संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चंद्रयान-३’ आता महत्त्वाच्या टप्प्यात असून आज, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण होणार आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) त्यासाठी सज्ज झाली आहे. विक्रम लँडर चंद्रावर कसे उतरणार आहे, त्यानंतर नेमके काय केले जाणार यासंबंधी..

‘विक्रम’ लँडरचे कसे अवतरण होणार?

भारताची ‘चंद्रयान-३’ मोहीम वेळापत्रकानुसार सुरू असून आज, २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. विक्रम लँडरचे अवतरण होण्यास काही तास उरले असतानाच लँडरची उंची आणि वेग कमी करण्यात आला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या सर्वात खालच्या कक्षेत पोहोचला आहे. सध्या त्याचे चंद्रापासून किमान अंतर फक्त २५ किलोमीटर आणि कमाल अंतर १३४ किलोमीटर आहे. ‘चंद्रयान-३’ सध्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदयाची प्रतीक्षा करत आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा एक चांद्रदिवस पृथ्वीवरील १४ दिवस इतका आहे. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ५.४५ वाजता सूर्योदय होईल. त्यानंतर लँडरच्या अलगद अवतरणाची प्रक्रिया सुरू होईल. वातावरणासंबंधी काही अडचणी आल्यास अलगद अवतरणाची प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात येईल. मात्र याचा निर्णय २३ ऑगस्टलाच दुपारी घेण्यात येईल.

लँडर अवतरणात कोणती आव्हाने आहेत?

पृथ्वी आणि चंद्र यांच्यात वातावरण आणि वेळ यांच्यात फरक आहे. हे लक्षात घेऊनच ‘चंद्रयान-३’ मोहीम आखण्यात आली आहे. मात्र तरीही विक्रम लँडरचे अवतरण करताना इस्रोसमोर आव्हाने आहेत. चंद्राचा पृष्ठभाग असमान असून दगड, माती आणि खड्डे यांनी युक्त आहे. अशा पृष्ठभागावर अवतरण करणे धोकादाय ठरू शकते. विक्रम लँडरचे पाय अतिशय मजबूत असून विक्रमला मोठय़ा खड्डय़ात उतरावे लागले तरी कोणतीही अडचण येणार नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमच्या अवतरणातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे या अंतराळ यानाला आडव्या स्थानावरून उभ्या स्थितीत आणणे. त्यानंतर यानाचा वेग कमी करावा लागणार आहे. २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ३० किलोमीटर उंचीवरून उतरण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळी त्याचा वेग प्रति सेकंद १.६८ किलोमीटर असा असेल. हा वेग कमी करण्यावरच लक्ष देणे गरजेचे असणार आहे, कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्तीही त्याची भूमिका बजावेल. वेगावर नियंत्रण न ठेवल्यास लँडर कोसळण्याची शक्यता आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव अनपेक्षित व अज्ञात आहे. बारामाही गडद असलेल्या या भागात प्रथमच अंतराळ यानाचे अवतरण होत आहे. त्यामुळे इस्रोसाठी लँडर अवतरण आव्हानात्मक ठरणार आहे.

रशियाचे ‘लुना-२५’ अपयशी का?

रशियाचे ‘लुना २५’ अंतराळ यान लँडिंगच्या आधीच चंद्रावर आदळल्याचे ‘रॉसकॉसकॉस’ या रशियन अवकाश संशोधन संस्थेने जाहीर केले. भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या आधी म्हणजे २१ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरविण्याचा रशियाचा प्रयत्न होता. मात्र अनियंत्रित होऊन हे यान चंद्रावर कोसळल्याने ४७ वर्षांनंतरचे रशियाचे स्वप्न भंगले. भारताचे ‘चंद्रयान-३’ यान पृथ्वी व चंद्राभोवती कक्षीय फेऱ्या मारून चंद्रावर अवतरण करणार आहे. मात्र रशियाने चंद्राकडे जाण्याचा थेट मार्ग स्वीकारला. ११ दिवसांत रशियन यान चंद्रावर अवतरण करणार होते. मात्र ‘लुना-२५’ अवतरणपूर्व कक्षेत असताना तांत्रिक समस्या उद्भवली होती. हे यान नियोजित कक्षेत न जात वेगळय़ा अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. चंद्रावर २३ ऑगस्ट रोजी सूर्यादय होणार अं७सून सध्या तिथे रात्र आहे. मात्र सूर्योदयाची वाट न पाहताच चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरविण्याचा निर्णय रशियन अंतराळ संस्थेने घेतला. रशियाच्या या यानाचे वजन हलके होते. त्यामानाने ‘चंद्रयान-३’चे वजन अधिक आहे.

‘चंद्रयान-२’ आणि ‘चंद्रयान-३’ यांतील फरक काय?

२०१९ मध्ये इस्रोची चंद्रयान-२ ही मोहीम अयशस्वी झाली होती. नेव्हिगेशन सॉफ्टवेअरमधील अल्गोरिदम त्रुटींमुळे ‘चंद्रयान-२’ हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात अयशस्वी ठरले. मात्र इस्रोने यंदा या प्रक्रियेमध्ये बदल केले. ‘चंद्रयान-२’मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर हे तीन घटक होते, तर ‘चंद्रयान-३’मध्ये ऑर्बिटरच्या जागी प्रोपल्शन मॉडय़ूलचा समावेश करण्यात आला. विक्रम लँडरचे पाय मजबूत असल्याने ते लँडिंगवर जास्त वेग सहन करू शकते. ‘चंद्रयान-२’मधील कॅमेऱ्यापेक्षा ‘चंद्रयान-३’मधील कॅमेरे अधिक सुसज्ज व मजबूत आहेत. अवतरण करताना लँडरचा वेग प्रति सेकंद १.६८ किलोमीटर असा असेल. या वेगाने लँडर कोसळणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishleshan india ambitious expedition final phase chandrayaan 3 what exactly will happen print exp 0823 ysh
Show comments