What Is Plant Based Meat: मांस आणि सी फूडचे किरकोळ विक्रेते लिशियस या कंपनीने नवीन ‘UnCrave’ ब्रँड अंतर्गत “मॉक” चिकन- मटण उत्पादने लाँच केली आहेत. अलीकडेच एम एस धोनीने झाडांपासून बनवलेलं मांस विक्रेते स्टार्टअप ‘शाका हॅरी’ मध्ये गुंतवणूक केली होती. दुसरीकडे बॉलिवूडची फेव्हरेट जोडी रितेश व जेनेलिया देशमुख यांनीही सप्टेंबर 2021 मध्ये झाडांपासून बनवलेलं मांस तयार करणारे स्टार्टअप सुरु केले होते. २०२२ च्या फेब्रुवारीत ब्ल्यू ट्राइब या कंपनीने सुद्धा प्रोटीनच्या पर्यायी उत्पादनाच्या स्टार्टअपसाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री- निर्माती अनुष्का शर्मा यांना गुंतवणूकदार व ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडले होते. बॉलिवूड, क्रिकेट व एकूणच जगभरात प्रसिद्ध होणारी झाडांपासून बनवलेलं मांस संकल्पना नक्की काय आहे, चला तर जाणून घेऊयात..
झाडांपासून बनवलेलं मांस म्हणजे नेमकं काय?
मांस, सीफूड, अंडी ते अगदी दूध अशा सर्व उत्पादनांची वनस्पतीपासून निर्मिती करणे या हेतूने मागील काही काळात अनेक नवीन उत्पादने लाँच करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या सर्व पदार्थांची चव ही मूळ उत्पादनांसारखीच असल्याचा दावा केला जातो.
एम एस धोनीने गुंतवणूक केलेल्या शाका हॅरी या कंपनीची उत्पादने जसे की, मटण समोसे, चिकन नगेट्स, मोमोज, फ्राईज ते अगदी हॅम्बर्गर पॅटी सुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या हॅम्बर्गर पॅटीमध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी खोबरेल तेल वापरले जाते, आणि जेव्हा आपण ही पॅटी तळता किंवा शेकून घेता तेव्हा यातील बीटरूट मुळे रंगही बीफप्रमाणेच दिसतो. केवळ मांसच नव्हे तर वनस्पतीवर आधारित उत्पादनांमध्ये दूध, आईस्क्रीम, फ्रोझन डिझर्ट (उदा . फ्लेव्हर टाकलेले दही) यांचाही समावेश होतो.
वनस्पतीवर आधारीत मांस व दूध कसे बनवले जाते?
वनस्पतीत प्राण्यांच्या मांसाप्रमाणेच प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे व पाणी असते. यामुळेच थोड्या प्रक्रियेने दोघांची चव एकसारखी करता येणे शक्य असते. मात्र प्राण्यांप्रमाणे वनस्पतींमध्ये स्नायू नसतात परिणामी त्यांची प्रतिकृती तयार करणे थोडे कठीण असते. वनस्पती मांस तयार करणाऱ्या कंपनी या यंत्राच्या साहाय्याने प्राण्यांच्या मांसपेशींसारखेच स्वरूप तयार करतात. तुलनेने हे पदार्थ शिजवण्यास व पचण्यास सोपे असतात.
दुग्धजन्य पदार्थांसाठी, ओट्स, बदाम, सोयाबीन, नारळ आणि तांदूळ हे पर्याय वापरले जातात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार इतर उत्पादनांच्या तुलनेत ओट्सपासून बनणारे दूध हे मूळ दुधाच्या चवीप्रमाणेच असते. यात थोडा जाडसर मलईचा थरही मिळतो. ओट्समध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता अधिक असल्याने दुध बनवणे सोपे होते.
भारतात वनस्पती दूध व मांस स्वीकारले जाईल का?
मागील काही काळात वनस्पती-आधारित मांसाची विक्री करण्यात केलॉग, मॉर्निंगस्टार फार्म्स अशा कंपन्यांही पुढे आल्या आहेत. तर वनस्पतीवर आधारित दुधाच्या विक्रीतही ४ टक्के वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार भारतात एकवेळ वनस्पती आधारित मांस विक्री होऊ शकते पण सामन्यांकडून दुधाचे पर्याय स्वीकारले जाण्याची शक्यता याकामी आहे.
पाश्चिमात्य देशात वनस्पती आधारीत दुधाच्या मागणीचे मुख्य कारण हे लॅक्टोस इंटॉलरेन्स आहे. अशा व्यक्तींना दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांमुळे पचनाचा त्रास होतो. याउलट भारतात पचन किंवा अन्य समस्या फारशा गंभीर मानल्या जात नाहीत शिवाय पचनासाठीही दुधाचा उपाय करण्याची पद्धत आहे.
अमूल उत्पादने विकणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक, आर एस सोढी यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, वनस्पतीवर आधारीत दुध हे मूळ दुधाच्या तुलनेत पोषक ठरणार नाही असा भारतीयांचा समज आहे. तसेच चव व किमतीतही मोठा फरक पडू शकतो, परिणामी तूर्तास हे उत्पादन भारतात स्वीकारले जाण्याची शक्यता कमी आहे.
शाका हॅरीचे सह-संस्थापक संदीप देवगण सांगतात की भारतात शाकाहारी लोकसंख्या अधिक असूनही ही केवळ एकमेव बाजारपेठ नाही. उलट मांसप्रेमींना, वनस्पती आधारित उत्पादनांची सवय लावणे हा हेतू आहे. शाका हॅरीची उत्पादने सुपरमार्केटमध्ये शाकाहारी विभागात ठेवली जात नाहीत कारण कट्टर नॉनव्हेज खाणाऱ्यांनीही हा अनुभव घ्यावा असा कंपनीचा प्रयत्न आहे.
आपल्याला या उत्पादनांविषयी काय वाटते व असे पर्याय आपण स्वीकाराल का याबाबतचे मत कमेंट करून कळवा.