राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघिणीने बछडे सुरक्षित राहावेत म्हणून त्यांना स्वत:पासून दूर ठेवून वाघासमोर स्वत:ला समर्पित केल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांनी अनुभवली. वाघिणीने अधिवास मिळवणे, अस्तित्व टिकवणे, बछडय़ांना सुरक्षा कवच प्रदान करणे हे नवीन नाही. प्राण्यांच्या या वर्तनाविषयी जाणून घेण्यासाठी वाघ आणि वाघिणीच्या या मीलनक्रियेचा त्यांच्या वृत्तींचा अभ्यास व्हायला हवा, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.

जागतिक पातळीवर संशोधनाची वानवा

वाघांच्या वर्तनाविषयी फारसा अभ्यास झालेला नाही, असे ‘द सेक्स लाइफ ऑफ टायगर्स: रणथंबोर टेल्स’चे लेखक वाल्मिक थापर यांचे म्हणणे आहे. वाघांची जवळून ओळख करून घेण्यासाठी त्यांना चार दशके प्रयत्न करावे लागले, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

अधिवासात घट झाल्याने प्रजननात बदल होतो का?

जगभरात एकीकडे व्याघ्र अधिवास कमी होऊ लागले आहेत, तर दुसरीकडे वाघांची संख्यादेखील घटत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अधिवास वाघांसाठी अपुरे ठरू लागले आहेत. अधिवास आणि अस्तित्वासाठी तसेच त्याच अधिवासातील अन्य वाघाने बछडय़ांची शिकार करू नये म्हणून वाघीण अन्य वाघाशी मीलनास तयार होते. 

वाघ आपला जोडीदार कसे शोधतात?

वाघ एकमेकांना गंधाने ओळखतात. वाघिणीची मीलनाची तीव्र इच्छा होते तेव्हा ती जवळच्या वाघाला शोधून काढते. स्वत:च्या मूत्राच्या वासाने ती त्याला आकर्षित करून घेते. वाघदेखील याच पद्धतीने वाघिणीला आकर्षित करून घेतात. जिथे वाघ आणि मानवात संघर्ष निर्माण झालेला असतो, तिथेही वाघाला शोधण्यासाठी वाघिणीचे आणि वाघिणीला शोधण्यासाठी वाघाचे मूत्र शिंपडले जाते. प्रामुख्याने मध्य प्रदेशात या पद्धतीचा वापर केला जातो.

वाघिणीवरील अधिकारावरून वाघांमध्ये संघर्ष होतात का?

वाघिणीवरील अधिकार हे दोन वाघांमधील संघर्षांचे प्रमुख कारण आहे. वाघ स्वत:च्या अधिवासात वाघिणीला राहू देण्यास तयार असतो, मात्र तो अन्य वाघाचे अस्तित्व सहन करत नाही. अशा स्थितीत त्या दोन वाघांमध्ये लढाया होतात. यात ते गंभीर जखमी होतात. जिंकलेल्या वाघाकडे वाघीण आकर्षित होते. जिथे वाघांची घनता जास्त असते, तिथे मादीवरील लैंगिक अधिकारावरून अशा प्रकारच्या लढाया होण्याची शक्यता अधिक असते.

मीलनानंतर वाघ वाघिणीला सोडून देतो का?

मीलनानंतर किंवा बछडे जन्मल्यानंतर वाघ वाघिणीला व बछडय़ांना सोडून जातो, असे म्हटले जाते, मात्र प्रत्यक्षात मादी बछडय़ांचे संगोपन करते आणि नर बाहेर राहून तिला व बछडय़ांना संरक्षक कवच पुरवतो. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात १० वर्षांपूर्वी ‘भोकण्या’ या नावाने ओळखला जाणाऱ्या वाघाचे चार वाघिणींशी संबंध होते. चारही वाघिणींना बछडे होते. या वाघाला त्या बछडय़ांच्या पितृत्वाची जबाबदारी पार पाडताना पर्यटकांनी पाहिले आहे.

प्राणी, पक्ष्यांमध्ये समलैंगिकता असते का?

माणसांप्रमाणेच पक्ष्यांमध्येदेखील समलैंगिकता आढळते. अमरावतीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ११व्या ‘विदर्भ पक्षीमित्र संमेलना’त वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी ‘पिंगळय़ा’बाबत पाहिलेला अनुभव कथन केला. त्यांनी तीन नर पिंगळय़ांचे मीलन सुरू असताना पाहिल्याचे सांगितले होते. स्वयंघोषित पक्षीमित्र अतुल धामणकर यांनी त्यांना विरोध केला होता. त्या वेळी संमेलनाला आलेले अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी तरटे पाटील यांना दुजोरा दिला होता.

प्राणी- पक्ष्यांचे मीलन मृत्यूला आमंत्रण ठरू शकते का?

कोणत्याही जिवासाठी मीलन ही सुखद अनुभूती असली तरी ‘जॉइंट वूड स्पायडर’ म्हणजेच व्याघ्रकोळी प्रजातीसाठी ते सुखद नसते. या प्रजातीत मादी नरापेक्षा मोठी असते. तर नर हे अतिशय लहान असतात. एका मादीचा आकार २२ नरांएवढा असतो. त्या मादीला मिळवण्यासाठी नरांची आपआपसात भांडणे होतात. जो जिंकतो तो मादीबरोबर जातो. मात्र, मीलन झाल्यानंतर मादी नराला मारून खाऊन टाकते.

वन खात्याला संशोधनाचे वावडे ?

जगभरातील सर्वाधिक- सुमारे ६७ टक्के वाघ भारतात आहेत. मात्र, देशात व्याघ्रसंशोधनाला वाव नाही. वाघांचा संचारमार्ग शोधणे आणि त्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर लावणे एवढय़ावरच वन खाते अडकून पडले आहे. प्रत्यक्षात वाघांची संख्या अधिक असलेल्या प्रदेशांत त्यांच्या वर्तनात बदल जाणवल्यास, त्याचा अभ्यास व्हायला हवा, पण तो होताना दिसत नाही. वन खात्याला अभ्यासात स्वारस्य असते, तर वाघाने वाघिणीला अधिवासातून हाकलणे, तिला अधिवासात स्थान देण्यासाठी तिच्या इतर वाघापासून झालेल्या बछडय़ांना ठार मारणे आणि मग बछडय़ांच्या सुरक्षिततेसाठी व अधिवास आणि अस्तित्वासाठी तिने वाघासोबत मीलनास तयार होणे, या घटनेचा अभ्यास झाला असता, संशोधन झाले असते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishleshan wildlife by tiger tadoba andhari tiger project by tourists print exp 1022 ysh
Show comments