Vasant Panchami & Nizamuddin Dargah: भारतीय संस्कृतीत ऋतूबदल हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या वसंत ऋतूचे आगमन झालेले आहे. भारतभर वसंत पंचमीच्या सोहळ्याने या ऋतूचे स्वागत करण्यात आले. माघ शुक्ल पंचमी ही वसंतपंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत पंचमीपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. प्राचीन कालखंडात वसंत ॠतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती. दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेकडील राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ‘फाग’ ह्या नावाने ओळखला जातो. फाल्गुन पौर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो. वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात. या दिवशी काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मीची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी कामदेव-रतीची पूजा करण्याचीही प्रथा आहे. विशेष म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर या दिवशी पिवळ्या रंगाची चादर चढवून सुफी बसंत साजरा केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हजरत अमीर खुसरो आणि ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांचे अनोखे नाते

हजरत अमीर खुसरो हे प्रतिभावंत कवी आणि संगीतकार होते. महबूब-ए-इलाही ख्वाजा हजरत निजामुद्दीन औलिया हे त्यांचे गुरु. या गुरु शिष्याचे नाते चिश्ती सुफीयाना सिलसिला आणि सुफी तसव्वुफ प्रेमींसाठी चांगलेच परिचित आहे. अमीर खुसरो यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून आपल्या गुरुंवरील भक्ती आणि निष्ठा प्रकट केली होती.

सुफी बसंत: दरगाहवरील एक अनोखा सोहळा

निजामुद्दीन दरगाहवरील सर्व उत्सवांमध्ये सर्वात अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमीच्या आगमनाने साजरा केला जातो. हा सोहळा हिंदू सण वसंत पंचमीचे सुफी परंपरेतील रूप आहे. दरवर्षी पिवळ्या रंगाच्या वस्त्रांनी आणि वसंत ऋतूशी संबंधित आनंदी संगीताने संपूर्ण दरगाह उजळून निघतो.

वसंत उत्सवाची अनोखी कथा

प्रचलित दंतकथेनुसार ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांचा पुतण्या तकीउद्दीन नूह याचा अचानक अकाली मृत्यू झाला. या दु:खाने ख्वाजा इतके व्यथित झाले की, त्यांनी स्वतःला संपूर्णपणे जगापासून अलिप्त केले. ते अनुयायांना भेटणे टाळू लागले, त्यांनी रोजच्या आयुष्यातील सर्व व्यवहारांपासून दूर गेले आणि आपला सर्व वेळ आपल्या पुतण्याच्या कबरीवर किंवा ‘चिल्ला-ए-शरीफ’ (त्यांचे निवासस्थान) येथे व्यतीत करू लागले. त्यामुळे त्यांचे शिष्य चिंतेत पडले. त्यांनी आपल्या ख्वाजांना पूर्वीसारखे आनंदी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अगदी त्यांचे सर्वांत प्रिय शिष्य अमीर खुसरो यांनीही त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीही फरक पडला नाही.

वसंत रागिनी, रागमला, राजपूत चित्रकला

वसंत उत्सवाची सुरुवात कशी झाली?

एके दिवशी अमीर खुसरो यांनी काही तरुण स्त्रिया पिवळे वस्त्र परिधान करून पिवळ्या झेंडूच्या फुलांचा शृंगार करून जाताना पाहिल्या. त्या वसंत उत्सवाचा जल्लोष करत, आनंदाने गाणी गात, हसत-खेळत मंदिरांकडे प्रार्थनेसाठी जात होत्या. हे दृश्य पाहून खुसरो यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी पिवळ्या रंगाचा घागरा (भारतीय पारंपरिक पोशाख) परिधान केला. चेहरा ओढणीने झाकला. गळ्यात पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या. डोक्यावर मोहरीच्या (सरसों) फुलांचा गुच्छ बांधला आणि थेट आपल्या गुरुंच्या कक्षात पोहोचले. तिथे त्यांनी “आज बसंत मनाले सुहागन…आज बसंत मनाले सुहागन” हे स्वतः रचलेले गाणे गात, नृत्य करत ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला. हे अद्भुत दृश्य पाहून आणि स्त्रीच्या वेषात नृत्य करत आनंदाने गाणे गाणारा व्यक्ती खुसरो असल्याचे समजताच हजरत निजामुद्दीन औलिया जोरजोरात हसू लागले. त्या क्षणी त्यांच्यावर असलेली शोकाची छाया अचानक दूर झाली आणि त्यांचे सर्व अनुयायी आनंदाने जल्लोष करू लागले!

सुफी वसंत उत्सवाची परंपरा

त्या दिवसापासून गेल्या सातशेहून अधिक वर्षांपासून ‘सुफी बसंत’ हा उत्सव दरवर्षी साजरा केला जात आहे. हा सण केवळ त्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देत नाही, तर हिवाळ्यानंतर वसंत ऋतूच्या नवचैतन्याचे आणि आनंदाचे प्रतीकही आहे. हा उत्सव निसर्गाच्या चक्राकार प्रवासाचे दर्शन घडवतो, तसेच नवजीवन, पुनरुत्थान आणि ऊर्जेच्या नव्या जागृतीचे प्रतीक आहे.

‘सकल बन’ आणि ‘हीरामंडी’ विषयी

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेबसीरीज मध्ये ७०० वर्षे जुना इतिहास असलेल्या अमीर खुसरो लिखित सकल बन या गाण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. राजा हसन यांनी उमेश जोशी, विजय धुरी, श्रीपाद लेले, अमित पाध्ये आणि शहजाद अली यांच्या साथीने गायलेले ‘सकल बन’ हे गाणे ‘हीरामंडी’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख आणि शार्मिन सेगल यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. अमीर खुसरो यांना कव्वालीचे आणि उर्दू साहित्याचे जनक मानले जाते. त्यांनी भारतीय उपखंडात गझल गायकीचा परिचय करून दिला. त्यांनी प्रेम, निसर्ग आणि भक्ती यावर अनेक सुंदर कविता रचल्या. ज्या आजही आधुनिक गाण्यांमध्ये, कव्वालींमध्ये आणि इतर संगीतप्रकारांमध्ये आढळतात. त्यांच्या लोकप्रिय काव्यांपैकी ‘छाप तिलक’, ‘मोहे रंग दे बसंती निझामुद्दीन औलिया’ आणि ‘दमादम मस्त कलंदर’ ही गाणी विशेष प्रसिद्ध आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant panchami nizamuddin dargah sufi basant svs