गुरु दत्त हा भारतीय चित्रपटसृष्टीतला एकमेव असा दिग्दर्शक आहे ज्यांच्या मृत्यूविषयी आजही बऱ्याच चर्चा रंगतान दिसतात. नुकताच आर.बल्की यांचा ‘चूप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातही गुरु दत्त यांच्या चित्रपटांचे आणि खासकरून त्यांचा शेवटचा चित्रपट ‘कागज के फूल’चे संदर्भ आहेत. बल्की यांचा हा चित्रपट गुरु दत्त यांना मानवंदना देणारा ठरला आहे. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून गुरु दत्त यांच्या शेवटच्या चित्रपटाची आणि त्यांच्या मृत्यूमागील गोष्टींची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ‘कागज के फूल’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याची चित्रपट समीक्षकांनी बरीच आलोचना केली. ही समीक्षण गुरु दत्त यांच्या इतकं जिव्हारी लागलं की त्यांनी यापुढे एकही चित्रपट बनवला नाही. या धक्क्यातून आणि खासगी आयुष्याच्या काही धक्क्यातून गुरु दत्त कधी सावरलेच नाही आणि काहीच दिवसांत त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. त्यावेळी समीक्षकांनी नाकारलेला ‘कागज के फूल’ हा चित्रपट आज क्लासिक म्हणून ओळखला जातो.
गुरु दत्त यांचा प्रत्येक चित्रपट हा एका संवेदनशील व्यक्तीच्या शोकांतिकेप्रमाणेच होता. ‘प्यासा’ किंवा ‘ कागज के फूल’सारख्या चित्रपटातून त्यांनी अशाच व्यक्तिमत्त्वाची कथा आपल्यासमोर मांडली. त्यांच्या ‘प्यासा’ला व्यावसायिक यश मिळालं पण ‘कागज के फूल’च्या वेळी त्यांनी त्या काळात १७ लाख रुपयांचं नुकसान झालं, त्यावेळी ती रक्कम चांगलीच मोठी होती. यानंतरच्या चित्रपटांतून त्यांनी व्यावसायिक नफा मिळवला आणि नुकसान भरून निघालं, पण एक दिग्दर्शक म्हणून ‘कागज के फूल’नंतर गुरु दत्त दिसलेच नाही. गुरु दत्त यांच्या चित्रपटांनी भारतीय सिनेसृष्टीला एका वेगळ्या ऊंचीवर तर नेऊन ठेवलंच पण त्यांनी नवीन लोकांनाही बरीच संधी दिली. अभिनेत्री वहिदा रहमान आणि बदरुद्दीन काझी म्हणजेच जॉनी वॉकर यांना चित्रपटसृष्टीत ओळख गुरु दत्त यांच्या चित्रपटातूनच मिळाली. याबरोबरच लेखक दिग्दर्शक अब्रार अलवी, छायाचित्रकार वीके मूर्ती यांची चित्रपटसृष्टीशी ओळख गुर दत्त यांनीच करून दिली.
आणखी वाचा : टेलरींग ते स्टेशनरीच्या दुकानात काम; गजराज राव यांचा संघर्षमय प्रवास, म्हणाले “त्यादिवशी फक्त…”
गुरु दत्त यांना कधीच नकार पचवता आला नाही असं त्यावेळी बोललं जात असे. चित्रपटसृष्टीतल्या कित्येक मातब्बर लोकांनी ही गोष्ट समोर आणली होती. खुद्द देव आनंद यांनीही गुरु दत्त यांच्या या गोष्टीवर प्रकाश टाकला होता. गुरु दत्त अपयश पचवू शकत नसे असं देव आनंद यांनी स्पष्ट केलं होतं. एकेकाळी देव आनंद आणि गुरु दत्त यांची अत्यंत घनिष्ट मैत्री होती. ‘कागज के फूल’ नंतर त्यांना ही अपयश पचवणं आणखीन अवघड गेलं आणि त्यातच वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी गुरु दत्त यांनी आपल्यातून कायमची रजा घेतली.
गुरु दत्त यांच्या चित्रपटाचे विषय जितके गहन आणि सामान्य माणसाच्या आकलनापालिकचे होते तितकंच त्यांचं खासगी आयुष्यही गुंतागुंतीचं होतं. खुद्द गूर दत्त यांची बहिण ललिता यांनी याविषयी खुलासा केला आहे. गुरु दत्त यांची पत्नी आणि लोकप्रिय गायिका गीता दत्त यांचं नातं ही फार गुंतागुंतीचं होतं. त्या दोघांना एकत्र सुखाने राहता येत नसे आणि एकमेकांशिवाय दोघांना चैनदेखील पडत नसे. याचदरम्यान वहिदा रहमान आणि गुरु दत्त यांच्यातली वाढती जवळीकही याला कारणीभूत ठरली असंही काहींचं म्हणणं आहे. गीता दत्तबद्दल गुरु दत्त यांच्या बहिणीने खुलासा केला होता की, “ती खूप चांगली मुलगी होती, पण गुरु दत्त यांचं प्रत्येक अभिनेत्रीबरोबर काहीतरी संबंध आहेत याबद्दल तिला बऱ्याचदा संशय येत असे.” शिवाय गुरु दत्त यांच्या अयशस्वी लग्नाचा दोष बरीच लोकं वहिदा रहमान यांना देतात याबद्दलही ललिता यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या मते वहिदा यांना उगाचच या सगळ्यात ओढण्यात आलं होतं. वहिदा यांनी जेव्हा गुरु दत्त यांचे चित्रपट सोडून इतर चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा नक्कीच गुरु दत्त यांना वाईट वाटलं होतं. पण त्यासाठी त्यांनी आत्महत्या नक्कीच केलेली नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गुरुदत्त यांनी याआधीदेखील दोन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता हे त्यांच्या बहिणीने स्पष्ट केलं आहे. दोन्ही वेळेस त्यांना वाचवण्यात त्यांच्या घरच्यांना यश आलं पण नंतर मात्र त्यांना दारुचं व्यसन आणि डिप्रेशन यामुळे ते कुटुंबापासूनही दुरावले आणि हळूहळू त्यांनी स्वतःला संपवायला सुरुवात केली. आज गुरु दत्त आपल्यात नाही मात्र त्यांच्या ज्या चित्रपटाला समीक्षकांनी सर्वात जास्त नावं ठेवली आज त्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी क्लासिकचा दर्जा दिला आहे. गुरु दत्त यांच्याप्रमाणेच त्यांचे चित्रपटही काळाच्या पुढचे होते म्हणूनच आजही त्यांच्या या चित्रपटांचे, त्यातील गाण्यांचे, दृश्यांचे संदर्भ आजच्या नवीन चित्रपटातही चपखल बसतात.