सिल्डेनाफिलच्या छोट्या निळ्या गोळ्यांना व्हायग्रा नावाने ओळखले जाते. पुरुष लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी तसेच नपूसंकतेवरील उपचारासाठी या गोळीचे सेवन केले जाते. मात्र, एका नवीन अभ्यासात या गोळीचे इतरही फायदे दिसून आले आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात नवीन माहिती समोर आली आहे की, व्हायग्राच्या सेवनाने स्मृतिभ्रंशासारख्या आजारावरदेखील मात केली जाऊ शकते. व्हायग्राच्या सेवनाने मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे मेंदूसंबंधित आजारावर मात केली जाऊ शकते. जर्नल सर्कुलेशन रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षानुसार मेंदूच्या रक्तवहिन्यांसंबंधी असणार्‍या स्मृतिभ्रंशासारख्या आजारात ही गोळी फायदेशीर ठरेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोर्टिस गुरुग्राम येथील न्यूरोलॉजीचे प्रमुख संचालक डॉ. प्रवीण गुप्ता यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, स्मृतिभ्रंशासाठी कोणताही विशिष्ट इलाज नाही. परंतु, या आजारासाठी हा निष्कर्ष संभाव्य टर्निंग पॉइंट ठरू शकतो. संशोधकांनी अभ्यासात नक्की काय सांगितले? व्हायग्रा गोळीचे फायदे काय? खरंच ही गोळी स्मृतिभ्रंशासारख्या आजारावर मात करू शकणार का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

सिल्डेनाफिलच्या छोट्या निळ्या गोळ्यांना व्हायग्रा नावाने ओळखले जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : ‘या’ देशात गाईंच्या ‘ढेकर’वर आकारला जायचा कर; ढेकरवर कर का लावावा लागला? आता हा निर्णय मागे का घेण्यात आला?

रक्तवहिन्यांसंबंधी स्मृतिभ्रंश म्हणजे काय?

जॉन्स हॉपकिन्सच्या मते, रक्तवहिन्यांसंबंधी स्मृतिभ्रंश या आजारामुळे रुग्णांना दैनंदिन कार्य करणेही अशक्य होते. यामुळे मेंदूची क्षमता कमी होते, ज्यामुळे स्मरणशक्तीही कमी होते. रक्तवाहिन्यासंबंधी स्मृतिभ्रंश हा आजार मेंदूतील रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे उद्भवतो, ज्यामुळे मेंदूच्या कार्यात्मक ऊतींचे नुकसान होते, ज्याला ‘पॅरेन्कायमा’ असे म्हणतात. मेयो क्लिनिक नोंदवते की, स्ट्रोक लहान असो वा मोठे, मेंदूच्या ऊतींना गंभीरपणे नुकसान पोहोचवू शकतात. इतर कारणीभूत घटकांमध्ये एथेरोस्क्लेरोसिसचा समावेश आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात आणि रक्त प्रवाह कमी होतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदूत रक्तस्राव होतो.

नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “या संशोधनामुळे भविष्यात सिल्डेनाफिलचा उपयोग स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी करता येईल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.” रक्तवहिन्यांसंबंधी स्मृतिभ्रंश होण्याच्या जोखमीच्या घटकांमध्ये वृद्धत्व, उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा, वाढलेले कोलेस्ट्रॉल आदींचा समावेश आहे.

भारतातील स्मृतिभ्रंशाचे प्रमाण

‘व्ह्स्क्युलर कॉगनिटीव्ह इमपेअरमेंट इन इंडिया’ या अभ्यासानुसार रक्तवहिन्यांसंबंधी स्मृतिभ्रंशाचे प्रमाण भारतात अधिक आहे. अभ्यासात आढळून आले आहे की, भारतात स्मृतिभ्रंश आजाराने ग्रस्त असणार्‍या ५.३ दशलक्ष रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण रक्तवहिन्यांसंबंधी स्मृतिभ्रंश आजाराने ग्रस्त आहेत. ऑक्सफर्डच्या अभ्यासाने ही स्थिती नियंत्रणात आणण्याची आशा पल्लवीत झाली आहे. हे निष्कर्ष प्रोत्साहन देणारे असले तरी यावर आणखी संशोधनाची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन संशोधन काय सांगतंय?

अभ्यासाच्या क्लिनिकल चाचणीमध्ये ७५ हून अधिक सहभागींचा समावेश होता, ज्यांना सौम्य आणि लहान रक्तवाहिन्यांच्या आजाराची लक्षणे दिसून आली होती. या सहभागींना ठरलेल्या कालावधीनुसार तीन आठवडे सिल्डेनाफिल (व्हायग्रा), प्लेसबो आणि सिलोस्टाझोल हे औषध देण्यात आले. अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय स्कॅनचा वापर करून त्यांची तपासणी केल्यानंतर शास्त्रज्ञांना आढळले की सिल्डेनाफिल मोठ्या आणि लहान दोन्ही मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह वाढवते. अभ्यासात असेही आढळून आले की, सिल्डेनाफिल आणि सिलोस्टाझोल या औषधांपैकी सिल्डेनाफिलचे कमी दुष्परिणाम होतात, तर सिलोस्टाझोलमुळे अतिसारसारखी लक्षणे आढळू शकतात.

हेही वाचा : चित्त्यांचा नवा अधिवास म्हणून गांधीसागर वन्यजीव अभयारण्याचीच निवड का?

“ही पहिलीच चाचणी आहे, ज्यात दिसून आले आहे की सिल्डेनाफिल औषध आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये जाते आणि रक्त प्रवाह सुधारते,” असे या अभ्यासातील संशोधकांपैकी एक असलेल्या डॉ. ॲलिस्टर वेब यांनी सांगितले. यासंबंधी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viagra tablet could improve brain function oxford study rac