रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी चीनला पोहोचले. ते दोन दिवसांच्या चीन दौर्यवार आहेत. अवघ्या आठवडाभरापूर्वीच त्यांनी पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि पहिल्याच भेटीसाठी चीनची निवड केली. पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पुतिन आणि जिनपिंग यांच्यातील मैत्री घट्ट होत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे सांगणे आहे. अनेकार्थांनी ही भेट महत्त्वाची ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगासाठी या मैत्रीचे महत्त्व काय? पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय? याबद्दलच जाणून घेऊ या.
चीन-रशियाची मैत्री अजून घट्ट
‘पॉलिटिको’च्या मते, जिनपिंग यांनी पुतिन यांना निमंत्रित केले होते आणि पुतिन यांनी हे निमंत्रण स्वीकारून दोन दिवसीय चीन दौरा नियोजित केला. गेल्या सहा महिन्यांतील पुतिन यांचा चीनमधील हा दुसरा दौरा आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्रांनी बुधवारी पुतिन चीनच्या भेटीसाठी येत असल्याचे वृत्त दिले. काही चिनी समालोचकांनी सांगितले की, दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांवर, आंतरराष्ट्रीय विषयांवर आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील.
हेही वाचा : वकिलाने खटला नीट न चालविल्यास गुन्हा दाखल करता येतो का?सर्वोच्च न्यायालय काय म्हणते?
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने सांगितले, “या भेटीदरम्यान चर्चेसह अनेक द्विपक्षीय करारावर स्वाक्षर्या होतील.” चीनबरोबर असणार्या आपल्या मैत्रीविषयी पुतिन यांनी अनेकदा उघड प्रतिक्रिया दिली आहे. “कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा सामना करताना, आमचे संबंध अजून मजबूत होत आहेत,” असे पुतिन यांनी बीबीसीला सांगितले होते. आपल्या नव्या कार्यकाळात सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असलेल्या चीनचे समर्थन पुतिन यांच्यासाठी आवश्यक आहे.
चर्चेतील मुद्दे काय?
व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी युक्रेनयुद्ध प्रतिष्ठेचा भाग आहे. रशियाची संपूर्ण अर्थव्यवस्था लष्कराकडे झुकली आहे. कारण पुतिन यांना हे युद्ध थांबवायचे नाही. त्यामुळे पुतिन यांना रशियाची अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे. शी जिनपिंग यांच्याकडून रशियाच्या युद्ध अर्थव्यवस्थेला अधिक पाठिंबा मिळावा, चीनने शस्त्र पुरवठ्याबाबत वचनबद्ध राहावे, तसेच लष्करी उद्योगांना अधिक सवलतीत तेल आणि वायू खरेदीसाठी मदत करावी, यांसारख्या मुद्द्यांवर विशेष चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
रशिया आणि चीन यांच्या मैत्रीवर तज्ज्ञांचे मत काय?
२०२२ मध्ये रशिया आणि चीनने ‘नो लिमिट’ भागीदारीची घोषणा केली होती. बीजिंगमधील रेनमिन विद्यापीठातील फॉरेन रिलेशनशिप विषयाचे प्राध्यापक वांग यिवेई यांनी ‘ब्लूमबर्ग’ला सांगितले की, “दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी नवीन राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या परदेश दौऱ्यांमध्ये एकमेकांना भेट देणे ही परंपरा ठेवली आहे.” एका रशियन अधिकाऱ्याने सांगितले, “चीन हा रशियाचा धोरणात्मक भागीदार आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तरीही यात काहीही बदल होणार नाही.”
रशियन अकादमी ऑफ सायन्सेस संस्थेचे संचालक अलेक्सी मास्लोव्ह यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे चीनच्या प्रमुख बँका चिंतेत आहेत. कार्नेगी रशिया युरेशिया सेंटरमधील सहकारी आणि रशियन सेंट्रल बँकेचे माजी सल्लागार अलेक्झांड्रा प्रोकोपेन्को म्हणाले की, दोन्ही देश कदाचित अमेरिकेच्या निर्बंधांवर मार्ग काढण्यासाठी चर्चा करतील.
शांघायमधील इंटरनॅशनल स्टडीज इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक झाओ मिंघाओ यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, “रशिया चीनबरोबरचे व्यापार आणि ऊर्जा यासह आपल्या देशाचे संबंध स्थिर करण्यावर चर्चा करेल.” युक्रेन धोरणात बदल होण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. या भेटीत ‘पॉवर ऑफ सायबेरिया २’ पाइपलाइन प्रकल्पाशी संबंधित करारावरही महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर रशियातून चीनला नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
बीजिंगला भेट देण्यापूर्वी चिनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पुतिन म्हणाले होते की, “आम्ही युक्रेनवर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, परंतु यासाठी आमच्यासह या संघर्षात असलेल्या सर्व देशांचे हित लक्षात घेतले पाहिजे,” असे पुतिन यांनी बुधवारी अधिकृत शिन्हुआ न्यूज एजन्सीला सांगितले. चीनच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुतिन यांनी युक्रेन संकटावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या चीनच्या योजनेचे समर्थन केले. या मुलाखतीत त्यांनी रशिया आणि चीनमधील आर्थिक संबंधांचीदेखील प्रशंसा केली. रशिया-चीन संबंध आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत, असे ते या मुलाखतीत म्हणाले.
कार्नेगी रशिया युरेशिया सेंटरचे संचालक अलेक्झांडर गाबुएव यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले, “जर हे अस्तित्ववादी युद्ध असेल तर त्यांच्याकडे इतर पर्याय का नाही. त्यांच्याकडे चीन हा एकमात्र पर्याय आहे. वाहनांपासून ते लष्करी दर्जाच्या चिप्सपर्यंत हे सर्व तंत्रज्ञान केवळ चीनच पुरवू शकतो. या सर्व वस्तूंच्या बाजारपेठ चीनकडे आहेत. भारतही यात सर्वोच्च स्थानावर आहे, परंतु चीनची बाजारपेठ मोठी आहे.”
हेही वाचा : केजरीवालांच्या घरी ‘आप’ च्या महिला खासदारांना मारहाण; कारण काय? कोण आहेत स्वाती मालीवाल?
पण, चीनने आतापर्यंत रशियाला प्रत्यक्ष शस्त्रे आणि दारूगोळा पुरविणे टाळले आहे. सिंगापूरस्थित संरक्षण विश्लेषक अलेक्झांडर नील म्हणाले, “मला खात्री आहे की युक्रेन युद्धासाठी पुतिन यांना चीनची मदत हवी आहे.” चीनला युरोपियन राष्ट्रांच्या भागीदारांसह एक बहु-ध्रुवीय जग तयार करायचे आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळेच युक्रेनच्या धोरणात दोन्ही बाजूंनी कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. गेल्या काही काळापासून जिनपिंग पाश्चात्य देशांशी आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळेही पुतिन यांच्या चिंतेत भर पडली आहे. शी जिनपिंग पाश्चात्य देशांच्या दबावाला बळी पडू नये, अशीही पुतिन यांची इच्छा आहे.
सिंगापूरच्या एस राजरत्नम स्कूलचे सिक्युरिटी स्कॉलर जेम्स चार म्हणाले, “अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जागतिक व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आणि भू-राजकीय वर्चस्वासाठी अमेरिकेबरोबर असणार्या दीर्घकालीन संघर्षात चीनला रशियाची साथ असणे आवश्यक आहे.” गेल्या काही वर्षांत रशिया आणि चीनमधील व्यापार वाढला आहे, मात्र पुतिन यांना हा व्यापार आणखी वाढवायचा आहे. चीन दौर्यावर असताना पुतिन चीनचे पंतप्रधान ली कियांग यांचीदेखील भेट घेणार आहेत.