यंदाची युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा विविध कारणांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. लेमिन यमाल, निको विल्यम्स (दोघेही स्पेन), जमाल मुसियाला (जर्मनी), आर्दा गुलेर (तुर्की) आणि कोबी मेएनू (इंग्लंड) यांसारख्या युवकांनी आपल्या वयापेक्षा कितीतरी पटीने परिपक्व खेळ करत यंदाची स्पर्धा गाजवली. युवा गुणवत्तेच्या जोरावरच स्पेन संघाला नव्याने उभारी मिळाली, तर इंग्लंडच्या संघाने सलग दुसऱ्यांदा युरोची अंतिम फेरी गाठली. काही दुबळ्या मानल्या जाणाऱ्या संघांनीही धक्कादायक निकालांची नोंद केली. मात्र, या सर्व सकारात्मक गोष्टी असतानाच, दुसरीकडे पंचांची कामगिरी आणि ‘व्हीएआर’चा वापर या गोष्टी वादग्रस्त ठरल्या आहेत. तसे का आणि ‘व्हीएआर’ प्रणाली नक्की काय आहे, याचा आढावा.

‘व्हीएआर’ म्हणजे काय?

क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे पंचांचा निर्णय चुकीचा वाटल्यास खेळाडूंना ‘डीआरएस’ वापरण्याची मुभा असते, त्याचप्रमाणे फुटबॉलमध्ये एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम असल्यास चित्रफीत साहाय्यक सामनाधिकारी अर्थात ‘व्हीएआर’ प्रणालीचा वापर केला जातो. मात्र, या प्रणालीचा वापर खेळाडूंकडून नाही, तर पंचाकडूनच केला जातो. सामन्यापूर्वी एक मुख्य पंच, दोन साहाय्यक आणि चौथे पंच यांच्यासह ‘व्हीएआर’ प्रणालीच्या वापरासाठीही पंचांच्या चमूची नियुक्ती केली जाते. या चमूत एका पंचांची प्रमुख म्हणून निवड केली जाते आणि त्याच्यासह तीन साहाय्यक पंच असतात. मैदानावरील पंचांच्या निर्णयामध्ये अचूकता आणणे हे या प्रणालीमागचे मूळ उद्दिष्ट आहे.

हेही वाचा…मंगळावर मानवी वस्तीसाठी इलॉन मस्क लागले तयारीला… काय आहे ही अचाट योजना?

‘व्हीएआर’ प्रणालीचा कधी केला जातो?

काही ठरावीक निर्णयांसाठीच ‘व्हीएआर’ प्रणालीचा वापर केला जातो. गोल आहे किंवा नाही, पेनल्टी आहे किंवा नाही, थेट लाल कार्ड आणि फाऊल केलेल्या खेळाडूची ओळख चुकल्यास ‘व्हीएआर’चा वापर होतो. उदाहरणार्थ, एखाद्या संघाने गोल केल्यास त्यापूर्वी गोल करणारा किंवा त्याला चेंडू पास देणारा खेळाडू ‘ऑफसाइड’ नाही ना किंवा गोल होण्यापूर्वी चेंडू खेळाडूच्या हाताला लागला नाही ना, हे ‘व्हीएआर’कडून तपासले जाते. तसेच पंचांनी पेनल्टी दिली, तरी तो निर्णय बदलण्याचा किंवा पंचांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगण्याची मुभा ‘व्हीएआर’ला असते.

निर्णय कसा घेतला जातो?

पंचांना एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम असल्यास ते ‘व्हीएआर’ची मदत मागू शकतात. त्यानंतर निर्णय दोन प्रकारे घेतले जातात. एक म्हणजे, पंचांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे याची खात्री असल्यास ‘व्हीएआर’कडून त्यांना तो निर्णय बदलण्यास थेट सांगण्यात येते. दुसरे म्हणजे, पंचांनी घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे याची खात्री नसल्यास, पण निर्णयाचा फेरविचार केला जाऊ शकतो असे वाटल्यास ‘व्हीएआर’कडून पंचांना तशी सूचना दिली जाते. त्यानंतर स्टेडियममध्येच ठेवण्यात आलेल्या मॉनिटरवर (छोटी स्क्रीन) पंचांकडून पुन्हा ती घटना पाहिली जाते. ती पाहिल्यानंतर आपल्या निर्णयावर कायम राहायचे की तो बदलायचा हे पंच स्वत:च ठरवतात. मैदानाच्या विविध कोनांत बसवलेल्या कॅमेऱ्यांमधून सामन्यांचे चित्रीकरण केले जाते आणि तेच ‘व्हीएआर’ला दाखवले जाते.

हेही वाचा…धूम्रपान न करणार्‍यांनाही होतोय कॅन्सर, संशोधनात धक्कादायक माहिती उघड; काय आहेत कारणं?

‘व्हीएआर’ कोणकोणत्या लीगमध्ये वापरली जाते?

जगातील जवळपास सर्वच मोठ्या फुटबॉल लीगमध्ये या प्रणालीचा वापर केला जातो. यात इंग्लिश प्रीमियर लीग, बुंडेसलिगा, ला लिगा, सेरी ए यांसारख्या नामांकित लीगचा समावेश आहे. कतारमध्ये झालेल्या गेल्या ‘फिफा’ विश्वचषकातही ही प्रणाली वापरण्यात आली होती. भारतात सर्वप्रथम २०२२ मध्ये महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत ‘व्हीएआर’चा वापर करण्यात आला होता.

ही प्रणाली वादग्रस्त का ठरत आहे?

पंचांच्या निर्णयांतील चुका टाळण्यासाठी ‘व्हीएआर’ प्रणाली असली, तरी त्याचा वापर अगदी योग्य प्रकारे होताना बरेचदा दिसत नाही. अनेकदा पंचांनी चुकीचा निर्णय घेतला असेल, तरी ‘व्हीएआर’कडून त्यांना निर्णयावर ठाम राहण्यास सांगण्यात येते. काही वेळ ‘व्हीएआर’ने पंचांना निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितल्यानंतरही मॉनिटरमध्ये पुन्हा ती घटना पाहून पंच आपल्या निर्णयावर ठाम राहतात किंवा गरज नसतानाही तो बदलतात. त्यामुळे हे निर्णय वादग्रस्त ठरतात. तसेच या सर्व प्रक्रियेत बराच वेळही जातो. यावरूनही या प्रणालीवर टीका होते. यंदाच्या युरो स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडला पेनल्टी देण्यावरून प्रतिस्पर्धी संघ नेदरलँड्सचे प्रशिक्षक रोनाल्ड कूमन यांनी ‘व्हीएआर’वर टीका केली होती. या प्रणालीच्या वापराने अचूक निर्णय दिले जाणे तर सोडाच, पण खेळातही खूप व्यत्यय येतो, असे कूमन म्हणाले. तसेच अगदी साध्या फाऊलवरही किंवा हँडबॉलवर पेनल्टी दिली जात असल्याची टीका वारंवार होते. प्रणालीमधील त्रुटी आणि निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ यामुळे गेल्या हंगामाअंती प्रीमियर लीगनेही ‘व्हीएआर’ रद्द करण्याबाबत विचार केला होता. मात्र, बहुतेक क्लबनी ‘व्हीएआर’ कायम ठेवण्याच्या पक्षात मतदान केल्याने ही प्रणाली आगामी हंगामातही वापरली जाणार आहे.

हेही वाचा…Kalki 2898 AD हिंदू धर्मासारखेच ‘या’ देशांनाही आहेत ‘चिरंजीव’ वंदनीय; निमित्त ‘कल्की’चे… काय आहे चिरंजीव ही संकल्पना?

इंग्लंड-नेदरलँड्स सामन्यात काय घडले?

युरो स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्सचा २-१ असा पराभव केला. मात्र, या सामन्यात हॅरी केनने केलेल्या पहिल्या गोलसाठी इंग्लंडला मिळालेली पेनल्टी वादग्रस्त ठरली. पूर्वार्धात इंग्लंडचा संघ पिछाडीवर होता. त्या वेळी केनला गोलच्या दिशेने फटका मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असताना नेदरलँड्सचा बचावपटू डेन्झेल डम्फ्रिसचा पाय केनच्या पायावर आदळला. पंचांनी आधी पेनल्टी नाकारली. मात्र, ‘व्हीएआर’ने पंचांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना केली. अखेर मैदानावरील मॉनिटरवर पुन्हा ही घटना पाहिल्यानंतर पंचांनी इंग्लंडला पेनल्टी बहाल केली. त्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला. मात्र, ‘व्हीएआर’चे विशेषज्ञ डेल जॉन्सन यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘बचावपटूने आक्रमणातील खेळाडूला फटका मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा एकमेकांना जोरात स्पर्श झाला, त्यानंतरही आक्रमणातील खेळाडूला चेंडू गोलच्या दिशेने मारण्यात यश आल्यास फाऊल दिला जात नाही, असा अलिखित नियम आहे. असे असले, तरी आक्रमणातील खेळाडूला रोखण्याचा बचावपटूचा प्रयत्न धोकादायक वाटल्यास फाऊल देण्याची पंचांना मुभा असते. या सामन्यात केनच्या पायावर डम्प्रिसचा पाय जोरात आदळल्याने इंग्लंडला पेनल्टी देण्यात आली. नियमानुसार हा निर्णय योग्यच होता.’’