Viral video of a man tutoring Bengali fish sellers: एका बाजूला देवी कालीला बोकडाचा बळी दिला जातो, तर दुसऱ्या बाजूला मंदिराच्या शेजारी मासे विकणाऱ्यांना धर्म शिकवला जातो. दिल्लीतील चित्तरंजन पार्कमधील एका व्हिडिओमुळे उफाळून आलेला वाद केवळ मासेविक्रेत्यांशी संबंधित नाही; तर तो बंगाली हिंदू धर्माच्या आणि सध्याच्या एकसंध हिंदुत्त्वाच्या संकल्पनांमधील संघर्षाचं प्रतिबिंब आहे. बंगालमधील धार्मिकता, तिचं अन्नाशी असलेलं नातं आणि विविध देवतांच्या पूजांमधील भिन्नता हे भारतातील बहुविध सनातन संस्कृतीचं मूळ रूप आहे. मात्र, अलीकडे राजकीय हस्तक्षेप आणि नैतिक पोलीसगिरीमुळे खायचं काय आणि धर्माचं पालन नक्की कसं करायचं यावरून सामाजिक भेद तीव्र होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, बंगाली हिंदूंचं अध्यात्म, त्यांच्या मांसाहारी परंपरा, आध्यात्मिक गुरूंची भूमिका आणि ‘यंग बंगाल’सारख्या ऐतिहासिक चळवळीचा वेध इंडियन एक्स्प्रेसच्या अभिक भट्टाचार्य यांनी घेतला आहे.
हिंदी पट्ट्यातील सनातन समज
दिल्लीच्या चित्तरंजन पार्कमधील बाजारात एक व्यक्ती बंगाली मत्स्यविक्रेत्यांना कोणत्याही प्राण्यांना इजा पोहोचवू नये हीच सनातन धर्मियांची जबाबदारी आहे, असे सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच वादंग उभा राहिला. राजकीय वातावरण तापलं… तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपावर टीका करत म्हटलं की, “आम्ही काय खाणार आणि आमची दुकानं कुठे असावीत हे ठरवण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला?” दुसरीकडे, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या प्रकाराशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करत तीव्र निषेध व्यक्त केला. मात्र, या व्हिडिओमधील व्यक्तीने (या व्यक्तीची ओळख अद्याप झालेली नाही) असा आरोप केला की, मंदिराच्या शेजारी असलेल्या मत्स्यविक्री बाजारामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. यामुळेच एक मोठा सांस्कृतिक वाद उद्भवला आहे. एकीकडे हा मुद्दा सध्याच्या हिंदुत्त्व हे एकच एक असण्याच्या मुद्द्यावर बोट ठेवतो, तर दुसरीकडे बंगाली सनातन विचार आणि हिंदी पट्ट्यातील सनातन समज यामधील फरक अधोरेखित करतो.
बंगालमधील हिंदूंचे आध्यात्म
बंगाली हिंदू आणि मांसाहार यांचं नातं आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि राजकीय अशा तीन स्तरांवर जोडलेलं आहे. बंगालमधील हिंदूंचे आध्यात्म हे शक्ती उपासना आणि वैष्णव पंथ अशा दोन प्रमुख पंथांमध्ये विभागलेलं आहे. शक्ती उपासनेमध्ये काली आणि दुर्गा यांसारख्या देवींची पूजा होते, तर चैतन्य महाप्रभूंनी भक्ती चळवळीतून लोकप्रिय केलेल्या वैष्णव परंपरेत श्रीकृष्ण आणि त्याच्या अवतारांची पूजा केली जाते. या दोन पंथांमध्ये केवळ धार्मिक विधिंमध्येच नव्हे तर आहार पद्धतीतही स्पष्ट फरक आहे. शक्ती उपासक मांसाहारी असतात, तर वैष्णव भक्त शाकाहारी असतात.
मांसविक्रीसाठी चढाओढ
बंगालमध्ये काली पूजन हे बलिप्रथेपासून वेगळं होऊ शकत नाही. राजा कृष्णचंद्र रॉय यांच्या आदेशाने सुरू झालेली काली पूजा (या पूजेचा उल्लेख मिशनरी विल्यम वॉर्ड यांच्या १८१५ सालच्या पुस्तकात आहे) ही बोकडांच्या बळीशिवाय पूर्ण होत नाही. कोलकात्याजवळील कालीघाट मंदिर हे रोज दिल्या जाणाऱ्या बळीसाठी प्रसिद्ध आहे. येथे देवीला मटणाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि भक्त तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करतात. शिब चंद्र बोस यांनी ‘द हिंदूस अॅज दे आर’ (१८८१) या पुस्तकात लिहिलं आहे की, “दररोज देवीसमोर बलिदान दिल्या जाणाऱ्या बोकडांचं मांस इतकं अधिक असायचं की, ते स्थानिकांव्यतिरिक्त इतर लोकांना फळे-भाज्या बाजारात विकतात तसं विकलं जायचं.” बोस यांनी हेही नमूद केलं की, वेगवेगळ्या काली मंदिरांमध्ये मांसविक्रीसाठी चढाओढही असायची.
निरामिष मांस
बंगाली लोक निरामिष मांस अर्थात कांदा-लसूण न वापरता तयार केलेलं मटण याचा स्वाद घेण्यासाठी ओळखले जातात. दुर्गा पूजेच्या काळात बहुतेक भद्रलोक (म्हणजे उच्चवर्गीय बंगाली मध्यमवर्गीय) हे निरामिष मटण खातात आणि कांदा-लसूण न खाणं हेच त्यांना धार्मिक शुद्धतेचं प्रतीक वाटतं. पर्यावरणीय भान देखील बंगालमध्ये अन्नसंस्कृतीशी जोडलेलं आहे. उदाहरणार्थ, बहुतेक बंगाली कुटुंबं सरस्वती पूजनानंतर हिलसा मासे खाणं थांबवतात. कारण हा काळ या माशांचा प्रजननाचा काळ असतो.
स्वामी विवेकानंद
दुसरं महत्त्वाचं म्हणजे, बंगालमधील अनेक आदरणीय आध्यात्मिक गुरू हे स्वतः मांसाहारी होते. भाजपाच्या दृष्टिकोनातून हिंदू जागृतीचा प्रमुख चेहरा मानला जाणारे स्वामी विवेकानंद आपल्या पाश्चिमात्य शिष्यांसाठी स्वतः मटणाची मसालेदार करी तयार करत असतं. ‘द मॉन्क अॅज मॅन’ या पुस्तकात विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना प्राणिज प्रथिनं खाण्याचा सल्ला दिल्याचा उल्लेख आहे. यामुळे शरीराला अधिक उर्जा आणि ताकद मिळते. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस स्वतः मांस खात होते का हे निश्चित नाही, पण ते कालीभक्त असल्यामुळे कधीही नैवेद्य नाकारत नसत, असे उल्लेख अनेक पुस्तकांत सापडतात.
यंग बंगाल
तिसरं महत्त्वाचं मुद्दा म्हणजे, १९ व्या शतकात बंगालमध्ये धार्मिक कट्टरतेविरोधातील जे राजकीय व बौद्धिक आंदोलन सुरू झालं, त्यामध्ये आहारसंस्कृतीचा मोठा भाग होता. यंग बंगाल या चळवळीतील तरुणांनी गोमांस खाणं ही एक क्रांतीकारी कृती म्हणून साजरी केली होती. हेन्री लुईस विवियन डेरोजिओ हे या चळवळीचं नेतृत्त्व करत होते. टीकाकारांनी यावर पाश्चिमात्य प्रभाव असल्याचा आरोप केलेला असला तरी हे खरं आहे की, या कृतींनी काही काळासाठी का होईना, पण भद्रलोक जातींच्या श्रेष्ठत्वाला आव्हान दिलं गेलं. १८३१ साली अँग्लो-इंडियन कवी हेन्री मेरीडिथ पार्कर यांनी यंग इंडिया: अ बंगाल इक्लॉग नावाचं एक काव्य लिहिलं ज्यात त्यांनी हरि मोहन बोस आणि साम चंद या दोन काल्पनिक पात्रांमधील द्वंद्व मांडले आहे. हरि मोहन हा गोमांस खाणारा, प्रगत विचारांचा बंगाली होता तर साम चंद हा पारंपरिक, गोमांस किंवा मद्याला स्पर्शही न करणारा हिंदू होता. हा संघर्ष बंगाली समाजात पारंपरिकता आणि प्रगतीवादी विचार यामधील तणावाचं प्रतीक ठरला.
अलीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती किंवा असा कोणीही जो बंगाली हिंदूंच्या मांसाहारी अध्यात्मावर प्रश्न विचारतो, त्याने बंगालच्या या गुंतागुंतीच्या इतिहासाची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. हिंदी पट्ट्यात रुजलेल्या राजकारणाच्या आधारावर बंगाली हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा ठरवता कामा नयेत, अशी भूमिका आता बंगालमध्ये मूळ धरते आहे.