Valentines day 2024 ‘व्हेलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर सभोवतालच्या वातावरणाला गुलाबी रंग चढला आहे. अनेक प्रेमवीर या दिवसाचे औचित्य साधून आपल्या भावना व्यक्त करण्याच्या तयारीत आहेत, काहींनी तर या दिवसाच्या मुहूर्तावर लग्न गाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेम ही निसर्गदत्त भावना आहे. या भावनेच्या अनेक छटा आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. प्रेमी युगुलांमधील प्रेमाची परिणती विवाहात झाल्यास ते त्या प्रेमाचे यश मानले जाते. प्रेमविवाह ही संकल्पना आधुनिक असल्याचा अनेकदा आरोप केला जातो. परंतु आपण प्राचीन भारतात डोकावून पाहिले तर प्रेमविवाहाचे अनेक दाखले आपल्याला सापडतात, किंबहुना प्राचीन भारतातील अनेक विवाह प्रकारांपैकी गांधर्व विवाह प्रकार प्रमुख होता. ऋग्वेद, महाभारत आणि मनुस्मृती यासारख्या विविध प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये या विवाहाचा संदर्भ सापडतो. गांधर्व विवाह हा प्रेम विवाहाचा प्रकार आहे. गांधर्व विवाहात पालकांच्या संमतीशिवाय आणि कोणत्याही औपचारिक सोहळ्याशिवाय विवाह केला जातो. या विवाहात प्रेमी जोडपे जोपर्यंत एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि एकमेकांशी वचनबद्ध आहेत तोपर्यंत हा विवाह वैध मानला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: एक उत्कट अधुरी प्रेम कथा…. उर्वशी आणि पुरुरवा!

पा.वा.काणे- धर्मशास्त्र काय सांगते?

मूलतः वधू वराच्या संमतीने केवळ विषय सुखाकरिता मिलन होते, या मिलनाला गांधर्व विवाह असे म्हणतात. अशी व्याख्या पा. वा. काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास (पूर्वार्ध) या ग्रंथात केली आहे. गांधर्व विवाह ही संकल्पना दोन व्यक्तींमधील प्रेम आणि आकर्षणाच्या कल्पनेवर आधारित आहे. प्रेम ही एक शक्तिशाली भावना आहे, जी दोन व्यक्तींना एकत्र आणू शकते आणि त्यांच्यामध्ये मजबूत बंध निर्माण करू शकते असे मानले जाते. गांधर्व विवाहात, वधू आणि वर यांचे एकमेकांवर गाढ आणि खरे प्रेम असल्याचे मानले जाते, म्हणूनच ते त्यांच्या कुटुंबाच्या किंवा समाजाच्या मान्यतेशिवाय विवाह करण्याचा निर्णय घेतात. गांधर्व विवाहाची संकल्पना देखील स्वातंत्र्य आणि वैयक्तिक निवडीच्या कल्पनेशी संबंधित आहे. प्राचीन काळी व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि निकषांवर आधारित त्यांचे साथीदार निवडण्याचे स्वातंत्र्य होते. निवड स्वातंत्र्याची ही कल्पना गांधर्व विवाहामध्ये दिसून येते, या विवाहात वधू आणि वर कोणत्याही बाह्य दबाव किंवा प्रभावाशिवाय एकमेकांची निवड करतात. प्राचीन काळी गांधर्व विवाहात वधू-वरांच्या पालकांची संमती समाविष्ट नसल्याने हा विवाहाचा एक अप्रमाणित प्रकार मानला जात असे. या प्रकारचा विवाह सामान्यत: गुप्तपणे केला जात असे.

वैदिक मान्यता?

वैदिक मान्यतेनुसार ब्रह्मविवाह, दैव विवाह, आर्ष विवाह, प्रजापत्य, गंधर्व, असुर, राक्षस आणि पैशाच्च विवाह असे आठ प्रकारचे हिंदू विवाह होते. यातील प्रथम चार विवाह समाजमान्य होते. तर उरलेले चार निषिद्ध मानले जात होते. असे असले तरी गांधर्व विवाह हा ऋग्वेदिक काळात निषिद्ध मानला जात नव्हता. उलट तो लोकप्रिय असल्याचे संदर्भ सापडतात. या कालखंडात सार्वजनिक ठिकणी तरुण-तरुणी एकमेकांना भेटत असत आणि त्यातून त्यांना भावलेल्या जोडीदाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य त्यांना होते.

आपस्तम्ब गृहसुत्रानुसार

आपस्तम्ब गृहसुत्रानुसार, गांधर्व विवाहात स्त्री स्वतः पती निवडते. ते एकमेकांना त्यांच्या स्वत:च्या मर्जीने भेटतात, एकत्र राहण्याची संमती देतात आणि उत्कटतेने झालेल्या समागमात त्यांचे नाते पूर्ण होते. लग्नाच्या या प्रकारासाठी पालक किंवा इतर कोणाच्या संमतीची आवश्यकता नव्हती.

अधिक वाचा: शिवशंकराची प्रेमाची व्याख्या!

महाभारतातील उदाहरणे

महाभारतात गांधर्व विवाहाची अनेक उदाहरणे सापडतात. त्यातील दुष्यन्त आणि शकुंतला, हिडिंबा आणि भीम ही काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत. या जोडप्यांनी गांधर्व पद्धतीने विवाह केले होते. गांधर्व विवाहात निसर्गाला साक्ष ठेवून विवाह केला जातो. चंद्र, सूर्य, वृक्ष, वेली, नदी, तलाव इत्यादी निसर्गातील घटकांच्या साक्षीने पुष्पमाला वधू-वर एकमेकांच्या गळ्यात घालून विवाह करतात. याच इतर समाजमान्य विवाहांप्रमाणे विधी होत नाही. मुख्यतः वधू आणि वराने एकमेकांची निवड करणे इतकेच महत्त्वाचे असते.

नारदस्मृतीत काय म्हटलॆ आहे?

मनूने नमूद केल्याप्रमाणे पुरोहित, योद्धा, सैन्यात सेवा करणारे, कुलीन आणि राज्यकर्ते असलेल्या पुरुषांसाठी गांधर्व विवाह सर्वात योग्य आहे. बौधायन देखील गांधर्व विवाहाचा पुरस्कार करतो. नारदस्मृतीत हा विवाह सर्वोत्तम असल्याचे नमूद केलेले आहे. कालांतराने गांधर्व विवाह वादग्रस्त ठरला. बहुसंख्य प्राचीन विद्वानांनी धार्मिक आणि नैतिक आधारावर त्यांना निषिद्ध मानले, या विवाहात समाविष्ट नसणाऱ्या धार्मिक विधींचे कारण अनेक शास्त्रीय ग्रंथांनी देऊन हा विवाह अखेरीस नाकारला गेला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day why this form of marriage banned in ancientindia history of marriages in indian culture svs