असा एक काळ होता की प्रत्येक कारनिर्मिती कंपनी कारमध्ये चालकाला सावध करणाऱ्या अतिप्रगत अर्थात महाकाय स्मरणशक्तीच्या डॅशबोर्ड स्क्रीन (पटल) बसविण्याचा जणू स्पर्धाच लागली होती. कार तंत्रज्ञानातील ही मोठी उडी ठरली होती. परंतु काही महत्त्वाच्या वाहतूक नियमनासाठी पूर्णतः डॅशबोर्ड स्क्रीनवर अवलंबून राहणे म्हणजे मूळ आशयाशी विसंगत काहीतरी होऊ शकते, याची जाणीव शेवटी कार निर्मिती कंपन्यांना झाली आहे. केवळ आणि केवळ टचस्क्रीन नियंत्रण प्रणालीचा वापर ही चूक असल्याचे फोक्सवागेन या आघाडीच्या जर्मन कार उत्पादक कंपनीने थेट मान्यच करून टाकले आहे. त्यामुळे फोक्सवागेनने पूर्वीच्या काळी महत्त्वाच्या वाहतूक नियमनासाठी वापरल्या गेलेल्या बटनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
फोक्सवागेनला टचस्क्रीनचे वावडे
फोक्सवागेनचे कार डिझाइन प्रमुख आंद्रे मिन्ट यांनी, कारचालकाला वाहनाचे नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल, यासाठीची रचना पूर्णतः टचस्क्रीन नियंत्रण प्रणाली कारच्या स्टेअरिंगवर (सुकाणू) बसविण्याचे धोरण त्या अर्थाने पाहता खूपच धोक्याचे होते. यापुढे अशी चूक करून कदापि चालणार नाही, असे जाहीर केले आहे.
स्टेअरिंगवर आम्ही आता पुन्हा तीच बटनांची व्यवस्था करणार आहोत. यु्द्धात प्रयोग करून चालत नाही, अशा अर्थाची एक म्हण आहे. तिचे तंतोतंत पालन आता करायला हवे. गंमत म्हणजे स्टेअरिंगवर जुन्या पद्धतीने बटने स्थापित करण्याच्या प्रयोगाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शेवटी ही कार आहे हातातला मोबाइल नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
कारच्या स्टेअरिंगवरील नवे बदल
२०२२च्या अखेरीस युरोपियन कारनिर्मिती कंपन्यांनी हे धाडसी पाऊल उचलले. स्टेअरिंगवरील परंपरागत बटनांना फेकून देत त्याजागी स्पर्श-संवेदी (टचस्क्रीन) नियंत्रण स्थापित केले. तो निर्णय शहाणपणाचा नक्कीच नव्हता. अशा कार चालवणाऱ्या प्रत्येकाने कार कंपन्यांकडे तक्रारी केल्या. तेव्हा कुठे या कंपन्यांना जाग आली, असे मिन्ट म्हणाले. नव्या पिढ्याच्या हातात असलेली फोक्सवागेनची कार ही जुन्या पद्धतीच्या बटनांनी स्थापित केलेल्या स्टेअरिंगची असेल. त्यात ध्वनिनियंत्रण, आसनांमधील तापमान कमी-जास्त करणारी यंत्रणा, पंख्यांचे नियंत्रण, इन्फोटेन्मेंट स्क्रीनच्या अगदी खाली बसवलेले धोक्याची सूचना देणारे दिवे (हॅजर्ड लाइट्स) या पाच प्रमुख वाहतूक नियमन गोष्टींचा समावेश असेल. आम्ही ठरवलंय, यापुढे तयार केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारमध्ये ही प्रणाली बसवली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
पूर्णतः टचस्क्रीन नियंत्रण प्रणाली का नको?
फोक्सवागेनच्या आयडी.टू ऑल इलेक्ट्रिक सुपरमिनी या कारमध्ये या नव्या बदलांचा अंगिकार केला जाईल. ही कार २०२६मध्ये बाजारात आणली जाईल. इन्फोटेन्मेंट डिस्प्लेखालील बाजूस अतिरिक्त फिजिकल (स्थूल) बटनांची एक रांग असेल, असे मिन्ट म्हणाले. अशा स्वरूपाच्या बदलांचा विचार केवळ फोक्सवागेन कार कंपनीनेच केलेला नाही, तर गेल्या वर्षी ह्युंदाईनेही कार स्टेअरिंगवर फिजिकल बटनांच्या जागी टचस्क्रीन नियंत्रण प्रणाली बसविण्यात चूक झाल्याचे कबूल केले होते. या प्रयोगाला अमेरिकेतील ग्राहकांचा फार मोठा संताप कार कंपन्यांना सोसावा लागल्याचे ह्युंदाईच्या अमेरिकन डिझाइन प्रमुखांनी सांगितले. ह्युंदाई कारची भविष्यातील आवृत्ती ही जुन्या शाळांमध्ये शिकवल्या गेलेल्या कार नियंत्रण प्रणालीनुसारच असतील. आमच्या निष्ठावान ग्राहकांचा कल आम्ही तपासला असता असे ध्यानात आले की या साऱ्या नव्या प्रकाराचा त्यांच्यावर ताण येत आहे, असे ह्युंदाईने कबूल केले. एका चिमटीत मावेल इतक्या प्रदेशात बसवलेल्या अर्थात टचस्क्रीन नियंत्रण प्रणालीचा वापर करताना, अनेकांची चीडचीड वाढली. काहींच्या तर अंगाला घामच फुटल्याचे कोरियातील एका वृत्तपत्राने छापलेल्या बातमीत म्हटले आहे.
मुळात पूर्णतः टचस्क्रीन प्रणाली कशी आली?
स्थूलमानाने कारनियंत्रणासाठी वापरली जाणारी प्रणाली फडताळात टाकून त्या जागी महाकाय टचस्क्रीन बसविण्याची पद्धत टेस्लाने सुरू केली. त्यानंतर इतर कार कंपन्यांनीही तोच कित्ता गिरवला. मात्र, हा अतिप्रगत प्रयोग कारचालकांच्या काही पचनी पडला नाही. पूर्णतः टचस्क्रीन प्रणालीला कवटाळण्यामागचे तत्त्वज्ञान अशासाठीच होते की, चालकाला कार चालवण्याचा अनुभव हा एखादा मोबाइल हाताळण्यासारखा वाटावा. पण कारकंपन्यांना ती मोठी चूक होती, असे आता वाटू लागले आहे.
चीन, अमेरिकेत वेगळा कल?
कारमधील संपूर्ण सुरक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आवश्यक अर्थात सुरक्षाविषयक पंचतारांकित दर्जा (एनसीएपी) प्राप्त करायचा झाल्यास कारमध्ये काही अंशी फिजिकल अर्थात त्यासाठीची उपकरणे (बटन) असणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील वर्षीपासून कारमधील सुरक्षाविषयक नव्या नियमांची घोषणा युरोपियन युनियन लवकरच करेल. त्यानंतर फोक्सवागेनने त्यांच्या नव्या कारमधील रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः अमेरिका आणि चीनमधील कारनिर्मिती कंपन्या मात्र स्टेअरिंगवरील संगणकीय नियंत्रण प्रणालीच्या बाजूने आहेत. काहींचा तर असा मनसुबा आहे, की येत्या काळात रस्त्यावर धावणारी कार ही ध्वनिनियंत्रित असेल. कारमधील प्रत्येक गोष्ट आवाजाच्या आज्ञेने केली जाईल. त्यासाठी या दोन्ही देशांतील कार कंपन्यांना संपूर्ण एकात्मिक टचस्क्रीन नियंत्रणाचा अनुभव देणारी यंत्रणा तयार करायची आहे.