Varun Dhavan Diagnosed With Vestibular Hypofunction: अभिनेता वरुण धवनचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वरुणने आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केले आहे. वरुण धवन हा मागील काही काळापासून वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजाराने त्रस्त आहे. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२२’ या कार्यक्रमामध्ये वरुणने त्याला असलेल्या आजाराबाबत भाष्य केलं आहे. वरुणने सांगितले की, कोविडनंतर काम करण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला पण यात मुख्यतः वेस्टिब्युलर हायपोफंक्शन मुळे बराच काळ शरीराचा तोल सांभाळता येत नव्हता. वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा आजार नेमका काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात…
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन म्हणजे काय?
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या मते वेस्टीबुलर हायपोफंक्शन या आजारामुळे शरीराचा तोल जातो. या आजाराचा परिणाम कानावर तसेच मेंदूवरही होतो. वेस्टिब्युलर सिस्टीम मुख्यतः कान, डोळे व मेंदूच्या स्नायूंवर प्रभाव करते, जेव्हा यापैकी कोणताही घटक योग्य काम करत नाही तेव्हा या त्रुटींचा मेंदूला संदेश पाठवला जातो परिणामी चक्कर येऊ शकते. हा त्रास एका बाजूच्या कानात होत असल्यास त्यास युनिलॅटरल हायपोफंक्शन तर दोन्ही बाजूस होत असल्यास बाय लॅटरल हायपोफंक्शन असे म्हणतात.
अनेकांना पटकन बसल्या जागेवरून उठल्यावर किंवा एखादी वस्तू वेगाने डोळ्यासमोरून गेल्यावर डोके चक्रावून गेल्यासारखे वाटते. हा वेस्टीबुलर हायपोफंक्शनचा परिणाम असतो.
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन कशामुळे होऊ शकतो?
- वेस्टिब्युलर न्यूरिटिस
- कानाचे पूर्व विकार
- वाढते वय
- औषधांचा परिणाम
- आघात किंवा डोक्याला दुखापत,
- रक्ताच्या गुठळ्या किंवा ट्यूमर
वेस्टिब्युलर हायपोफंक्शनची लक्षणे काय आहेत?
वेस्टिब्युलर हायपोफंक्शनची लक्षणे ही कारणांवर अवलंबून असतात. अनेकांना चक्कर येणे, मळमळ, शरीराचा तोल जाणे, गर्दीच्या ठिकाणी आणि अंधाऱ्या खोलीत चालता न येणे, वेगवाण हालचाल झाल्यास चक्कर येणे असे लक्षण दिसून येते.
वेस्टिब्युलर हायपोफंक्शनवर उपचार काय?
वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठी फिजिओथेरपिस्टचे मार्गदर्शन घेणे हिताचे ठरेल. तुम्हाला शरीराचा तोल सांभाळण्यासाठी विविध व्यायाम करायला सांगितले जाऊ शकते. एकदा का शरीराचा तोल सांभाळता आला की नियमित व्यायामाने आपण अन्यही त्रासांवर आराम मिळवू शकता.
तुमच्या दैनंदिन कामांमध्ये विशेषतः व्यायाम करताना जर आपण डोके स्थिर ठेवले तर त्रास होणार नाही असे वाटू शकते मात्र यामुळे चक्कर येण्याची शक्यता जास्त होते. डोके व शरीर शक्य होईल तिथले ऍक्टिव्ह ठेवावे. हालचाल थांबवू नये.
शरीराचा समतोल राखण्यासाठी सोपे व्यायाम
तुमच्या समोरच्या एका बिंदूवर, शक्यतो भिंतीवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही “नाही” व “होय” म्हणत आहात अशा प्रकारे डोक्याची हालचाल करा. कोणतीही लक्षणे न दिसता तुम्ही 30 सेकंद व्यवस्थापित करू शकत असाल, तर तुम्हाला हा व्यायाम करण्याची गरज नाही.
आपले पाय एकमेकांच्या जवळ ठेवून उभे राहण्याचा सराव करा, ही स्थिती 30 सेकंद धरून पहा. तुम्हाला स्थिर वाटत नसल्यास, काहीतरी धरून ठेवण्याचा प्रयत्न करा.
रक्तदाब नियंत्रणात असेल याची खात्री करा. उच्च आणि कमी रक्तदाब दोन्हीमुळे चक्कर येऊ शकते. तुम्हाला धडधड होत असल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घ्या.
सकस आहार आणि झोपेची शरीराला सवय लावा. ‘स्क्रीन टाइम’ कमी करा कारण यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो.
मद्यपानामुळे मेंदूच्या संतुलन राखण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे मद्यपान टाळावे.
तणाव, मूड स्विंग व चिंता यामुळेही शरीराचे संतुलन बिघडू शकते. शक्य तितके आनंदी राहायला शिका यासाठी ध्यानधारणा करणे हा उत्तम मार्ग ठरू शकतो.