सध्या रिल्सचा जमाना आहे. रिअल लाईफपेक्षा व्हर्चुअल जगात घडणाऱ्या घडामोडींना आपण अधिक प्राधान्य देतो. जग कोणतेही असो रिल ऑर रिअल पण एक गोष्ट सामान्य आहे, ती म्हणजे बाई, कुठेही तिला सहज सॉफ्ट टार्गेट करता येत. आजकाल व्हायरल होणाऱ्या अनेक रिल्सपैकी अनेकांचा विषय हा ‘ती’चाच आहे. त्याच असंख्य व्हायरल होणाऱ्या रिल्सपैकी एका रिलमध्ये चक्क ‘आपल्या बायकोच ऐकण्याचा’ सल्ला देण्यात आलेला आहे. एक व्यक्ती दशरथ, राम, आणि रावण यांचा दाखला देत आहे. ती म्हणते दशरथाने कैकयीचे ऐकले पुढे काहीही होवो, रामाने सीतेचे ऐकले आणि हरणाच्या मागे गेला पुढे काहीही होवो. पण रावणाने मंदोदरीचे ऐकले नाही आणि तो आजपर्यंत जळत आहे. त्यामुळे माझा सगळ्या नवऱ्यांना सल्ला आहे की, फार डोकं लावू नका, पटो वा न पटो आपल्या बायकोचं ऐका. यानंतर एकच हशा पिकला. कदाचित या वर्णनावरून वाटेल, अरे चांगलं तर आहे बायकोचं ऐकण्याचा सल्ला दिला आहे. पण हे बोलणं व्यंगात्मक आहे. हा काही या एका रिलचा विषय नाही. बायकोचं किंवा बायकांचं ऐकायचं की नाही हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. बायकांना काय कळतं, अशी टीकाही होते. त्यामुळेच याबाबतीत प्रसिद्ध देहबोली विश्लेषक अ‍ॅलन आणि बार्बरा पीज यांनी केलेले विश्लेषण नक्कीच जाणून घेण्यासारखे आहे.

अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?

‘द डेफिनिटिव्ह बुक ऑफ बॉडी लँग्वेज, व्हाय मेन लाय अ‍ॅण्ड वुमन क्राय, व्हाय मेन डोन्ट लिसन अ‍ॅण्ड वुमन कान्ट रीड मॅप्स’ या त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी स्त्री आणि पुरुषांच्या देहबोलीची वैशिष्ट्ये वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे वर्णन केलेली आहेत. त्यातच त्यांनी स्त्रियांची आकलन शक्ती ही पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. शिवाय स्त्रिया पुरुषांना काही सांगू पाहतात, तेंव्हा त्यातला महत्त्वाचा भागच पुरुषांना का कळत नाही याचे सोदाहरण स्पष्टीकरण दिले आहे. लेखकांनी स्त्रियांच्या मेंदूची रचना अनेक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी कशी पूरक असते हे दाखवून दिले आहे. स्त्रियांच्या या मेंदूच्या विशिष्ट रचनेमुळे त्या अनेक व्यवधानं एकाच वेळी सांभाळत असतात. सर्वसाधारण स्त्री- एकमेकांशी संबंध नसलेल्या चार गोष्टी कुशलतेने करू शकते. म्हणजे ती टीव्ही वरचा कार्यक्रम पाहताना फोनवर बोलू शकते, त्याच वेळी तीच्या मागे काय संभाषण चालू आहे याकडेही तीच लक्ष असतं आणि कॉफी पितापिता ती हे सगळं करत असते. संभाषणात एकमेकांशी संबंध नसलेल्या अनेक विषयांवर बोलताना ती विषय बदलण्यासाठी आणि काही गोष्टी ठासून सांगण्यासाठी आवाजात पाच प्रकारचे चढ उतार करते. दुर्दैवाने बहुतेकवेळा पुरुषांना त्यातले फक्त तीनच प्रकार आत्मसात करता येतात. परिणामी जेंव्हा स्त्रिया पुरुषांना काही सांगू पाहतात, तेंव्हा त्यातला महत्त्वाचा भागच त्यांना कळत नाही.

अ‍ॅलन आणि बार्बरा पीज यांनी आपले म्हणणे पटवून देण्याकरिता मेंदू संदर्भातील एका संशोधनाचा दाखला दिला आहे. या संशोधनात एक महत्त्वाची गोष्ट आढळून आली. ती म्हणजे या ग्रहावरच्या कुठल्याही पुरुषाला संवादात नामोहरम करण्याइतका स्त्रियांचा मेंदू सुसज्ज असतो. मॅग्नेटिक रिझोनन्समध्ये मेंदूची तपासणी केल्यानंतर स्त्रियांची लोकांबरोबर संवाद साधण्याची आणि त्यांचं मूल्यमापन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त का असते, हे सिद्ध झालंय. स्त्रियांच्या मेंदूत इतरांच्या वागणुकीचं मूल्यमापन करणारी १४ ते १६ क्षेत्र असतात तर पुरुषांच्या डोक्यात ही क्षेत्र केवळ ४ ते ६ इतकीच असतात. हे पटवून देण्याकरिता लेखक डिनर पार्टीचं उदाहरण देतात. बहुतेक स्त्रिया डिनर पार्टीला जाऊन आल्या आल्या पार्टीतील इतर जोडप्यांचे संबंध कसे आहेत, हे लगेचच ओळखतात. कोणत्या जोडप्यांचे एकमेकांशी पटत नाही. कोण कोणास आवडतं वगैरे याबाबतीत लगेच निरीक्षण नोंदवतात. त्यामुळॆ स्त्रिया कधीच गप्प बसत नाहीत, असं पुरुषांचं मत असतं. तर त्या पार्टीत इतकं सगळं घडलंय किंवा पडद्यामागे घडतंय याचा मागमूसही पुरुषांना नसतो, म्हणून पुरुष फार बोलत नाहीत किंवा त्यांना कळत नाही असं स्त्रियांचं मत असतं. अभ्यासाअंती असं आढळून आलंय की, जी व्यक्ती समोर भेटलेल्या व्यक्तीविषयी ज्याच्या बाह्यतम रुपावरुन आडाखे मांडते, तेव्हा तिचे निष्कर्ष स्वतःच्या अंतःप्रेरणेवर अवलंबून असतात आणि हे आडाखे दुसऱ्या व्यक्तीचे मत ऐकून आपले मत बनविणाऱ्या व्यक्तीपेक्षा अचूक येऊ शकतात. म्हणूनच लेखकांनी स्त्रियांची आकलनशक्ती जास्त असल्याचे म्हटले आहे.

अधिक वाचा: महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

ज्याला दुसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातील आणि हावभावांमधील विरोधाभास ओळखता येतो. त्याची आकलन शक्ती चांगली आहे असे मत लेखकाने (अ‍ॅलन आणि बार्बरा पीज) मांडले आहे. एकूणात स्त्रियांची आकलन शक्ती पुरुषांच्या तुलनेत खूपच चांगली असते. यातूनच स्त्रियांची अंत:प्रेरणा हा शब्द उदयाला आला. बोलण्या व्यतिरिक्त इतर खाणाखुणा, संकेत ओळखण्याची क्षमता स्त्रियांच्यात जन्मजातच असते, अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असतं म्हणूनच फार थोडे नवरे बायकांशी खोटं बोलू शकतात आणि निभावू नेऊ शकतात.

हॉवर्ड विद्यापीठाच्या मनोवैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनावरून असं आढळून आलं आहे, की देहबोलीबाबत स्त्रिया या पुरुषांच्या तुलनेत अतिसावध असतात. याच प्रयोगासाठी स्त्री पुरुषांच्या एका गटाला चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाचा आवाज बंद करण्यात आला होता. आणि केवळ चित्रपटातील दृश्यामध्ये दिसणाऱ्या स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांच्या हावभावावरूनच नक्की ते काय बोलत असतील, हे लिहून काढण्यास सांगितले. आणि प्रयोगाअंती असे लक्षात आले की, या प्रयोगात सहभागी झालेल्या स्त्रियांनी त्या दृश्याचा ८७ टक्के अर्थ अचूक लावला, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण केवळ ४२ टक्के इतकेच होते. शिक्षण, पालन पोषण, कला, रुग्णसेवा या क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांनी स्त्रियांप्रमाणेच प्रतिसाद नोंदवला. समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांनीही यात चांगले गुण मिळविले. शब्दांविना भाव जाणून घेण्याची क्षमता स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या असते. कारण निसर्गाने त्यांना आई होण्याचा मान दिलेला आहे. आई आपल्या मुलांशी शब्दांविना संवाद साधते. त्यामुळे स्त्रियांची आकलन शक्ती पुरुषांपेक्षा जास्त चांगली असते.