तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे सायबर गुन्हेगार सामान्य माणसांना लुटण्याच्या नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वैयक्तिक माहिती चोरणे आणि त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. तंत्रज्ञानासह सायबर गुन्ह्यांमध्येही अत्याधुनिकता येत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील व्यक्ती सायबर गुन्ह्यात बळी ठरली, तर त्यानंतर सर्वांत पहिल्यांदा काय करावे? कुठे तक्रार करावी आणि कशी करावी? ही माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
सायबर गुन्ह्यांचे प्रकार काय आहेत?
फिशिंग (Phishing) : या प्रकारात सायबर गुन्हेगार फसवे ई-मेल किंवा मेसेजस अनेक लोकांना पाठवितात. ई-मेल किंवा मेसेजला उत्तर देणाऱ्या लोकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो किंवा लोकांनी जी माहिती इतरांना द्यायला नको, ती या प्रकारात दिली जाते.
रॅनसमवेअर (Ransomware) : या प्रकारात सॉफ्टवेअरच्या मदतीने पीडितांचा डेटा हस्तगत करून, इन्क्रिप्ट (Encrypts) केला जातो. डेटा पुन्हा मिळवायचा असेल, तर खंडणीची मागणी केली जाते. या प्रकारात अनेकदा महत्त्वाचा डेटा गहाळ होतो किंवा आर्थिक नुकसान होते.
इतरांची ओळख चोरून गुन्हे करणे (Identity Theft) : एखाद्या व्यक्तीची ओळख चोरून, त्याच्या वैयक्तिक माहितीचा वापर इतरांना फसविण्यासाठी करण्यासाठी ही ट्रिक वापरली जाते. जसे की, सोशल मीडियावर अकाउंट हॅक करणे आणि इतरांकडे पैसे मागणे किंवा तुमचे डेबिट, क्रेडिट वापरून व्यवहार करणे.
ऑनलाइन घोटाळा (Online Money Scams) : इंटरनेटवर अनेक फसव्या योजना आहेत. या योजनांद्वारे अधिक पैसे कमविण्याचे किंवा पार्ट टाइम काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यासाठी पीडितांना नोंदणी शुल्क पाठविण्यास सांगून, त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. कधी कधी वैयक्तिक माहिती संपादित करून, त्याद्वारे पुन्हा आर्थिक पिळवणूक केली जाते.
हे वाचा >> सायबर तक्रारदारांचे हेलपाटे वाचणार; प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देण्याची सुविधा
सायबर पाठलाग किंवा सायबर छळवणूक (Cyber Stalking and Cyber Bullying) : स्टॉकिंग प्रकारात एखाद्याचा दीर्घ काळ ऑनलाइन पिच्छा पुरविला जातो. ऑनलाइन छळवणूक किंवा एखाद्याला इंटरनेटवरून त्रास दिला जातो. सायबर बुलिंग म्हणजेच छळवणूक या प्रकारातही धमकी देणे, दहशत निर्माण करणे, समोरची व्यक्ती अपमानित होईल, असे कृत्य करणे, या प्रकाराचा समावेश होतो.
अशा प्रकारे ईमेल फसवणूक, सोशल मीडिया गुन्हे, मोबाइल ॲपशी संबंधित गुन्हे, व्यावसायिक ईमेल हॅक करणे, डेटा चोरणे, नेट बँकिंगशी निगडित फसवणूक, एटीएम फसवणूक, खोटे फोन कॉल, विमा फसवणूक, लॉटरी घोटाळा, बिटकॉइन अशा इतर सायबर गुन्ह्यांचाही उल्लेख करता येईल.
पहिल्यांदा काय कराल?
जेव्हा तुम्हाला सर्वांत आधी कळेल की, तुम्ही सायबर गुन्ह्याचे बळी ठरले आहात. त्यानंतर सर्वांत आधी तुम्ही बँक खाते गोठवून टाका. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या ग्राहक मदत क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो. तुमची वैयक्तिक माहिती चोरी झाल्याचे सांगून बँक खाते गोठवता येऊ शकते.
राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (NCRP)
राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल (National Cybercrime Reporting Portal – NCRP) हा एक सरकारी उपक्रम आहे. ज्या ठिकाणी सायबर गुन्ह्यातील पीडितांना ऑनलाइन तक्रारी नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या पोर्टलवर फक्त सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रारीच नोंदविल्या जातात, तसेच महिला व मुलांच्या विरोधातील सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष दिले जाते. पोर्टलवर नोंदणी केलेल्या तक्रारी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडे (पोलिसांकडे) हस्तांतरीत होतात. अचूक कारवाई होण्यासाठी पीडित व्यक्तींनी पोर्टलवर अतिशय सुस्पष्ट माहिती भरणे आवश्यक आहे.
हेल्पलाइन क्रमांक १९३०
१९३० हा क्रमांक राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक म्हणून ठरविला गेला आहे. जर तुमच्यासोबत सायबर गुन्हा घडला, तर तुम्ही त्वरित या नंबरवर फोन करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, संपर्क क्रमांक, ज्या बँक खात्यावरून फसवणूक झाली आहे, त्याची माहिती हेल्पलाइनवर द्यावी लागेल.
ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सोय :
- जर तुम्ही सायबर गुन्ह्यामध्ये शिकार झाला असाल किंवा तुम्हाला महिला आणि मुलांच्या बाबतीत झालेल्या सायबर गुन्ह्यांसंबंधित तक्रार करायची असेल, तर तुम्ही https://cybercrime.gov.in वेबसाइटवर जाऊन तक्रार दाखल करू शकता. निनावी तक्रार दाखल करण्याचीही इथे सोय आहे.
- इथेही तक्रार दाखल करीत असताना तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पुरवावी लागणार आहेत. जसे की, तुमचा बँक खाते क्रमांक, ज्या खात्यात तुम्ही रक्कम हस्तांतरित केली आणि बँक खात्याशी जोडलेला तुमचा संपर्क क्रमांक द्यावा लागेल. या पोर्टलवर तुमच्या तक्रारीवर काय काय कार्यवाही होत आहे, त्याचीही माहिती तुम्ही वेळोवेळी मिळवू शकता.
- पोर्टलवर गेल्यानंतर File a complaint वर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. यावेळी तुम्ही नोंदणी करीत असताना दिलेल्या मोबाइल क्रमाकांवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी ३० मिनिटांच्या आत वापरणे अनिवार्य आहे; अन्यथा ओटीपी काही कामाचा राहत नाही. नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरने साईटवर खाते उघडले की, तुम्ही तुमची ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
- पोर्टलवर एकदा का तक्रार दाखल केली की, ती तक्रार संबंधित राज्य, केंद्रशासित प्रदेशामधील तक्रारदाराशी संबंधित असलेल्या पोलिस ठाण्यात पाठविली जाते. तसा संदेशही तुमच्या मोबाइलवर पाठविला जाईल. तक्रार नोंदविल्यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा ई-मेलद्वारे तक्रार क्रमांक आणि इतर माहिती पुरविली जाईल.
जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे
जर तुम्हाला ऑनलाइन किंवा हेल्पलाइनवरून तक्रार दाखल करणे शक्य नसेल, तेव्हा तुम्ही जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करू शकता. पोलिस ठाण्यातील अधिकारी तुमची तक्रार सायबर सेलकडे हस्तांतरीत करतील.
इतर हेल्पलाइन क्रमांक :
राष्ट्रीय पोलिस हेल्पलाइन क्रमांक – ११२
राष्ट्रीय महिला हेल्पलाइन क्रमांक- १८१
टोल फ्री पोलिस कंट्रोल रूम क्रमांक- १००