संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवघे २६ वयोमान असलेल्या रोमिना पोरमोख्तारी या स्वीडन देशाच्या क्लायमेट मिनिस्टर म्हणजेच हवामान खात्याच्या मंत्री झाल्या आहेत. त्या स्वीडनमधील वयाने सर्वात लहान असलेल्या केंद्रीय मंत्री आहेत. मात्र स्वीडन सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत असून हा निर्णय देशाचे नुकसान करणारा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र विरोधकांच्या टीकेनंतरही पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी रोमिना यांची हवामान खात्याच्या मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानिमित्त रोमिना पोरमोख्तारी आणि नव्या सरकारच्या पर्यावरणविरोधी धोरणांविषयी..

कोण आहेत रोमिना पोरमोख्तारी?

स्वीडनचे नवनियुक्त पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी नुकतीच मंत्रिमंडळाची ओळख करून दिली. विशेष म्हणजे या सरकारने पर्यावरण हे खाते रद्द करून त्याचे रूपांतर हवामान खात्यात केले आणि या खात्याचा कार्यभार २६ वर्षांच्या रोमिना पोरमोख्तारी यांच्याकडे सोपवला. सर्वात तरुण मंत्री असलेल्या रोमिना या आतापर्यंत लिबरल पक्षाच्या युवा शाखेच्या प्रमुख होत्या. स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्या लिबरल पक्षाच्या नेत्या असल्या तरी त्या यापूर्वी पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्या टीकाकार म्हणून ओळखल्या जात. कडव्या विचारसरणीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वीडन डेमोक्रॅटसशी पंतप्रधानांच्या मॉडरेट पक्षाने युती केल्यानंतर रोमिना आणि त्यांच्या पक्षाने क्रिस्टरसन यांच्यावर टीका केली होती. मात्र मॉडरेट पक्ष आणि स्वीडन डेमोक्रॅटस या पक्षांची युती झाल्यानंतर लिबरल पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि रोमिना यांच्या गळय़ात मंत्रीपदाची माळ पडली.

रोमिना यांच्यावर विरोधकांची टीका का?

लिबरल पक्षाच्या नेत्या असलेल्या रोमिना पोरमोख्तारी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात पर्यावरणाशी संबंधित कोणतेही काम केलेले नाही किंवा पर्यावरणीय चळवळीशीही त्यांचा काहीही संबंध नाही. एके काळी त्यांनी उजव्या विचारसरणीच्या उल्फ क्रिस्टरसर आणि कडव्या विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वीडन डेमोक्रॅटवर टीकेचा भडिमार केला होता. स्वीडन प्रतिनिधीगृहाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डाव्या मध्यममार्गी असलेल्या सोशल डेमोक्रॅट पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. त्या वेळी स्वीडन डेमोक्रॅट्स आणि मॉडरेट या पक्षांनी युती करून सरकार स्थापन केले आणि याच पक्षांचे टीकाकार असलेल्या उदारमतवादी आणि मध्यममार्गी लिबरल पक्षाने त्यांना पाठिंबा दिला. मॉडरेट व स्वीडन डेमोक्रॅट्स हे दोन्ही पक्ष पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या औद्योगिक धोरणांना चालना देणारे पक्ष म्हणून ओळखले जातात. सत्तेवर येताच नव्या सरकारने पर्यावरण मंत्रालय रद्द करून हवामान या नव्या खात्याची निर्मिती केली. त्याला पर्यावरणवाद्यांसह सोशल डेमोक्रॅट पक्षाचा विरोध आहे. विशेष म्हणजे रोमिना यांच्या लिबरल पक्षानेही याला पाठिंबा दिल्याने रोमिना यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे.

नव्या सरकारचे औद्योगिक धोरण काय?

सर्वात मोठे नॉर्डिक राष्ट्र असलेला स्वीडन हवामानाबाबत एक जागृत देश म्हणून ओळखला जातो. १९८७ पासून त्यांचे पर्यावरणविषयक समस्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. मात्र हवामान धोरणांचे प्रभारी नवीन मंत्री आता ऊर्जा आणि उपक्रम मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतील, असा निर्णय क्रिस्टरसन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर तात्काळ घेतला. त्यामुळे हवामान खात्याच्या नव्या मंत्री रोमिना यांना ऊर्जा व उपक्रममंत्री एब्बा बुश यांच्या अंतर्गत काम करावे लागणार असल्याने पर्यावरणासंबंधीच्या स्वतंत्र निर्णयांवर गदा आली आहे. हवामान बदल कामगिरी निर्देशांकानुसार गेल्या नोव्हेंबरमध्ये ६० देशांतील हवामान धोरणांच्या क्रमवारीत स्वीडन डेन्मार्कनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांच्या पर्यावरणविषयक उद्दिष्टांमुळे देशाच्या उत्तरेकडील भागात हिरवी औद्योगिक क्रांती झाली. मात्र क्रिस्टरसन यांच्या मॉडरेट्स पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी अणुऊर्जा उत्पादन आणि चार्जिग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्ताराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी होणार आहे. नवे सरकार स्थापन करण्यापूर्वी चार पक्षांच्या युतीने ते इंधनाच्या किमती कमी करतील, असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच ते अणुऊर्जेकडे वळणार असून देशात नव्या अणुभट्टय़ा बांधण्यास या सरकारने चालना दिली आहे.

अणुऊर्जेसंबंधी नव्या सरकारचे धोरण काय?

पर्यावरणस्नेही असलेल्या स्वीडनने यापूर्वी अणुऊर्जेवर जोरदार वादविवाद केला आहे. मात्र आता हाच पर्यावरणवाद देश अणुऊर्जेकडे वळत आहे. यास पर्यावरणवाद्यांचा जोरदार विरोध असला तरी स्वीडिश सरकार अणुऊर्जेच्या धोरणापासून माघार घेणार नाही असे चित्र आहे. स्वीडन आता युरोपमधील इतर देशांमध्ये सामील झाला आहे, जे विक्रमी ऊर्जेच्या किमती आणि मुख्य पायाभूत सुविधांच्या सुरक्षेच्या भीतीमुळे अणुऊर्जेकडे वळत आहेत. सध्या या नॉर्डिक राष्ट्रात सहा अणुभट्टय़ा असून त्या मुख्यत: व्हॅटनफॉलद्वारे चालवल्या जातात. त्यामुळे नवे सरकार लवकरच युटिलिट व्हॅटनफॉल एबीला नवीन अणुऊर्जा केंद्रांचे नियोजन आणि खरेदी करण्यास सांगेल. त्यानुसार स्वीडनमध्ये नव्या अणुभट्टय़ा बांधल्या जाणार आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishleshan environmentalist or anti policy romina pormokhtari climate minister print exp 1022 ysh
Show comments