भक्ती बिसुरे

हृदयविकारावरील उपचारांत केला जाणारा स्टेंटचा वापर ही वैद्यकीय क्षेत्रातील संजीवनी आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र स्टेंटच्या किमती हा नेहमीच सर्वसामान्य रुग्णांच्या दृष्टीने धडकी भरवणारा घटक ठरतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अत्यावश्यक औषधांच्या यादीत कॉरोनरी स्टेंटचा समावेश आहे. त्यामुळे अत्यावश्यक आणि जीवरक्षक उपचारांचा हा पर्याय सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.

अत्यावश्यक औषधांची यादी कशासाठी?

तब्बल सहा वर्षांनंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून नुकतीच अत्यावश्यक औषधांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. परिणामकारकता, सुरक्षितता, गुणवत्ता आणि उपचारांच्या एकूण खर्चावर आधारित आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करणाऱ्या औषधांचा समावेश या अत्यावश्यक औषधांच्या यादीत केला जातो. किंमत, सुरक्षितता आणि परिणामकारकता या तीन महत्त्वाच्या निकषांचा विचार करून औषधांच्या तर्कशुद्ध वापराला प्रोत्साहन देणे, हा अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीचा प्राथमिक उद्देश आहे. अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी हा देशाच्या सार्वजनिक आरोग्य योजनेचा एक दस्तावेज असून सार्वजनिक आरोग्याचा बदलता प्राधान्यक्रम, त्याप्रमाणे असलेली गरज यांबाबत विचार करून ही यादी अद्ययावत केली जाते. १९९६ मध्ये पहिल्यांदा भारतात अशी यादी तयार करण्यात आली. २००३, २०११ आणि २०१५ मध्ये ही यादी अद्ययावत करण्यात आली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने आरोग्य सेवेपुढील सद्य:स्थितीतील आव्हाने आणि प्राधान्यक्रम यांच्या आधारे नुकतीच ही यादी अद्ययावत केली. त्यात कॉरोनरी स्टेंटचा समावेश करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून त्यामुळे आता ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथोरिटी’कडून त्याच्या किंमतनिश्चितीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. १३ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समाविष्ट ३४ नवीन घटकांमध्ये अनेक कर्करोगविरोधी औषधे, प्रतिजैविके आणि प्रतिबंधात्मक लशींचा समावेश आहे. त्यामुळे भारतातील अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत आता ३८४ औषधे, उपकरणे समाविष्ट झाली आहेत.

स्टेंटची शिफारस का?

भारतातील हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढू लागली आहे. विशेषत: कोविडच्या महासाथीनंतर हृदयविकाराचे वयही बरेच अलीकडे येत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना होणारा विकार म्हणून ओळखला जाणारा हृदयविकार आता तरुणांनाही होऊ लागला आहे. तिशी आणि चाळिशीतही हृदयविकार हा सर्वसाधारण आजार ठरू पाहात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील मृत्यूच्या कारणांमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार हे एक प्रमुख कारण असल्याचा इशाराही वेळोवेळी दिला आहे. या पार्श्वभूमीवर स्टेंट आणि त्याच्या किमती आवाक्यात असण्याची गरज अधोरेखित होते.

समावेशाची प्रक्रिया काय?

औषधांवरील स्थायी राष्ट्रीय समितीने राष्ट्रीय अत्यावश्यक औषध यादीमध्ये कॉरोनरी स्टेंटचा समावेश करण्यासाठी दोन प्रकारे शिफारस केली होती. त्यातील पहिला प्रकार ‘बेअर मेटल स्टेंट’ हा तर दुसरा प्रकार ‘ड्रग इल्युटिंग स्टेंट’ हा होता. दुसऱ्या प्रकारच्या स्टेंटमध्ये धातूजन्य पदार्थापासून बनवलेला मेटॅलिक ड्रग एल्युटिंग स्टेंट आणि नैसर्गिक घटकांपासून बनवण्यात आलेला ‘बायोरिसॉर्बेबल व्हॅस्क्युलर स्कॅफोल्ड’ असे दोन प्रकार समाविष्ट आहेत. स्टेंटची गरज, त्याची उपलब्धता आणि किमती यांबाबत सर्वंकष आढावा घेऊन त्याचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत करण्याचा निर्णय औषधांवरील स्थायी राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष डॉ. वाय. के. गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. हा समावेश करून घेताना हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार हे सार्वजनिक आरोग्य सेवेसमोरील एक मोठे आव्हान असून त्याचा संबंध थेट हृदय निकामी होऊन व्यक्तीचा मृत्यू होण्याशी किंवा कायमचे अंथरुणाला खिळण्याशी आहे, हे अधोरेखित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्टेंट हे नेहमी अत्यावश्यक औषध उपकरणांच्या यादीत राहावेत या विचारांतून हा निर्णय घेत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

स्टेंट हे औषध की उपकरण?

स्टेंटचे स्वरूप आणि त्यांची उपयुक्तता पाहाता त्याला औषध (ड्रग) म्हणायचे की उपकरण (डिव्हाइस) हा प्रश्न पडणे आणि त्यावरून चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र कॉरोनरी स्टेंटचे सर्व निकष विचारात घेतल्यानंतर तज्ज्ञ समितीने ते एक अत्यावश्यक वैद्यकीय उपकरण असल्याची शिफारस केली. त्यातून ‘ड्रग्स अ‍ॅण्ड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्ट १९४०’ अंतर्गत त्याला ड्रग म्हणून सूचित करण्यात आले. ‘बेअर मेटल स्टेंट’ आणि ‘ड्रग इल्युटिंग स्टेंट’ या प्रकारांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो. येत्या काळात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि इतर संबंधित संस्था या रुग्णालये आणि संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉरोनरी स्टेंटचे सुलभ विपणन होण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader