेच विवंचनेत पडले. दुसरीकडे देवी सतीने पुन्हा एकदा पार्वतीच्या रूपात जन्म घेतला होता. या परिस्थितीवर उपाय म्हणून सर्व देव भगवान शिवाची तपश्चर्या भंग करण्याचा निर्णय घेतात. आणि ही कामगिरी कामदेव आणि रती यांच्यावर सोपवण्यात येते. भगवान शिवाच्या ठायी काम, प्रेम, प्रणय भावना निर्माण करण्याचे मोठे कार्य मदन आणि रती यांचाकडे होते. आणि ठरल्याप्रमाणे कामदेव आपल्या धनुष्यातून भगवान शिवांवर प्रेम बाण सोडतो. हा बाण लागताच तपश्चर्या भंग झालेल्या भगवान शिवाचे क्रोधावर नियंत्रण राहत नाही. आणि ते आपला तिसरा डोळा उघडतात आणि एका क्षणात कामदेवाला भस्म करतात. आणि मागे राहते ती फक्त कामदेवाच्या शरीराची राख. हे पाहून रती एकच टाहो फोडते. तिचा टाहो ऐकून भगवान शिव भानावर येतात आणि त्यांना सगळा प्रकार समजतो. ते मदनाला श्री कृष्णाच्या पोटी प्रद्युमनाच्या रूपात जन्माला येण्याचे वरदान देतात. परंतु तोपर्यंत कामदेवाला शरीराशिवाय कार्यरत राहणे भाग होते, त्यामुळेच त्याचे एक नाव ‘अनंग’ असे आहे. यानंतर शिव पार्वतीचा विवाह होतो. शिवपुत्र कार्तिकेय तारकासुराचा वध करतो अशा प्रकारे कामदेवाच्या प्रयत्नामुळे प्रेमाच्या उत्पत्तीने असुराचा नाश करणे शक्य होते. काम आणि रती यांचे प्रेम काल, रूप किंवा अवकाशाच्या पलीकडील होते. प्रद्युम्न हा कृष्ण आणि रुक्मिणीचा मुलगा होता, मुख्यतः भगवान शिवाच्या वरदानाप्रमाणे कामदेवाने प्रद्युन्म म्हणून श्रीकृष्ण-रुक्मिणीच्या पोटी जन्म घेतला होता. यानंतर रती आणि मदन यांचे पुन्हा मिलन होते.

अधिक वाचा: एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

काम आणि रती मध्ययुगीन साहित्याचा मुख्य स्रोत

रती आणि मदन हे प्रणयाचे निर्माते आहेत. याच त्यांच्या भूमिकेमुळे मध्ययुगीन साहित्यात त्यांना महत्त्वाचे स्थान होते. १४ व्या ते १७ व्या शतकातील रीति काल काव्य, कामसूत्र, कोक्कोकाचे रति रहस्य, कल्याणमल्लचे अनंग रंग, प्रौध-देवराजाची रतिरत्नप्रदिपिका, जयदेवाची रती मंजरी आणि अनामित मन्मथ संहिता ही अशी काही उदाहरणे आहेत. या ग्रंथांची रचना धार्मिक संहितेसारखी आहे. शैव तांत्रिक (आगम) ग्रंथांमध्ये ज्या प्रमाणे शिव पार्वतीच्या संवाद स्वरूपात तत्त्वज्ञानाची चर्चा केलेली दिसते, त्याच प्रमाणे या शृंगार ग्रंथांमध्येही रती मदनाचा संवादरूपात काम कलेची चर्चा करण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day indian mythological love story of madan and rati svs