दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर दंगली उसळल्या आहेत. राजधानी काराकसबरोबरच अन्य शहरांमध्येही विरोधी पक्षाच्या समर्थकांनी निदर्शने सुरू केली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो विजयी झाल्याचे जाहीर केले असले, तरी हा निकाल विरोधकांना मान्य नाही. यामागचे कारण काय, व्हेनेझुएलाची निवडणूक प्रक्रिया कशी आहे, या दंगलींचा आंतरराष्ट्रीय तेलपुरवठ्यावर परिणाम होईल का याचा हा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीचा निकाल वादात का?

व्हेनेझुएलामध्ये रविवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ५१ टक्के आणि विरोधी पक्षाचे उमेदवार एडमंडो गोन्झालेझ यांना ४४ टक्के मते मिळाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केले होते. मात्र याला तीन दिवस उलटल्यानंतरही निकालाची नेमकी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. विरोधकांनी मात्र आपल्याला ७० टक्के मते मिळाली असून गोन्झालेझ यांचाच विजय झाल्याचा दावा केला आहे. विविध स्वायत्त मतदानोत्तर चाचण्या आणि काही जलद मतमोजणीच्या निष्कर्षांच्या आधारे विरोधकांनी हे दावे केले आहेत. अमेरिकेतील मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या ‘एडिसन रिसर्च’ तसेच स्थानिक ‘मेगानॅलिसिस’ या दोन्ही संस्थांनी गोल्झालेझ यांना ६५ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तविला होता.

हेही वाचा : विश्लेषण: ‘निर्वासितांचा ऑलिम्पिक संघ’ ही संकल्पना काय आहे?

मादुरो आणि गोन्झालेझ यांची पार्श्वभूमी काय?

मादुरो हे पूर्वी बसचालक होते. व्हेनेझुएलाचे हुकूमशाही प्रवृत्तीचे दिवंगत अध्यक्ष ह्यूगो चावेझ यांनी मादुरो यांना स्वत: आपला उत्तराधिकारी निवडले होते. २०१३मध्ये चावेझ यांच्या मृत्यूनंतर देशाची सूत्रे मादुरो यांच्याकडे आली. त्यांच्या सरकारच्या काळात देशाची आर्थिक आणि सामाजिक पीछेहाट झाल्याचे मानले जाते. मादुरो यांनी मुक्त वातावरणात निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी विरोधकांशी करारांना नकार दिल्यानंतर तेलसमृद्ध असलेल्या व्हेनेझुएलावर एप्रिलमध्ये अमेरिकेने निर्बंध लादले होते. मादुरो यांच्या तुलनेत ७४ वर्षांचे गोन्झालेझ हे नेमस्त मानले जातात. माजी मुत्सद्दी राहिलेल्या गोन्झालेझ हे एप्रिलमध्ये विरोधी पक्षांचे उमेदवार झाले.

निवडणूक प्रक्रिया कशी आहे?

व्हेनेझुएलामध्ये भारताप्रमाणेच मतदानयंत्रांचा वापर केला जातो. यंत्रावर मत नोंदविल्यानंतर मतदाराला पसंतीचा उमेदवार दाखविणारी चिठ्ठी मिळते. मतदानकेंद्रातून बाहेर पडताना ही चिठ्ठी मतपेटीत जमा करावी लागते. मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक यंत्रातील उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते दर्शविणारा तक्ता छापला जातो. मात्र या संपूर्ण प्रक्रियेवर सत्ताधारी पक्षाचे कडक नियंत्रण असते. सत्ताधारी पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी थेट मतदानयंत्रांपर्यंत जाऊ शकतात. तसेच पाच सदस्यांची निवडणूक नियंत्रण समितीही सत्ताधारी मादुरो यांचेच पाठिराखे असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना मतदानकेंद्रांमध्ये अडविले जाते. त्यामुळे जाहीर निकालांवर विश्वास ठेवणे अशक्य असल्याची विरोधी पक्षांची भावना आहे.

हेही वाचा : पँगॉन्ग लेकवरील चीनचा पूल तयार; भारतासाठी हा किती मोठा धोका?

विरोधी पक्षांची प्रतिक्रिया काय?

निकाल जाहीर झाल्यानंतर मादुरो यांनी आपला विजयोत्सव सुरू केला असला, तरी विरोधी पक्षाचे पाठीराखे रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. मादुरो यांनी पराभव स्वीकारावा व गोन्झालेझ यांच्याकडे सूत्रे द्यावी अशी मागणी आंदोलक करीत आहेत. मादुरो यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले असले, तरी काही ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. यात आतापर्यंत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हिंसाचारामागे गोन्झालेझ आणि त्यांच्या सहकारी मारिया कोरिना मचाडो असल्याचा आरोप मादुरो यांनी केला असून कोणत्याही प्रकारची हिंसक आंदोलने मोडून काढण्यास आपले सरकार समर्थ असल्याचे आव्हान दिले आहे. आतापर्यंत ७५० जणांना अटक करून मादुरो यांनी आपला शब्द खरा करून दाखविण्यास सुरुवात केली आहे. आता तर गोन्झालेझ आणि मचाडो यांना तुरुंगात टाकण्याची मागणी मादुरो समर्थक करू लागले आहेत.

गोंधळावर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काय?

या कथित निवडणूक घोटाळ्याचा अमेरिकेने निषेध केला आहे. व्हेनेझुएलामधील घडामोडींची आपल्याला चिंता असून की घोषित निकालांमध्ये लोकांच्या इच्छांचे प्रतिबिंब दिसत नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. रशिया आणि चीनने मात्र या निकालाचे स्वागत केले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अध्यक्ष मादुरो यांचे अभिनंदन केले असून व्लादिमीर पुतिन यांनीही व्हेनेझुएला-रशियाच्या सौहार्दपूर्ण संबंधांसाठी हा निकाल पोषक असल्याचे म्हटले आहे. व्हेनेझुएलाच्या शेजारी राष्ट्रांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मादुरो यांचे दीर्घकालीन पाठीराखे असलेल्या क्युबा, बोलिव्हिया आणि निकारागुवा यांनी निकालाचे स्वागत असतानाच अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, पेरू, कोस्टारिका यांनी हा निकाल फेटाळला आहे. ब्राझील आणि मेक्सिको या दोन बड्या राष्ट्रांनी मतदानप्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात झाल्याची संदिग्ध प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : प्रिन्सेस डायना-परिकथेतील राजकुमारीचा अपघाती मृत्यू की हत्या; ३१ ऑगस्ट १९९७ रोजी पहाटे काय घडले होते?

भारताच्या तेलपुरवठ्यावर काय परिणाम?

व्हेनेझुएला हा जगातील सर्वांत अग्रणी तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांमध्ये गणला जातो. जवळपास ३०३ अब्ज बॅरल्स इतका या देशाकडील ज्ञात तेलसाठा आहे. व्हेनेझुएलातील तेल शुद्धीकरणाची क्षमता असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. पश्चिम आशिया आणि रशियावरील खनिज तेल अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने या देशाशी भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी दीर्घ मुदतीचे करार केले आहेत. मध्यंतरी या देशावरील निर्बंध अमेरिकेने शिथिल केल्यानंतर भारतात व्हेनेझुएलाच्या तेलाची आयात सुरू झाली होती. पण अध्यक्षीय निवडणुकीत काही गैरप्रकार होत असल्याची कुणकुण लागल्यानंतर मार्च-एप्रिलदरम्यान अमेरिकेने व्हेनेझुएलावर पुन्हा निर्बंध लादले. त्यामुळे भारतानेही ही आयात कमी केली. निर्बंध कायम राहिले, तर तेलाच्या नवीन स्रोताविषयी भारताला विचार करावा लागेल. चीनसारखे अमेरिकेला न जुमानणारे देश त्या देशाकडून अजूनही तेल विकत घेत राहतील. पण भारतासारख्या अनेक देशांना पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडील अवाढव्य तेलसाठ्यापासून वंचित राहावे लागेल. याचा परिणाम जागतिक तेलसाठ्यावर होऊ शकतो. व्हेनेझुएला, इराण आणि रशिया या तिन्ही बड्या तेल उत्पादक देशांवर वेगवेगळ्या कारणांसाठी अमेरिकेकडून निर्बंध लागू आहेत. जगाची तेलाची भूक भागवण्याची क्षमता एकट्या अमेरिकेत किंवा पश्चिम आशियातील सौदी अरेबियासारख्या बड्या तेल उत्पादक देशात नाही. यामुळेच व्हेनेझुएलातील निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागलेले आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venezuela presidential election nicolas maduro elected as new president its impact on international oil supply print exp css