-अनिश पाटील
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे निवृत्त होण्याच्या एक दिवस आधी वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. महाविकास आघाडीच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुंबई पोलीस आयुक्त पदाबाबतचा आदेश गृह विभागाने काढला. मुंबई पोलीस आयुक्तपदासारखे महत्त्वाचे पद रिक्त ठेवणे योग्य नसल्यामुळे हा निर्णय तात्काळ घेण्यात आल्याचे बोलले जाते. या नियुक्तीबाबत कोणत्या बाबींचा विचार झाला, आगामी काळात फणसळकर यांच्यापुढील आव्हाने कोणती यावर दृष्टिक्षेप.
पोलीस आयुक्त पदासाठी कोणती नावे चर्चेत होती?
मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विवेक फणसळकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, सदानंद दाते, बी. के. उपाध्याय ही नावे चर्चेत होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ज्याप्रमाणे राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची समीकरणेही बदलली. या पदासाठी ठाण्याचे पोलीस आयु्क्त जयजीत सिंह यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. पण जयजीत सिंह यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असल्यामुळे त्याचे नाव मागे पडल्याची चर्चा आहे.
नियुक्तीसाठी कोणत्या तांत्रिक बाबींचा विचार झाला?
१९८६च्या तुकडीचे संजय पांडे हे निवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेप्रमाणे १९८७च्या तुकडीतील हेमंत नगराळे हे वरिष्ठ अधिकारी आहेत. मात्र नगराळे यांनी यापूर्वी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त या दोन्ही पदांवर काम केल्याने त्यांची नियुक्ती अशक्य होती. त्यानंतर १९८८च्या तुकडीतील रजनीश शेठ हे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. तर १९८८ च्या तुकडीतील रश्मी शुक्ला या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे या तिघांचाही मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी विचार करण्यात आला नाही. अशा परिस्थितीत फणसळकर व ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीतसिंह दोन पर्याय राज्य सरकारकडे होते. त्यातील १९८९च्या तुकडीतील फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
फणसळकरांनी यापूर्वी कोणत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या?
भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ तुकडीतील अधिकारी असलेले फणसळकर हे पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. मुंबई पोलीस दलातील ४० हजार पोलिसांचे ते नेतृत्व करणार आहेत. फणसळकर सध्या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. सुमारे पावणेदोन वर्षे त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभळला. करोना काळात जिवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. याशिवाय त्यांनी मुंबईतही महत्त्वाच्या पदांवर यापूर्वी काम केले आहे. मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त म्हणून फणसळकर यांनी काम केले होते. मुंबईत पोलीस सहआयुक्त (प्रशासन) या पदाचाही कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. फणसळकर यांची पहिली नियुक्ती अकोल्याचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी वर्ध्याचे व परभणीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. नाशिकचे उपायुक्त ही त्यांची आयुक्तालयातील पहिली नियुक्ती होती. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
फणसळकर यांच्यापुढील आव्हाने कोणती?
राज्यात सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी फणसळकर यांच्यावर आहे. याशिवाय शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. याशिवाय सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता त्या विभागाला पूर्णकाळ उपायुक्त नेमण्याची आवश्यकता आहे. सामान्य नागरिकांसह पोलीस दलातील अंमलदारांचे अनेक प्रश्न सोडवण्याची जबाबदारीही फणसळकर यांच्यावर आहे. आठ तास ड्युटी, घरे हे पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन समतोल राखण्याचे मोठे आव्हान फणसळकर यांच्यासमोर आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत सचिन वाझे प्रकरण, उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर झालेले आरोप, परबीर सिंह यांच्यावर झालेले आरोप या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे मनोबल खालावले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून सामान्य नागरिकांच्या मनात पोलीस दलावरील विश्वास वाढवण्याचे मोठे आव्हानही फणसळकर यांच्यासमोर आहे.