भक्ती बिसुरे
साधा फ्लूचा ताप आला की एरवी ठणठणीत प्रकृती असलेले कित्येक रुग्ण लगेच गळून गेलेले दिसतात. फ्लू हा ताप साधा ताप असला तरी रुग्णांना तो सहसा प्रचंड थकवा आणतो. मात्र, हा संसर्गाचा परिणाम नसून मेंदूची एक प्रकारे प्रतिक्षिप्त क्रिया आहे, असे सांगणारे संशोधन नुकतेच समोर आले आहे. ‘सायन्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने याबाबतचा एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध केला आहे. हे संशोधन नेमके काय आहे, त्याबाबत हे समजून घेऊ या.
थकवा तापाचा की मेंदूचा?
फ्लूचा ताप आला की बहुतेक रुग्णांना थकवा येतो. त्यांची भूक मंदावते. आळस वाढतो आणि काहीही करू नये असे वाटते. ‘सायन्स’ नियतकालिकातील संशोधनानुसार हा थकवा त्या तापामुळे येत नाही तर ताप येणार असे शरीराला जाणवताच घशाच्या मागील बाजूला असलेल्या मज्जातंतू पेशींचा एक समूह त्याची माहिती मेंदूला देतो. त्यानंतर त्या संसर्गाला प्रतिसाद देणारी आपल्या शरीरामधली यंत्रणा कार्यान्वित होते. इन्फ्लुएन्झा असलेल्या उंदरांवरील संशोधनातून हे स्पष्ट झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. विषाणू संक्रमण झालेल्या उतींच्या रासायनिक क्रियेमुळे थकवा आणि इतर लक्षणे जाणवतात, हे शास्त्रज्ञही जाणतात. प्रोस्टॅग्लॅंडिन्ससारखी रसायने हा परिणाम करतात आणि आयबुप्रुफेनसारखी औषधे प्रोस्टॅग्लॅंडिनचे उत्पादन रोखण्याचे काम करतात, असे हार्वर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिटय़ूटतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
संशोधन काय सांगते?
इन्फ्लुएन्झा हा शरीरातील वायूमार्गावर म्हणजेच श्वसनयंत्रणेवर परिणाम करतो. यापूर्वीच्या संशोधनात विषाणूजन्य संसर्गाच्या प्रतिसादाचा भाग म्हणून प्रोस्टॅग्लॅंडिन मेंदूतील पेशींशी संवाद साधण्यासाठी रक्ताद्वारे प्रवास करू शकतात असे दिसून आले होते. उंदरांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेत जनुकीय बदल करून त्यानंतर त्यांना विषाणूजन्य आजाराचा संसर्ग केला असता या बदलांनंतरही फ्लू झालेल्या उंदरांच्या हालचाली कमी झाल्याचे दिसून आले. याचाच अर्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेव्यतिरिक्तही काही यंत्रणा फ्लूबाबतची माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवत असणार या निष्कर्षांप्रत संशोधक आले. त्या वेळी घशाच्या मागच्या बाजूला असलेला पेशीसमूह हे काम करत असल्याचे त्यांना स्पष्ट झाले.
संशोधकांचे मत काय?
या संशोधनाबाबत जगातील अनेक संशोधक आणि नियतकालिकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. श्वसनरोगांचा संसर्ग आणि त्यांचे निदान याकडे नव्याने पाहण्याबाबत हे संशोधन दिशा देणारे आहे. प्रोस्टॅग्लॅंडिन्स नाजूक असतात आणि कदाचित ते रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे न्यूरॉन्समार्फत त्याबाबत मेंदूला माहिती मिळेल हीच गोष्ट अधिक विश्वासार्ह असल्याचे संशोधक मानतात. संसर्ग कुठे आहे याबाबत अधिक अचूक माहितीही हे न्यूरॉन्स देत असावेत अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रोस्टॅग्लॅंडिनसारख्या अत्यंत सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणे हे प्रचंड आव्हानात्मक असून त्यासाठी अत्यंत अद्ययावत तंत्राचा वापर केल्याबद्दल संशोधकांचे कौतुकही करण्यात आले आहे.
संशोधनाचे महत्त्व काय?
इन्फ्लुएन्झाबाबत करण्यात आलेले हे संशोधन हे एका अर्थाने दिशादर्शक संशोधन ठरेल अशी शक्यता संशोधक वर्तवतात. संसर्गाच्या पुढच्या टप्प्यात आजारपणावरील प्रतिक्रिया असलेले वर्तन कमी करण्यासाठी वायू मार्गावर परिणाम करण्याचा प्रभाव कमी होतो. त्याचा परिणाम म्हणून फुप्फुसामधील संसर्ग वाढल्यानंतर उंदरांमध्ये वेगळे परिणाम दिसतात. संसर्ग शोधणारे न्यूरॉन्स अक्षम केल्यामुळे उंदरांच्या जगण्याची शक्यता वाढते. आजारपणाचे वर्तन उंदरांना फ्लूविरोधी सुरक्षितता देत असले तरी इतर आजारांमध्ये असे प्रतिक्रियात्मक वर्तन त्यांच्या पथ्यावर पडते, असेही दिसून आले आहे. उदाहरणार्थ, बॅक्टेरियल सेप्सिससारख्या एखाद्या आजारामध्ये उंदरांनी जास्त अन्न खाल्ले असता ते जिवंत राहण्याची शक्यता कमी असते, कारण जिवाणू इंधनासाठी प्राण्यांच्या रक्तातील शर्करा वापरतात. अशा परिस्थितीत भूक न लागणे आणि पर्यायाने काही न खाणे हे सकारात्मकच ठरते, असे शास्त्रज्ञ सांगतात. त्यामुळेच विषाणूच्या शिरकावाची माहिती मिळताच मेंदूकडून मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून घडणारे बदल, उदाहरणार्थ, उंदरांमध्ये येणारा थकवा, अन्न नकोसे वाटणे, मरगळ या गोष्टी त्यांना इतर प्राण्यांपासून दूर ठेवतात आणि संसर्गाचे संक्रमण होण्याचा धोका कमी करतात ही बाब सकारात्मक आणि उपयुक्तच असल्याचे शास्त्रज्ञ नमूद करतात. घशातील प्रोस्टॅग्लॅंडिन शोधणाऱ्या चेतापेशी इन्फ्लुएन्झाव्यतिरिक्त कोणत्या जिवाणू आणि विषाणूंबद्दल माहिती प्रसारित करतात हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र त्याबाबत अधिक माहितीसाठी भविष्यात संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत वैज्ञानिक वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.