Burhanpur Asirgarh Fort History: ‘छावा’ चित्रपटात मराठ्यांनी बुऱ्हाणपूरवर केलेला हल्ला दाखवण्यात आला आहे. छावा चित्रपटाची सुरुवातच बुऱ्हाणपूरच्या लढाईपासून होते. बुऱ्हाणपूरच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या खजिन्याचे भंडार दाखवले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या सैनिकांसह बुऱ्हाणपूरवर आक्रमण करून येथील खजिना आपल्यासह नेला होता. त्यानंतर असिरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा पसरली. या अफवांमुळे बुऱ्हाणपूरमधील असीरगड किल्ल्याजवळ स्थानिकांनी रात्रीच्या अंधारात सोन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम सुरु केले होते… चित्रपट पाहून स्थानिकांनी फावडे, मेटल डिटेक्टर आणि टॉर्च घेऊन असिरगड किल्ल्यावर धाव घेतली, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. असिरगड किल्ला मुख्यतः मुघल इतिहासाशी संबंधित आहे. शिवाय या किल्ल्याविषयी अनेक स्थानिक वदंताही प्रचलित आहेत. त्याच निमित्ताने या किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

दख्खनची किल्ली

असिरगड किल्ला हा अहीरगड किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर शहराच्या सुमारे २० किलोमीटर उत्तर दिशेला सातपुडा पर्वतरांगेत आहे. हा किल्ला १५ व्या शतकात बांधण्यात आल्याचे मानले जाते. सातपुड्यांमधून जाणाऱ्या घाटमार्गावर हा किल्ला उभा असून तो नर्मदा आणि तापी या दोन खोऱ्यांना जोडतो. हा मार्ग उत्तर भारतातून दख्खनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांपैकी एक होता. म्हणूनच या किल्ल्याची ओळख ‘दख्खनची किल्ली’ (Key to the Deccan) अशीही आहे.

हा किल्ला कोणी बांधला?

असिरगड किल्ला १५ व्या शतकाच्या सुरुवातीस आशा अहीर नावाच्या राजाने बांधला, असे मानले जाते. खानदेशचा सुलतान नासिर खान याने आशा अहीर याची हत्या करून किल्ला बळकावला. हा किल्ला भारतामधील सात अजिंक्य किल्ल्यांपैकी एक मानला जात होता. फारुकी घराण्याने खानदेशवर दोनशेहून अधिक वर्षे राज्य असिरगडाच्या मदतीनेच केले. नंतरच्या कालखंडात नासिर खानचा वंशज सुलतान बहादूर शाह (१५९६–१६००) याने मुघल बादशहा अकबर आणि त्याचा मुलगा दानियाल यांना अधीन राहण्यास नकार दिला आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. परिणामी, १५९९ साली अकबराने बुऱ्हाणपूरकडे मोर्चा वळवला आणि शहर ताब्यात घेतले. त्यानंतर अकबराने असिरगड किल्ल्याला वेढा घातला आणि १७ जानेवारी १६०१ रोजी बहादूर शाहला फसवून किल्ला ताब्यात घेतला.

औरंगजेबाचं बुऱ्हाणपूर कनेक्शन

औरंगजेबाने त्याच्या दक्षिणेतील मोहिमेच्या वेळी बुऱ्हाणपूरचा वापर मुख्य छावणी म्हणून केला होता. काही काळ बुऱ्हाणपूर ही त्याची राजधानी होती. त्या काळात मुघल खजिन्याच्या संरक्षणासाठी असिरगड किल्ल्याचा वापर करण्यात आला, असेही मानले जाते. त्यानेच राबवलेल्या दख्खन मोहिमेमुळे हे स्थान अधिक सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले.

ब्रिटिशांनी असिरगड जिंकला

दुसऱ्या इंग्रज- मराठा युद्धादरम्यान १८ ऑक्टोबर १८०३ रोजी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजांनी असिरगडचा गावाकडील भाग जिंकला. या चकमकीत दोन सैनिक ठार तर पाच जखमी झाले होते. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धाच्या अखेरीस १८१९ च्या सुरुवातीला बहुतांश मराठा किल्ले ब्रिटिशांनी जिंकले होते. मात्र, हा एकमेव किल्ला किल्लेदार जसवंत राव लार यांच्या अधिपत्याखाली होता. त्यावर्षी मार्च महिन्यात ब्रिटिश सैन्याचा एक मोठा ताफा असिरगडवर चालून गेला आणि किल्ल्याजवळील गाव ताब्यात घेऊन तिथे तात्पुरती छावणी ठोकली. त्यानंतर सातत्याने किल्ल्यावर तोफांचा मारा करून ९ एप्रिल रोजी ब्रिटिशांना किल्ला जिंकण्यात यश मिळाले.

किल्ल्याची रचना

या किल्ल्याची रचना मुख्यतः भारतीय स्थापत्यशैलीवर आधारित आहे. काही भागांमध्ये फारुकी आणि मुघल स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे या किल्ल्याच्या स्थापत्यरचनेत इस्लामिक, पर्शियन, तुर्की आणि भारतीय शैलींचा संगम आहे. पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी येथे तीन मानवनिर्मित तलाव आहेत. किल्ल्यात गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे. स्थानिक दंतकथेनुसार, महाभारताच्या कथानकातील अश्वत्थामा दररोज सकाळी या मंदिरात येऊन भगवान शिवाची पूजा करत असे आणि त्यांना फुलं अर्पण करत असे.

किल्ल्याच्या आत फारुकी कालखंडातील भग्नावस्थेतील एक मशीद आहे, तिला असिर मशीद म्हणतात. हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यशैलीशिवाय येथे काही ब्रिटिशकालीन अवशेषही आहेत, शिवाय काही ब्रिटिशांची थडगी सुद्धा आढळतात. ब्रिटिशांनी हा किल्ला सोडल्यानंतर तो ओसाड पडला.

असिरगडच्या दंतकथा आणि खजिन्याच्या अफवा

अश्वत्थामा आणि गुप्तेश्वर महादेव मंदिर याभोवती स्थानिक लोकांच्या अनेक रहस्यमय कथा गुंफलेल्या आहेत. मंदिराजवळ ‘अदृश्य शक्ती’ असल्याची वदंता आहे. ब्रिटिशांनी किंवा मुघलांनी खजिना लपवून ठेवला आहे, अशा अफवांनी कित्येक वेळा स्थानिकांना उत्तेजित केलं आहे. आता छावा चित्रपटाने त्या आठवणींना नवी धार दिली.

पर्यटनाची संधी की संकट?

किल्ला सध्या ओसाड असला तरी त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे पर्यटनाच्या दृष्टीने मोठी संधी ठरू शकतो. पण, त्याचबरोबरीने अशा ठिकाणी खजिन्याच्या अफवांनी अवैध उत्खनन, वारसा नाश आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे पुरातत्त्व खाते, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सांस्कृतिक मंत्रालय यांच्या पुढाकाराने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. किल्ला ज्या भागात आहे त्या भागात आजही आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. अशा ठिकाणच्या ऐतिहासिक स्मारकांचा विकास झाल्यास त्या परिसरातील सामाजिक-आर्थिक स्थितीतही सुधारणा होऊ शकते. ‘इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो भविष्य घडवतो’ हे अधोरेखित करण्याची ही संधी आहे.

सत्ता, बंड, विश्वासघात आणि संघर्षाचा इतिहास

किल्ल्याच्या थरांखाली दडलेले गूढ, लोककथांमधून पोसलेले खजिन्याचे किस्से आणि चित्रपटाने जागवलेली उत्सुकता या साऱ्यांनी मिळून असिरगड किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण या भुरळ घालणाऱ्या अफवांच्या पलिकडे असिरगड किल्ला एका प्रदीर्घ इतिहासाची साक्ष देतो. सत्ता, बंड, विश्वासघात आणि संघर्ष अशा संमिश्र भावनांचा इतिहास या किल्ल्याने आपल्या उदरात सांभाळून ठेवला आहे. छाव्यानं जरी लोकांना खजिन्याची स्वप्नं दाखवली असली, तरी खरा ठेवा या किल्ल्याच्या भिंतींमध्ये दडलेला इतिहास आहे. जो जाणून घेण्यासाठी फावड्याची गरज नाही….गरज आहे ती फक्त जिज्ञासेची आणि जाणिवेची!