पावलस मुगुटमल
भारतात नैर्ऋत्य दिशेने समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत हक्काचा पाऊस पडतो. या पावसाला नैर्ऋत्य मोसमी पाऊस संबोधले जाते. हे मोसमी वारे देशभर ज्या मार्गाने पसरतात, त्याच मार्गाने ते देशातून निघून जातात. यंदा २३ ऑक्टोबररला मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून माघारी गेल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. राजस्थानातून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आणि महाराष्ट्र ओलांडताच त्यांचा देशातील प्रवास संपला. म्हणजेच समुद्रातून भूभागाकडे येणारा बाष्पाचा पुरवठा पूर्णपणे थांबला.
पाऊस परत गेला हे कशावरून ठरते?
नैर्ऋत्य दिशेने येणारे वारे पाऊस घेऊन देशभर पसरतात आणि परत फिरतात. दरवर्षी त्यांचे हे नियोजन ठरलेले असते. त्यात आजवर खंड पडलेला नाही. केवळ अलीकडच्या काही वर्षांमध्ये मोसमी पावसाच्या परतण्याच्या तारखा पुढे गेल्या आहेत. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत तो अनेकदा दीर्घकाळाची विश्रांती घेतो. अशा काळात पाऊस होत नसला, तरी मोसमी वाऱ्यांचे अस्तित्व असते. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची विश्रांती मोसमातील खंड म्हणून ओळखली जाते. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर ऑक्टोबररच्या पहिल्या आठवडय़ापासून त्याने मोठा खंड घेतल्यास ती परतीची चिन्हे ठरतात. राजस्थानच्या पश्चिम-उत्तर भागातून ही प्रक्रिया सुरू होते. पाऊस आणि बाष्प पूर्णपणे थांबून हवामान कोरडे झाल्यास आणि हीच स्थिती सलग चार दिवस कायम राहिल्यास संबंधित भागातून मोसमी पाऊस माघारी गेल्याचे जाहीर केले जाते.
परतीचा पाऊस वेगळा असतो का?
मोसमी पाऊस सुरू होण्याच्या आधीचा आणि मोसमी पाऊस परतल्यानंतर बरसणारा पाऊस ढोबळपणे अवकाळी गटात मोडतो. हंगामातील मोसमी पावसाचे बरसणे बहुतांश वेळेला शांत असते. हा पाऊस संततधार रूप धारण करतो, पण ढगांचा गडगडाट कमी असतो. मात्र, परतीच्या पावसाला अवकाळी किंवा पूर्वमोसमी पावसाच्या स्वभावाचा काही प्रमाणात स्पर्श असतो. मोसमी वारे परतत असताना अनेकदा स्थानिक स्थितीमुळे मोठय़ा प्रमाणावर बाष्पाची निर्मिती होते. त्यामुळे आकाशात मोठमोठे आणि अधिक उंची असलेले ढग तयार होतात. त्यांचा गडगडाटही मोठा असतो आणि त्यातून विजाही मोठय़ा प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे काही भागांत अतिवृष्टीचीही शक्यता असते. यंदाही राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत ही स्थिती दिसून आली. कमी वेळेत अधिक पाऊस हेही सध्याच्या काळातील परतीच्या पावसाचे वैशिष्टय़ सांगता येईल.
पावसाच्या माघारीला विलंब का झाला?
गेल्या काही वर्षांत मोसमी पावसाचा कालावधी वाढत आहे. जून ते सप्टेंबरनंतर ऑक्टोबररच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत पाऊस सुरू असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राने यंदाही ही स्थिती अनुभवली. अगदी दिवाळीच्या तोंडावर काही भागांत पावसाची हजेरी होती. देशात यंदा २९ मे रोजी केरळमार्गे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी प्रवेश केला होता. १० जूनला तळकोकणमार्गे महाराष्ट्र येऊन १५ जूनपर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर मोसमी वारे २ जुलैला देशव्यापी झाले होते. २० सप्टेंबरला राजस्थानच्या काही भागांतून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, स्थानिक स्थितीमुळे झालेल्या पावसामुळे प्रवास रखडत गेला. ऑक्टोबररात सातत्याने निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे उत्तरेकडील राज्यांत जोरदार पाऊस झाला. त्यातून उत्तर भारतातील पावसाचा परतीचा प्रवास लांबला. १४ ऑक्टोबररपासून महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला निघालेला पाऊस अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा सुरू झाल्याने थांबला. राज्यात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे महाराष्ट्रातून मोसमी पाऊस संपूर्ण माघारी जाण्यास २३ ऑक्टोबरर उजाडला. यंदा देशातील मोसमी वाऱ्यांचा प्रवास एकूण १४८ दिवसांचा ठरला. मोसमी वारे यंदा नियोजित काळापेक्षा आठ दिवस उशिरा, पण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत देशातून लवकर माघारी गेले. २०२१ मध्ये २५ ऑक्टोबरर, तर २०२० मध्ये २८ ऑक्टोबररला मोसमी वारे देशातून माघारी गेले होते.
माघारी जाताना पाऊस विक्रमी बरसला?
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या हंगामात राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत २४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती. ऑक्टोबररमध्ये मात्र परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात राज्यातच नव्हे, तर देशाच्या विविध भागांत धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा १०२ टक्के अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक १३३ टक्के अधिक पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पावसाची नोंद यंदा नगर जिल्ह्यात १९७ टक्के अधिक, तर मुंबई उपनगरांमध्ये १९४ टक्के अधिक झाली. ठाणे, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, नंदुरबार, सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा, बुलढाण्यात दुपटीहून अधिक पाऊस झाला. उत्तर भारतातही परतीच्या पावसाने कहर केला. देशातील सर्वाधिक पाऊस राजधानी दिल्लीत सरासरीपेक्षा ४६९ टक्के अधिक झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आदी राज्यांतही सरासरीपेक्षा ३०० ते ४०० टक्क्यांनी अधिक पावसाची नोंद झाली. राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागांतही सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला.
मोसमी पाऊस परतला, पुढे काय?
हवामान विभागाने शास्त्रीय पद्धतींच्या आधारावर यंदाचा मोसमी पाऊस देशातून माघारी गेल्याचे जाहीर केले. हवामानात झपाटय़ाने बदल झाल्याने सर्वसामान्यांनाही त्याची खात्री पटली. महाराष्ट्रातून पाऊस माघारी जाताच दुसऱ्याच दिवशी सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात ४ ते ६ अंशांनी घट झाली. त्यामुळे दिवाळीत आवश्यक ती थंडी पडली. वातावरणातील बाष्प नाहीसे झाल्याने आणि रात्रीही आकाश निरभ्र राहत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानातील ही घट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. मात्र, दिवसा निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटकाही काही प्रमाणात वाढणार आहे.