आसिफ बागवान
ट्विटरची मालकी मिळवल्यापासून जगप्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क हे सातत्याने चर्चेत आहेत. उच्चपदस्थांची हकालपट्टी करण्यापासून ‘ब्लू टिक’साठी शुल्क आकारणी करण्यापर्यंत अनेक निर्णयांतून त्यांनी ट्विटरला आपल्या शैलीत बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांत ‘ट्विटर फाइल्स’द्वारे काही गौप्यस्फोट होऊ लागले आहेत. अमेरिकेच्या आजी-माजी अध्यक्षांसह उजव्या विचारसरणीच्या मंडळींशी संबंधित गौप्यस्फोट करणाऱ्या ‘ट्विटर फाइल्स’मध्ये काय आहे आणि याचा काय परिणाम होणार, याचा आढावा..
‘ट्विटर फाइल्स’ नेमक्या काय?
अमेरिकेतील मुक्त पत्रकार लेखक मॅट तैब्बी आणि बॅरी वीज यांनी ‘ट्विटर फाइल्स’च्या रूपात ट्विटरकडून खातेदारांच्या बाबतीत करण्यात आलेल्या दडपशाहीची प्रकरणे उजेडात आणण्याचा दावा केला आहे. या पत्रकारांना ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांच्याकडूनच माहितीचा पुरवठा होत आहे. ट्विटरवर टाकलेल्या मजकुराची छाननी व पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मजकूर हटवताना घेतलेले निर्णय, त्या वेळी झालेली चर्चा यांचा तपशील ‘ट्विटर फाइल्स’च्या माध्यमातून उघड करण्यात आला आहे. आतापर्यंत अशी सहा प्रकरणे जाहीर करण्यात आली आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षांचा कसा आणि काय संबंध?
या मालिकेत पहिलेच प्रकरण अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांचे पुत्र हंटर यांच्याविषयी आहे. २०१५ मध्ये बायडेन हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना हंटर यांनी आपल्या वडिलांच्या प्रभावाचा वापर करून युक्रेनमधील एका कंपनीला मदत केल्याचे वृत्त अमेरिकेतील ‘न्यू यॉर्क पोस्ट’ या संकेतस्थळाने २०२०च्या अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान प्रसिद्ध केले होते. मात्र, ट्विटरने हे वृत्त आपल्या व्यासपीठावरून प्रसारित करण्यास ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला मज्जाव केला. एवढेच नव्हे तर, कंपनीचे खातेही रद्द केले, असा दावा ‘ट्विटर फाइल्स’च्या पहिल्या प्रकरणात करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात ट्विटरकडून जाणीवपूर्वक डावलण्यात आलेल्या खात्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. या खात्यांवरून प्रसारित होणारा मजकूर नकारात्मक असल्याचे सांगत ट्विटरने काही खाती जाणूनबुजून प्रकाशझोतात येऊ दिली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
ट्रम्प यांचे खाते हटवताना काय घडले?
गतवर्षी ६ जानेवारीला अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचे खाते हटवताना ट्विटरमध्ये निर्माण झालेली मतमतांतरे यांवर ‘ट्विटर फाइल्स’च्या तिसऱ्या, चौथ्या प्रकरणात प्रकाश पाडण्यात आला आहे. ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी रद्द करण्याबद्दल ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी हे इच्छुक नव्हते. मात्र, कंपनीतील काही उच्चपदस्थांच्या दबावामुळे त्यांनी तो निर्णय मंजूर केला, असे यातून उघड झाले आहे. अनेकदा कोणतीही निश्चित धोरणे नसताना काही कर्मचाऱ्यांनी स्वत:हून ट्रम्प समर्थकांचे ट्वीट हटवल्याचेही यातून उघड झाले आहे.
गौप्यस्फोटाचा काय परिणाम?
‘ट्विटर फाइल्स’मधून मोठे गौप्यस्फोट घडवण्याचा दावा मस्क यांनी केला होता. मात्र, आतापर्यंत त्यावर वादंग निर्माण झालेले नाहीत. ट्विटरच्या ‘कथित’ दडपशाहीबद्दल या प्रकरणांतून भाष्य करण्यात आले असले तरी, हे निर्णय कुणी घेतले, का घेतले, यावर या प्रकरणांतून खुलासा होत नाही. शिवाय मजकूर छाटणीमागे एखाद्या राजकीय शक्तीचा हात आहे का, हेही ‘ट्विटर फाइल्स’मधून स्पष्ट होत नाही.
मस्क यांच्या हेतूबाबतच शंका?
‘ट्विटर फाइल्स’ जारी करताना या कंपनीमध्ये पूर्वी किती लपवाछपवी चालत असे आणि आता आपण किती पारदर्शक कारभार करत आहोत, हे दाखवण्याचा मस्क यांचा हेतू आहे. मात्र, या हेतूवरच शंका घेण्यास वाव आहे. मस्क यांनी ‘ट्विटर फाइल्स’ची माहिती ठरावीक दोन-तीन पत्रकारांनाच पुरवली आहे. अमेरिकेतील मोठय़ा वृत्तपत्र समूहातील पत्रकारांना ही सविस्तर माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे. शिवाय यातून सरसकट माहिती न देता निवडक माहितीच दिली जात असल्याचेही उघड होत आहे.
आता मस्क यांच्यावरच दडपशाहीचा आरोप?
ट्विटरवर नेहमीच पक्षपातीपणाचा आरोप करणाऱ्यो इलॉन मस्क यांच्यावरच आता दडपशाहीचा आरोप होत आहे. अमेरिकेतील एका संकेतस्थळाने मस्क यांच्या विमानवाऱ्यांबद्दल उपलब्ध असलेली सार्वजनिक माहिती ट्विटरवरूनच उघड केली. त्यावर मस्क यांनी या संकेतस्थळाचे ट्विटर खाते कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीवरून बातम्या करणाऱ्या काही पत्रकारांचे खातेही ट्विटरने निलंबित केले. त्यामुळे मस्क यांच्यावरच टीका होत आहे.
ट्विटरमधील गुंतवणूक ‘टेस्ला’ला जड?
ट्विटरची मालकी मिळवल्यापासून इलॉन मस्क यांनी या कंपनीवरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच ट्विटरबाबतच्या उलटसुलट चर्चा आणि निर्णयांमुळे मस्क यांना नेमके काय साध्य करायचे आहे, हा प्रश्न आहेच. दुसरीकडे, मस्क यांची कंपनी ‘टेस्ला’चे गुंतवणूकदार आणि भागधारकही त्यांच्या अतिट्विटरप्रेमामुळे नाराज आहेत. ट्विटरच्या कारभारात जास्त लक्ष घालत असल्यामुळे टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या उद्योगाकडे मस्क यांचे दुर्लक्ष होत आहे, असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. मस्क यांनी स्वत:च राबवलेल्या मतचाचणीत त्यांना ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याचा कौल मिळाला, ही आणखी एक घडामोड. त्यानंतर बुधवारी मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन सीईओ शोधून पायउतार होण्याचेही जाहीर केले आहे. हा सगळा घटनाक्रम बारकाईने पाहिल्यास मस्क यांनी राबवलेली मतचाचणी म्हणजे ट्विटरच्या कारभारातून मुक्त होण्यासाठी केलेली धडपड असावी, असे दिसते. अर्थात मस्क यांचे आजवरचे वर्तन अनपेक्षित निर्णय घेणारे असल्याने याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे.