अगदी कोवळ्या वयात मुलांच्या हातात स्मार्ट फोन किंवा नवीन तंत्रज्ञान असणारे खेळ दिले जातात. मुलांच्या मनोरंजनासाठी आणि ज्ञानात भर पडावी या उद्देशाने या सोई मुलांना पुरविल्या जातात. परंतु, याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अलीकडेच ऑनलाइन लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांच्या पालकांची जाहीर माफी मेटाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मागितली. व्हर्च्युअल जगात मुलांसाठी काय धोकादायक असू शकते? टेक कंपन्यांची जबाबदारी काय? या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरक्षिततेच्या बाबींचा समावेश करण्यासाठी कंपन्यांवर दबाव वाढायला हवा का? मुलांना ऑनलाइन जगात सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारीच्या सुरुवातीस अमेरिकन काँग्रेसच्या सुनावणीदरम्यान ज्या मुलांचे ऑनलाइन लैंगिक शोषण झाले, त्या मुलांच्या पालकांची जाहीर माफी मेटाचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मागितली. या सुनावणीदरम्यान मेटासह एक्स, टिकटॉक, स्नॅपचॅट व डिस्कोर्ड हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही मुलांसाठी अयोग्य असल्याचे सांगण्यात आले.

मुलांच्या सुरक्षिततेच्या समस्या काय आहेत?

वापरकर्त्याची केवळ गोपनीयताच नाही, तर त्याच्या सुरक्षेच्या बाबतीतही टेक कंपन्यांना पालकांच्या निषेधाचा सामना करावा लागत आहे. टेक कंपन्यांनी जबाबदारी घेऊन किशोरवयीन आणि तरुण वापरकर्त्यांसाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म तयार करावा, अशी मागणी जगभरातील पालक आणि काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. ‘द मेटाव्हर्स, एक्स्टेंडेड रिॲलिटी अॅण्ड चिल्ड्रन’ या गेल्या वर्षीच्या युनिसेफच्या अहवालात व्हर्च्युअल वातावरण किशोरवयीन मुले आणि तरुणांवर कसा प्रभाव टाकू शकते याचे विश्लेषण करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये मुलांसाठी फायद्याचे ठरते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

व्हर्च्युअल वातावरणामुळे होणारे नुकसानही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये गुंडगिरी, लैंगिक छळ व गैरवर्तन यांसारख्या असुरक्षित गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वैयक्तिक डेटा संकलित करणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे यांसारख्या गोष्टींची परवानगी या प्लॅटफॉर्मना असते. त्यामुळे मुलांच्या गोपनीयता, सुरक्षितता आणि त्यांचे स्वातंत्र्य यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मेटाव्हर्सने नाकारले असले तरी या व्हर्च्युअल जगात मुलांसाठी धोकादायक ठरत असलेले अनेक खेळही आहेत; ज्यांचा थेट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. ‘तुलीर’ या बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि उपचार केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक सन्नुथी सुरेश स्पष्ट करतात, “अत्यंत लोकप्रिय खेळ ‘ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो’मध्ये प्रौढ मुले दाखविण्यात आली आहेत. त्यात मुलांना देह व्यापार करणार्‍या महिलांकडे जाणे, त्यांना अनेक वेळा मारणे यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. हा खेळ कुणीही खेळू शकतो, अगदी किशोरवयीन मुलेही. आपण यातून मुलांना काय संदेश देत आहोत?.” पुढे त्या म्हणाल्या, मुले अश्लील अत्याचाराची प्रतिमा तयार करण्यासाठी एआय तंत्रजज्ञानाचा वापर करीत असल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या.”

त्यात मानसिक आरोग्याचा पैलूही महत्त्वाचा आहे. एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांचा लैंगिक छळ करण्यात आला, तर त्याचा वास्तविक जगातील मुलांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. सहज ऑनलाइन शेअर केलेल्या छायाचित्रांचा गैरवापर केला जाऊ शकतो. ज्या व्यक्तींना लहान मुलांविषयी तीव्र लैंगिक आकर्षण आहे. अशी प्रौढ माणसे मुलांच्या छायाचित्रांच्या शोधात असू शकतात. अशा व्यक्तींच्या हाती त्यांची छायाचित्रे लागल्यास, ते त्यांचा गैरवापर करू शकतात. मुले ऑनलाइन शेअर करीत असलेल्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन आवश्यक आहे, असे सन्नुथी सुरेश सांगतात.

जनरेटिव्ह एआयची भूमिका?

‘दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने गेल्या वर्षी एका अहवालात स्पष्ट केले की, जनरेटिव्ह एआयमुळे निवडक गोष्टी केल्या जाऊ शकतात; जसे की गृहपाठात मदत, कठीण संकल्पनांचे सोपे स्पष्टीकरण आणि मुलाच्या शिकण्याच्या शैली व गतीशी जुळणारे शिक्षण इत्यादी. “मुले चित्र तयार करण्यासाठी, संगीत तयार करण्यासाठी, तसेच कथा लिहिण्यासाठी व सर्जनशीलता वाढविण्यासाठीही एआयचा वापर करू शकतात. अपंग मुलांसाठी ते अधिक फायद्याचे ठरते; ज्यामुळे मुले मजकूर, आवाज किंवा छायाचित्रांद्वारे अनेक गोष्टी तयार करू शकतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

“परंतु जनरेटिव्ह एआयचा वापर काही समाजविघातक घटकांकडूनही केला जाऊ शकतो,” असेही मत अहवालात नोंदविले गेले आहे. व्यक्तीने लिहिलेल्या मजकुराच्या आधारावर जनरेटिव्ह एआय तत्काळ मजकूर-आधारित डिसइन्फॉर्मेशन म्हणजेच चुकीची माहिती तयार करू शकते; जी अगदी व्यक्तीच्या लिखाण शैलीशी जुळणारी असते. एआयद्वारे तयार करण्यात आलेली छायाचित्रे कधी कधी वास्तविकतेपासून वेगळी असतात. मुलांना चूक किंवा बरोबर यातला फरक कळत नाही. कारण- मुलांची संज्ञानात्मक क्षमता अजूनही विकसित होत असते. अशा वेळी मुलांना असुरक्षित गोष्टींचा सामना त्यांना करावा लागू शकतो, असेही मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

मुलांना ऑनलाइन जगात सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता येईल?

हेही वाचा : नझूल जमिनीवरील अवैध बांधकामामुळे उत्तराखंडमध्ये हिंसाचार, पण ‘नझूल जमीन’ म्हणजे काय? वाचा सविस्तर…

या विषयात प्राथमिक जबाबदारी टेक कंपन्यांची आहे. त्यांना या प्लॅटफॉर्ममध्ये सुरक्षेचा प्रोग्राम समाविष्ट करावा लागेल, असे सन्नुथी सुरेश सांगतात. अमेरिकन काँग्रेसच्या सुनावणीच्या कार्यवाहीने हे स्पष्ट झाले आहे की, या कंपन्याना त्यांच्या ॲप्स आणि सिस्टीम्सचा मुलांवर किती नकारात्मक प्रभाव पडतो याची पूर्ण जाणीव आहे. युनिसेफच्या मार्गदर्शक यादीत बालकेंद्रित एआयसाठी नऊ आवश्यक गोष्टींचा समावेश आहे. त्यात मुलांच्या विकास आणि त्यांच्या कल्याणासाठी मुलांची माहिती आणि गोपनीयतेचे संरक्षण करणे समाविष्ट आहे. युनिसेफने शिफारस केली आहे की, टेक कंपन्यांनी मेटाव्हर्स आणि व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर असणार्‍या मुलांच्या माहितीवर अधिकाधिक संरक्षण मानके लागू करावीत. अशा तंत्रज्ञानामुळे मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करावी. त्यासह सर्वांत शेवटी सन्नुथी सुरेश यांनी सांगितले की, प्रत्येकानं स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी. मुलांचं संरक्षण करण्यासाठी वास्तविक जगात त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले सर्व नियम ऑनलाइन वापरातदेखील असावेत.