संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निरंकुश राज्यसत्तेला आव्हान देणारे ॲलेक्सी नवाल्नी जिवंत असल्याचे समोर आले आहे. पुतिन यांचे कट्टर विरोधक असलेले नवाल्नी तीन आठवड्यांपासून बेपत्ता होते. पुतिन यांनी आपल्या या विरोधकाला कायमचे संपवल्याचे बोलले जात होते. मात्र सायबेरियातील कारागृहात ते असल्याची पुष्टी त्यांच्या वकिलांनी दिली आहे. तुरुंगात असले तरी भविष्यात पुतिन यांची राज्यव्यवस्था उलथून टाकण्यासाठी नवाल्नी यांचे प्रयत्न सुरूच राहतील का, याविषयी जगभर उत्सुकता आहे. पुतिन यांच्या कडव्या विरोधकावर एक नजर…

ॲलेक्सी नवाल्नी कोण आहेत?

रशियामधील प्रसिद्ध वकील आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते अशी ॲलेक्सी नवाल्नी यांची ओळख आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कडवे टीकाकार म्हणून ते पुढे प्रसिद्धीस आले. १९७६ मध्ये जन्माला आलेले नवाल्नी मॉस्कोतील पीपल्स फ्रेंडशिप विद्यापीठात कायद्याची पदवी घेऊन उत्तीर्ण झाले. २००० मध्ये रशियन युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष असलेल्या ‘याब्लोको’मध्ये ते सामील झाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एककल्ली राज्यकारभार, हुकूमशाही पद्धती आणि भ्रष्टाचार यांच्याविरोधात त्यांनी पुढे चळवळी सुरू केल्या. पुतिन यांच्या निरंकुश व्यवस्थेला लगाम घालण्याचे काम नवाल्नी करू पाहत आहेत. त्यांना रशियाच्या तरुण, मध्यमवर्गीय नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या मोहिमांनी रशियन राज्याच्या जवळजवळ प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचार उघड केला आहे. पुतिन यांना सातत्याने लक्ष्य करून त्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पुतिन यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविली.

हेही वाचा >>>गुजरातच्या समुद्रकिनारी जहाजावर ड्रोन हल्ला, हमास-इस्रायल युद्धाचा संबंध काय? जाणून घ्या..

नवाल्नी यांनी पुतिन यांच्या विरोधात माेहीम कशी लढविली?

नवाल्नी हे सुरुवातीला ‘लाइव्ह जर्नल’ या ब्लॉगद्वारे ओळखले गेले. या ब्लॉगद्वारे त्यांनी सातत्याने पुतिन यांच्यावर टीकेचा मारा केला. पुतिन यांचा पक्ष ‘बदमाश’ आणि ‘चोर’ यांनी भरलेला आहे. पुतिन हे क्रेमलिनमधील सामंतशाही राज्याद्वारे रशियाचे रक्त शोषूण घेत आहेत, अशी जहरी टीका त्यांनी पुतिन यांच्यावर केली. झारवादी रशियासारखी पुतिन यांची राज्यव्यवस्था असून पुतिन पायउतार झाल्याशिवाय रशियाचा विकास होऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी वारंवार मांडली. नवाल्नी हे रशियाविरोधी समन्वय समितीचे सदस्य आहेत. भ्रष्टाचारविरोधी प्रचारक अशी ओळख असलेले नवाल्नी पुतिन यांच्या विरोधातील सर्वात प्रमुख चेहरा आहेत.

विषप्रयोग आणि तुरुंगवास…

पुतीन यांच्याविरोधातील प्रमुख चेहरा बनलेल्या नवाल्नी यांना रशियातील सामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने पुतिन यांनी आपल्या राजकीय विरोधकाचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. पुतिन यांनी नवाल्नी यांवर खटले भरले, निवडणुकीत अपात्र ठरवत त्यांच्या उमेदवारीवर बंदी घातली. नवाल्नी यांच्या संघटनेवर ‘अतिरेकी’ म्हणून बंदी घातली गेली. मात्र हे करूनही नवाल्नी जुमानत नसल्याचे पाहून पुतिन यांनी अखेर विषप्रयोगाचे अस्त्र बाहेर काढले. सायबेरियातील तोम्स्क येथून मॉस्कोला जाणाऱ्या विमानात २० ऑगस्ट २०२० मध्ये नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. त्यांना तात्काळ ओम्सकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे कोमात असलेल्या नवाल्नी यांना रशियात ठेवणे धोकादायक असल्याचे लक्षात येताच त्यांच्या समर्थकांनी त्यांना जर्मनीला हलविले. बर्लिन येथे उपचार करून ते रशियात परतले. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण रशियामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नवाल्नी यांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानी तुरुंगात झाली. मानवी हक्कांच्या युरोपियन न्यायालयाने नवाल्नींच्या जिवाला धोका असल्याने त्यांची ताबडतोब मुक्तता करावी, असा निकाल दिला, परंतु रशियाने हा निर्णय नाकारला.

हेही वाचा >>>तुमच्या पाळीव कुत्र्याने एखाद्यावर हल्ला केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड, वाचा नव्या कायद्यातील तरतूद…

नवाल्नी बेपत्ता असल्याचे वृत्त काय?

मॉस्कोच्या पूर्वेला एका कारागृहात नवाल्नी यांना कैद करण्यात आले होते. २०२१ मध्ये त्यांना १९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी दूरचित्र संवादाच्या (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात येणार होते. मात्र तुरुंग प्रशासनाकडून त्यांना हजर करण्यात आले नाही. विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नवाल्नी यांना न्यायालयात हजर करता आले नाही, असे कारण कारागृह प्रशासनाने दिले. नवाल्नी यांच्या प्रवक्ता कीरा यर्मिश यांनीही नवाल्नी यांच्याबाबत काहीही माहीत नसल्याचे सांगितले. अनेकदा प्रयत्न करूनही नवाल्नी यांना भेटू दिले जात नाही. ते कारागृहात नसून त्यांच्याबाबत काही बरे-वाईट झाले तर नाही ना… असा संशय यार्मिश यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे नवाल्नी यांचे नाव कैद्यांच्या सूचीमध्येही नाही आणि त्यांना कुठे स्थलांतरित केले आहे का, याबाबतही काही माहीत नसल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले. नवाल्नी यांची प्रकृती तुरुंगामध्ये खालावली होती. त्यांना व्यवस्थित जेवण दिले जात नव्हते आणि खेळती हवा नसलेल्या अंधारकोठडीत डांबून ठेवले होते, असे यार्मिश यांनी सांगितले.

बेपत्ता नवाल्नी यांचा शोध…

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या नवाल्नी यांचा शोध अखेर लागला आणि ते उत्तर रशियात असल्याची पुष्टी त्यांच्या प्रवक्त्याने दिली. पुतिन यांनी आपल्या या विरोधकाला त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या निकटवर्तीयांपासून शक्यतो दूर ठेवण्यासाठी अगदी उत्तर रशियातील सायबेरियातील दंडकोठडीत ठेवले आहे, असे नवाल्नी यांच्या प्रवक्त्या यार्मिश यांनी सांगितले. ६ डिसेंबरपासून नवाल्नी यांच्याशी कोणताही संपर्क झाला नव्हता. ते ठीक असल्याचे आणि मॉस्कोपासून २३५ किलोमीटर दूर मेलेखोवो येथील कारागृहात असल्याचे नवाल्नींच्या वकिलाने सांगितले. नवाल्नी सापडल्याच्या वृत्ताचे अमेरिकेने स्वागत केले, मात्र त्यांच्या आरोग्याबद्दल आणि छळ केल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. यार्मिश यांनीही रशियन अधिकारी नवाल्नींना वेगळे ठेवण्याचा आणि त्यांचे जीवन शक्य तितके असह्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. नवाल्नी यांचे साहाय्यक इव्हान झाडोव्ह यांनीही ‘नवाल्नी यांना दिलेल्या वागणुकीमुळे राजकीय यंत्रणा कैद्यांशी कशी वागते आणि त्यांना अलग ठेवण्याचा, दडपण्याचा कसे प्रयत्न करते, हे दाखवून दिले,’ असे सांगितले.

sandeep.nalawade@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vladimir putin missing opponent alexei navalny confirmed to be in a siberian prison print exp amy
Show comments