चिन्मय पाटणकर
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यसाठी (जेईई मेन्स) यंदा काही बदल केले आहेत. त्यात परीक्षा शुल्कवाढ, केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी किमान ७५ टक्के गुण अनिवार्य असल्याची अट पुन्हा समाविष्ट करणे आदींचा समावेश आहे. प्रवेशासाठी किमान ७५ टक्के गुण अनिवार्य करण्याच्या निर्णयाला देशभरातील विद्यार्थ्यांकडून विरोध सुरू झाला आहे. तसेच बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारीत होणार असल्याने जानेवारीत होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी समाजमाध्यमांतून मोहीम राबवण्यात येत आहे.
जेईई मुख्य परीक्षा कधी होणार आहे?
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) घेण्यात येते. त्यानुसार एनटीएकडून जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले त्यानुसार जेईई मुख्यच्या पहिल्या सत्राची परीक्षा २४, २५, २७, २८, २९ आणि ३० जानेवारी या कालावधीत, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा ६, ८, १०, ११ आणि १२ एप्रिल रोजी होणार आहे. जानेवारीत होणाऱ्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रियाही एनटीएकडून सुरू करण्यात आली. त्यासाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत १२ जानेवारी आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. करोनाकाळात जेईई मुख्य परीक्षेचे वेळापत्रक बिघडले होते, मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.
एनटीएने २०२३च्या जेईई मुख्य परीक्षेसाठी केलेले बदल कोणते?
एनटीएने जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला. त्यात बारावीला किमान ७५ टक्के गुण अनिवार्य असल्याची अट पुन्हा समाविष्ट केली. तसेच परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. खुल्या गटाचे शुल्क ६५० रुपयांवरून एक हजार रुपये, मुलींसाठीचे शुल्क ३२५ रुपयांवरून ८०० रुपये, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग विद्यार्थी, तृतीयपंथी विद्यार्थी यांचे शुल्कही ३२५ रुपयांवरून ८०० रुपये करण्यात आले. त्याशिवाय एका विद्यार्थ्यांला एकच अर्ज करता येणार आहे. जानेवारीच्या सत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल सत्रासाठी पुन्हा अर्ज करता येईल. तर नोंदणी अर्जात पालकांचा संपर्क क्रमांक आणि निवासाचा पत्ता नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पूर्वी हा तपशील भरणे बंधनकारक नव्हते.
विद्यार्थ्यांचा विरोध कशासाठी?
जेईई मुख्य परीक्षा दिल्यानंतर अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनआयटी, आयआयआयटी, केंद्र सरकारचे अनुदान मिळणाऱ्या संस्थांतील प्रवेशासाठी बारावीला किमान ७५ टक्के गुण, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना किमान ६५ टक्के गुण, विद्यार्थी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २०२० मध्ये बारावीला किमान ७५ टक्के गुण अनिवार्य असल्याची अट स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर २०२१ आणि २०२२ मध्येही ही अट स्थगित ठेवण्यात आली होती. आता किमान ७५ टक्के अनिवार्यतेची अट पुन्हा लागू करण्यात येणार असल्याचे जेईई मुख्यच्या माहितीपत्रकातून जाहीर झाल्यावर देशभरातील विद्यार्थ्यांचा या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. समाजमाध्यमांतून विद्यार्थी या निर्णयाविरोधात आवाज उठवत असल्याचे चित्र आहे. या वर्षीही ही अट शिथिल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्याशिवाय बऱ्याच राज्यांमध्ये जानेवारीमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार असल्याने जानेवारीत होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचीही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
बारावीला ७५ टक्के अनिवार्य असल्याची अट या पूर्वी होती का?
करोनापूर्व काळात एनआयटी, आयआयआयटी, केंद्र सरकारकडून निधी दिल्या जाणाऱ्या संस्थांतील प्रवेशांसाठी बारावीला किमान ७५ टक्के अनिवार्यतेची अट लागू होती. करोनाकाळात सवलत म्हणून ही अट केंद्र सरकारने शिथिल केली होती. आता करोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने प्रवेशासाठी किमान ७५ टक्के अनिवार्यतेची अट एनटीएकडून पुन्हा समाविष्ट करण्यात आली. या निर्णयानंतर आता आयआयटी प्रवेशांसाठी होणाऱ्या जेईई अॅडव्हान्सचे पात्रता निकष करोनापूर्व काळातील परीक्षेप्रमाणे होण्याची दाट शक्यता आहे.
प्रवेशासाठी किमान ७५ टक्के अनिवार्यतेला विद्यार्थ्यांचा विरोध का?
गेल्या वर्षी जेईई मुख्य परीक्षा देऊन प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या वर्षी पुन्हा जेईई मुख्य परीक्षा देतील. गेल्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनिवार्यतेची अट लागू नव्हती. मात्र या वर्षी ही अट लागू करण्यात आल्याने त्यांना ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास ते प्रवेशासाठी पात्र ठरू शकणार नाहीत. ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेले आणि गेल्या वर्षी प्रवेश न मिळाल्याने अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश न घेता केवळ जेईई मुख्य परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी असू शकतात. मात्र आता किमान ७५ टक्क्यांची अट लागू झाल्याने ते प्रवेशासाठी पात्र ठरू शकणार नाहीत. त्याशिवाय जेईई मुख्य परीक्षेचे वेळापत्रक आणि पात्रता निकष जाहीर करण्यास एनटीएला यंदा उशीर झाला. ७५ टक्के अनिवार्यतेची अट पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय लागू करण्याच्या अनुषंगाने एनटीएकडून याबाबत आधीच माहिती देण्याची आवश्यकता होती. पूर्वसूचना न देता अचानकपणे तीन वर्षांनी नियम बदलल्याने एनटीएच्या निर्णयाला विद्यार्थी विरोध करत असून, याबाबत एनटीएला फेरविचार करावा लागू शकतो किंवा स्पष्टीकरण द्यावे लागू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.