राखी चव्हाण
खवले मांजर हा जगातील सर्वाधिक तस्करी होणाऱ्या प्राण्यांमध्ये आघाडीवर आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत ही प्रजाती ‘अनुसूची एक’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. निसर्गसंवर्धनासाठी काम करणाऱ्या आययूसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) ने अतिशय चिंताजनक स्थितीत असलेल्या प्राण्यांच्या वर्गात याची नोंद केली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची शिकार होऊन खवले विकले जातात.
चार वर्षांचा अहवाल काय म्हणतो?
ट्रॅफिक इंडिया आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया या दोन्ही संस्थांनी खवले मांजराबाबत नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. भारतात खवले मांजर जप्तीच्या ३४२ घटना गेल्या चार वर्षांत उघडकीस आल्या. त्यात वन्यजीव व्यापारासाठी १२०३ खवले मांजरांची शिकार व तस्करी झाली. त्यापैकी ओडिशातील ७४ जप्तीच्या घटनांमध्ये १५४, तर महाराष्ट्रातील ४७ जप्तीच्या घटनांमध्ये १३५ खवले मांजरांचा समावेश आहे. यातील ५० टक्के घटनांमध्ये जिवंत खवले मांजर जप्त करण्यात आले तर ४० टक्के घटनांमध्ये या प्राण्याचे खवले व इतर अवयव जप्त करण्यात आले.
ही तस्करी कुणाकडून?
फार पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे. पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. साधारण दोन दशकांपूर्वीपर्यंत कोकणात क्वचितच खाण्यासाठी खवले मांजराची शिकार व्हायची. पण गेल्या काही वर्षांत तस्करीच्या उद्देशाने भारतात खवले मांजराची शिकार वाढली आहे. गावात व्यापार करण्याच्या उद्देशाने फेरीवाले जंगलातल्या प्राण्यांची माहिती घेतात. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात खवले मांजर पकडून दिले जातात. त्यांच्या खवल्यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये आहे.
शिकारीमागचे कारण काय?
गेल्या काही वर्षांत खवले मांजराच्या शिकारीत प्रचंड वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे भारतीय वन्यजीव निधी (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या संस्थेने म्हटले आहे. चीन आणि व्हिएतनाम या दोन देशांत या प्राण्याला खूप मागणी आहे. मांस खाण्यासाठी या प्राण्यांची शिकार केली जाते, पण त्याहीपेक्षा पारंपरिक चिनी औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. दमा आणि संधिवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. बुलेटप्रूफ जॅकेट बनवण्यासाठीदेखील त्याची शिकार होते.
खवले मांजराच्या शिकार व तस्करीत आघाडीवर कोण?
जगात खवल्या मांजराच्या एकूण आठ प्रजाती आढळतात. आफ्रिका खंडात चार आणि आशिया खंडात चार प्रजाती आहेत. भारतात हिमालय आणि ईशान्य भारत सोडून सगळीकडे खवले मांजराचे वास्तव्य असते. सध्याच्या अहवालानुसार या प्राण्याच्या शिकार व तस्करीत ओडिशा व महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात चिनी खवले मांजराची संख्या घटल्याने हा मोर्चा भारतीय खवले मांजराकडे वळला आहे.
शेतकरी आणि खवले मांजराचे नाते काय?
शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना खवले मांजर एक प्रकारे मदतच करत असतात. घराला पेस्टिसाइड करण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करतो. गावात मात्र नैसर्गिकरीत्या पेस्ट कंट्रोल (कीटकनाशन) करण्याचे काम खवले मांजर करते. एका दिवसात वीस हजारांहून अधिक वाळवीसारखे कीटक खाऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हा प्राणी करतो. तर हा प्राणी वर्षांला ७० मिलियन कीटक खातो. खवले मांजरामुळे कीटकनाशकाशिवाय काम साध्य होते.
हाल करून मारले जाते, ते का?
खवले मांजर जेव्हा धोका ओळखून स्वत:च्या शरीराचा चेंडू करून घेते, तेव्हा त्याला पुन्हा मूळ स्वरूपात आणणे माणसालाही शक्य होत नाही. हा प्राणी कुऱ्हाडीलाही दाद देत नाही. त्यामुळे त्याला पकडल्यानंतर उकळत्या पाण्यात टाकून त्याला मारले जाते. याची शिकार प्रामुख्याने कोकणात आणि विदर्भात अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये त्याची बिळे स्थानिकांना माहीत असतात. त्यामुळे स्थानिकांना दारू, पैसे असे आमिष दाखवून ही शिकार घडवून आणली जाते.