पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली वंदे भारत एक्सप्रेस आपल्या मतदारसंघातून धावावी यासाठी सर्वपक्षीय खासदार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे वंदे भारतच्या डबे निर्मितीवर अधिक भर देण्यात आला आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे आर्थिक व्यवहार्य असणारे मार्ग आणि रुळांच्या अद्ययावतीकरणाच्या अभावामुळे काही गाड्या वापरात नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ही गाडी यशस्वी की अशस्वी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळा प्रतिसाद का?

लोकप्रिय होत असलेल्या या गाडीचे प्रवासभाडे एसी थर्ड टिअर दरापेक्षा अधिक व विमानभाड्यापेक्षा कमी आहे. देशांतर्गत विमान प्रवास करण्यासाठी सर्वसाधारणपणे दीड ते दोन तास लागतात. तर वंदे भारतमधून सात ते आठ तास लागतात. ही गाडी काही मार्गांवर लोकप्रिय आहे. पण, काही मार्गांवर अपेक्षित प्रतिसाद नाही. यासाठी गाडी सुरू करण्यात आलेल्या दोन शहरातील व्यापार, शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे हे सर्व घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे काही मार्गावर १६ ऐवजी ८ डब्यांची गाडी करण्यात आली आहे. तर आता काही मार्गावर २० डब्यांची देखील गाडी चालवण्यात येत आहे.

आणखी वाचा-Indus Valley Civilization: १०० वर्षांपूर्वी खोवला गेला मानाचा तुरा आणि भारतीय संस्कृती ठरली तब्बल ५००० वर्षांहून अधिक प्राचीन!

या गाडीचे वैशिष्ट्य काय?

भारतातील सर्वात आधुनिक गाड्यांपैकी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. ती संपूर्ण वातानुकूलित आहे. प्रत्येक डब्यात मोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यान बाहेरील निसर्गाचा वेगळा अनुभव प्रवाशांना घेता येतो. गाडीत खानपान सुविधा आहे. स्वयंचलित दरवाजे, स्मोक अलार्म, पाळत यंत्रणा, गंध नियंत्रण प्रणाली, सेन्सरी टॅप इत्यादींचा समावेश होतो. प्रवाशांना गाडी चालकांशी बोलण्याची व्यवस्थादेखील आहे. या गाडीमध्ये जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली आहे. बायो-व्हॅक्यूम टॉयलेट आणि फिरते आसन (केवळ एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये) ही वैशिष्ट्ये आहेत. तिची वेगमर्यादा ताशी १६० प्रतिकिलोमीटर इतकी आहे. सध्या १३० प्रतिकिलोमीटर या वेगाने धावते.

एका गाडीच्या निर्मितीवर खर्च किती?

ही गाडी स्वदेशी बनावटीची आहे. तिची ओळख अधिक गती आणि वजनाने हलकी अशी आहे. आठ डब्यांची गाडी तयार करण्यासाठी सुमारे ५२ कोटींचा खर्च येतो. १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत, भारतात ६६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सेवेत होत्या. यामध्ये २० गाड्या १६ डब्यांच्या, तीन गाड्या २० डब्यांच्या आणि ४३ गाड्या आठ डब्यांच्या आहे. तर ८ डब्यांच्या १६ वंदे भारत एक्सप्रेस तयार आहेत. त्यावर सुमारे ८०० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. पण, कोणत्या मार्गावर चालवाव्यात, हे निश्चित होऊ न शकल्याने गाड्या कारखान्यातच उभ्या आहेत, अशी माहिती आहे.

आणखी वाचा-A new White Revolution: भारत सध्या कुठे आहे? कुठे असायला हवा?

देशात सध्या किती वंदे भारत धावत आहेत?

नवी दिल्ली-वाराणसी या शहरादम्यान १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावली. त्यानंतर नागपूर-बिलासपूर, नागपूर-इंदूर आणि नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी, मुंबई-गोवा, नवी दिल्ली-माता वैष्णोदेवी कटरा (जम्मू-काश्मीर), गांधीनगर-मुंबई, नवी दिल्ली-आंब अंदुरा (हिमाचल प्रदेश), चेन्नई-म्हैसूर, हावडा-न्यू जलपाईगुडी, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी यासह ६६ वंदे भारत सुरू झाल्या आहेत.

१६ गाड्या सुरू न होण्याचे कारण काय?

वंदे भारतसारखी ‘हाय-स्पीड’ गाडी चालवण्यासाठी अद्ययावत रुळांची आवश्यकता आहे. तसेच अत्याधुनिक सिग्नल यंत्रणाही हवी. देशात असे काही मार्ग आहेत ज्यांवरून १३०-१६० किमी प्रतितास वेगाने गाडी धावू शकते. पण, ते मार्ग आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत. तसेच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवल्यास इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आठ डब्यांच्या १६ वंदे भारत एक्सप्रेस धावण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

आणखी वाचा-Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ टॅलो म्हणजे काय? ते कसे तयार केले जाते?

वंदे भारतच्या मर्यादा काय आहेत?

ही गाडी जास्तीत जास्त आठ तासांचा प्रवास करू शकते. त्यामुळे ज्या दोन शहराचे अंतर सात ते आठ तासांत कापता येईल आणि ज्या मार्गावर प्रवाशांची गर्दी अधिक असेल, त्या मार्गाची निवड केली जाते. ही गाडी मध्यरात्रीपासून पहाटे ५ पर्यंतच्या काळात धावत नाही. आठ डब्यांच्या एका वंदे भारत एक्सप्रेसमधून सुमारे ५०० लोक प्रवास करू शकतात. एक वंदे भारत ज्या मार्गावरून धावते त्या मार्गावरील नियमित धावणाऱ्या इतर चार ते पाच गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होते. म्हणजे सुमारे वंदे भारतच्या पाचशे प्रवाशांसाठी पाच हजार प्रवाशांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे नियमित धावणाऱ्या गाड्यांच्या प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येते. परिणामी, या गाडीबाबत नकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. काही गाड्यांवर दगडफेकदेखील झाली आहे.

या गाडीचा प्रयोग यशस्वी की अयशस्वी?

भारतासारख्या खंडप्राय देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. शिवाय ती दिवसेंदिवस वाढतच आहे. लांबचा प्रवास करणाऱ्यांना चांगलाच अनुभव आहे. सणासुदीच्या काळात आणि उन्हाळ्यात तर आरक्षित तिकीट कन्फर्म होणे अशक्यप्राय गोष्ट असते. एरवीदेखील कोणत्याच गाड्यांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय देशातील बहुतांश प्रवाशांचा कल स्वस्त दरातील प्रवास करण्याकडे असतो. त्यामुळे वंदे भारतचे भाडे सर्वसाधारण प्रवाशांना अधिक वाटत आहे. शिवाय रेल्वे मार्ग अत्याधुनिक करण्यापूर्वीच वंदे भारत एक्सप्रेसला मार्ग मोकळा करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासन कमालीची कसरत करीत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat express success or failure why are some vande bharat lying in the dust print exp mrj