चीनमधील तापमान अभूतपूर्व उच्चांकावर पोहोचले आहे, त्यामुळे केवळ लोकच नाही तर ‘कार’ही हैराण झाल्याचं चित्र आहे. कदाचित हे अनेकांना हास्यास्पद वाटू शकेल, परंतु पर्यावरणाला हानी पोहचवल्यानंतर काय होऊ शकतं याच हे उत्तम उदाहरण आहे. सोशल मीडिया, विशेषत: X (पूर्वीचे ट्विटर) वर, व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये कारचा पुढचा भाग फुगा फुगवल्यानंतर दिसतो तसा दिसत आहे. त्यामुळे या कार ‘गर्भवती’ असल्याचे भासते असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. ‘बेबी बंप’ असलेल्या कारच्या या विचित्र घटनेने लोकांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण एकाच वेळी निर्माण केले आहे, त्यामुळे अनेकांनी अशा प्रकारची विचित्र घटना का घडतेय? असा प्रश्न विचारला आहे.
नक्की काय प्रकरण आहे? ‘मेड-इन-चायना’ कार गर्भवती का होत आहेत?
या व्हिडीओजने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चीनमधील पत्रकार जेनिफर झेंग यांनी या गाड्यांचा व्हिडिओ शेअर करत X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “यात कोणताही विनोद नाही! जेव्हा वातावरण उष्ण असते तेव्हा मेड-इन-चायना कार गर्भवती होतात.” त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आठ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओत ऑडीसह वेगवेगळ्या कारची मॉडेल्स रस्त्यावर-उघड्यावर पार्क केलेली दिसत आहेत. तर गाडीच्या समोरच्या भागावर मोठा बम्प आल्याचे दृश्य आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विनोद, चिंता आणि अनुमान या मिश्र भावना एकाच वेळी प्रकट केल्या जात आहेत.
अधिक वाचा: Vasco da Gama ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
गाड्यांना बेबी बम्प
किंबहुना ज्यांच्या गाड्यांना अशा प्रकारचे फुगे आले आहेत, त्यांनी नेमकं काय करावं हा प्रश्न विचारला आहे. ते फोड फोडल्याचे विषारी वायूचं उत्सर्जन तर होणार नाही ना, असेही प्रश्न विचारले जात आहेत. तर जगभरात ही पोस्ट व्हायरल झाल्याने अनेकजण चिनी वस्तूंच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
विज्ञान काय सांगते?
परंतु तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हे विचित्र दृश्य कारमधील यांत्रिक बिघाड किंवा मॅन्युफॅक्चरिंग दोषांमुळे नाही तर थेट चीनमधील विक्रमी तापमानाशी संबंधित आहे. कारच्या बाहेरील पेंटच्या संरक्षणासाठी, तसेच सौंदर्यात भर घालण्यासाठी विनाइल फिल्म्सचा वापर केला जातो. विविध प्रकारच्या हवामानातील बदलांशी सामना करण्यासाठी त्यांची मजबूत रचना असूनही, त्यांना अत्यंत उष्णतेमध्ये गंभीर आव्हानाचा सामना करावा लागत आहे. या विनाइल फिल्म्सच्या अग्रगण्य निर्मात्या व्रॅप गाइजमधील तज्ज्ञांनी असे निदर्शनास आणले आहे की, या विनाइल फिल्म्स उच्च तापमान आणि प्रखर सूर्यप्रकाश यांच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात आल्या की, त्यांची मूळ रचना बदलते. त्यावर व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे बुडबुडे, ताण किंवा फुगे येऊ शकतात.
अशा समस्यांपासून बचाव करण्यासाठी कारच्या आवरणांमध्ये यूव्ही-संरक्षणात्मक थर येत असले तरी, चीनमधील विक्रमी तापमानापुढे तेही कुचकामी असल्याचे सिद्ध झाले आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी, तज्ज्ञांनी मजबूत आणि चिकटपणा अधिक असलेले उच्च-गुणवत्तेचे रॅप्स वापरण्याची आणि थेट सूर्यप्रकाशात पार्किंग टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्याऐवजी, ते कार मालकांना सूर्यप्रकाशाचा धोका कमी करण्यासाठी कारपोर्ट किंवा गॅरेजसारख्या सावली असलेल्या ठिकाणी त्यांचे वाहन पार्क करण्याचा सल्ला देतात.
चीनमध्ये हवामान बदलाचा परिणाम
“गर्भवती कार” चे दृश्य सुरुवातीला विनोदी वाटत असले तरी, ते ही एक अधिक गंभीर समस्या असल्याचे मत तज्ज्ञ अधोरेखित करतात. दैनंदिन जीवनावर हवामान बदलाचा वाढता प्रभाव दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हवामान अधिकाऱ्यांनी हाँगकाँग फ्री प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पूर्व आणि उत्तर चीनमध्ये विक्रमी तापमानाचा अनुभव येत आहे. गेल्या शनिवारी हांगझोऊमध्ये पारा ४१.९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आणि नवीन उच्चांक स्थापित केला. २०२२ साली हाच पारा ४१.८ अंश सेल्सिअस होता. सोशल मीडियावर देखील वाढत्या उष्णतेवर टीका करणाऱ्या प्रतिक्रियांचा भडीमार आहे. चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Weibo वर एका नेटकर्त्याने लिहिलं आहे की, “मला असे वाटते की मी वितळणार आहे,” तर दुसरा व्यंग्यात्मक प्रश्न करतो, “हँगझो हे राहण्यासाठी इष्ट ठिकाण कोणाला वाटते?”. शांघाय २५ दशलक्ष लोकांच्या गजबजलेल्या मेगासिटीमध्ये दुपारी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दरम्यान, जूनमध्ये मध्य आणि दक्षिण चीनला मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण पूर आणि भूस्खलनाने ग्रासले, ज्यात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला, वीजपुरवठा खंडित झाला आणि पिके उद्ध्वस्त झाली.
एकूणच चीनच्या गर्भवती कार ही उपमा कितीही रंजक आणि हास्यास्पद असली तरी तिच्या या रुपामुळे वाढल्या तापमानाची भीषणता लक्षात येते.