अमोल परांजपे
रशियाविरोधी युद्धात एकीकडे युक्रेनला सामरिक मदत करताना अमेरिका आणि युरोपने रशियाचे पंख छाटण्यासाठी रणनीती तयार केली आहे. रशियावर प्रचंड आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र त्यानंतरही रशियाने युक्रेनवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. किंबहुना पाश्चिमात्य देश जेव्हा-जेव्हा नवे निर्बंध लादतात, तेव्हा-तेव्हा युक्रेनच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडतो. आता अमेरिकेने रशियातील एका गटाला लक्ष्य केले आहे. या गटाचे नाव आहे ‘वॅग्नर ग्रुप’…
रशियातील वॅग्नर ग्रुप म्हणजे नेमके काय आहे?
सोप्या शब्दांत सांगायचे तर ही एक ‘खासगी लष्करी संघटना’ आहे. दिमित्री व्हॅलेरिएविच उतकिन हे माजी रशियन लष्करी अधिकारी या संघटनेचे संस्थापक असल्याचे मानले जाते. पहिल्या आणि दुसऱ्या चेचेन युद्धात त्यांनी लष्कराच्या तुकड्यांचे नेतृत्व केले होते. वॅग्नर ग्रुप हा नाझीवादी, श्वेतवर्णवादी आणि अतिउजवी अतिरेकी विचारसरणी असल्याचे मानले जाते. स्वतः उतकिन हे अत्यंत उजव्या आणि कडव्या राष्ट्रवादी विचारसरणीचे होते. वॅग्नर या नावाचे मूळ काय हे कुणालाच माहीत नसले तरी एका गृहितकानुसार, हिटलरचा आवडता संगीतकार रिचर्ड वॅग्नर याच्यावरून हे नाव ठेवलेले असू शकते.
हा गट सर्वप्रथम चर्चेत केव्हा आला?
२०१४ साली युक्रेनकडून क्रिमियाचा घास घेण्यासाठी वॅग्नर गटाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मदत केली. त्यानंतर युक्रेनच्या डोनबास प्रांतातील फुटीरतावादी गटांना ही संघटना लष्करी आणि वेळप्रसंगी आर्थिक मदत करते. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही भागांमध्ये याच वॅग्नर गटाचे सैनिक लढा देत आहेत. हा गट म्हणजे पुतिन यांचे ‘खासगी लष्कर’ असल्याचे मानले जाते. ज्या गोष्टी रशियाचे लष्कर करू शकत नाही, त्या वॅग्नर ग्रुपकरवी करून घेतल्या जात असल्याचे बोलले जाते. म्हणजे युद्धकैद्यांचा छळ करणे, अतिरेकी गटांना मदत करणे आदी कामे वॅग्नरचे सैनिक बिनबोभाट करत असतात. अलिकडेच बाखमुत शहरासाठी रशिया-युक्रेन सैन्यांच्या धुमश्चक्रीमध्ये वॅग्नर गटही गुंतल्याचे समोर आले आहे.
विश्लेषण : सिंधू जलवाटप करार; भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवण्यामागचे कारण काय?
वॅग्नर ग्रुपवर अमेरिकेने लादलेले निर्बंध कोणते?
अमेरिकेने या गटाचा समावेश नुकताच ‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनां’च्या यादीमध्ये केला आहे. “रशिया-युक्रेन युद्धामध्ये वॅग्नर ग्रुपचे लोक गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतले आहेत. सामुदायिक हत्याकांड, बलात्कार, मुलांचे अपहरण यासारखे गुन्हे केले जात आहेत. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक (सीएआर), माली येथेही या गटाने अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत,” असे अमेरिकेच्या अर्थखात्याने म्हटले आहे. या यादीत समावेश करणे हे वॅग्नर गटाच्या आर्थिक आणि लष्करी कारवायांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. केवळ वॅग्नर ग्रुपच नव्हे, तर त्यांना मदत करणाऱ्या अन्य कंपन्या, संस्थांवरही निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या रडारवर असलेले ‘वॅग्नर’चे मदतनीस कोण?
एखादी एवढी मोठी लष्करी संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते, तेव्हा ते एकट्याच्या बळावर करणे शक्य नाही. वॅग्नर ग्रुपच्या पापामध्ये असे अनेक वाटेकरी आहेत. अमेरिकेने आता त्यांच्या नाड्याही आवळायला सुरूवात केली आहे. रशियास्थित तंत्रज्ञान कंपनी ‘टेरा टेक’, चीनमधील ‘चांग्शा तियांयी स्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी रीसर्च इन्स्टिट्यूट कंपनी (स्पेसेटी चायना)’ यांच्यावरही अमेरिकेने निर्बंध आणले आहेत. स्पेसेटी चायना कंपनीने वॅग्नर ग्रुपला युक्रेनमधील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांची उपग्रह छायाचित्रे पुरविल्याचा आरोप आहे.
अमेरिकेच्या निर्बंधांवर वॅग्नर ग्रुप, रशियाची प्रतिक्रिया काय?
रशियन उद्योगपती आणि वॅग्नर ग्रुपच्या संस्थापकांपैकी एक येव्गेनी प्रिगोझिन यांनी अमेरिकेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिकेच्या दाव्यांची त्यांनी एका अर्थी खिल्ली उडवली आहे. वॅग्नर ग्रुपच्या कथित गुन्ह्यांवर आम्ही अंतर्गत चौकशी केली. त्यात कोणतेही गुन्हेगारी कृत्य केल्याचे आढळून आलेले नाही. वॅग्नरच्या गुन्ह्यांबाबत कुणाकडे काही माहिती असेल, तर ती त्यांनी आमच्याकडे द्यावी किंवा माध्यमांमध्ये उघड करावी. असे झाल्यास आमच्याबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या अमेरिकन सहकाऱ्यांना मदत करू, असे प्रिगोझिन म्हणाले. तर क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही अमेरिकेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. कोणतेही पुरावे नाहीत, कुणाकडूनही पुष्टी नाही, काहीही उजेडात आणलेले नाही असा पेस्कोव्ह यांचा दावा आहे.
वॅग्नरवरील निर्बंधांमुळे युद्धात काय फरक पडेल?
खरे म्हणजे अमेरिकेने वॅग्नर ग्रुपवर लादलेले हे पहिलेच निर्बंध नाहीत. यापूर्वीही अनेक मार्गांनी पाश्चिमात्य देशांनी या गटाचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र खुद्द पुतिन यांचाच या गटाला पाठिंबा असल्यामुळे आणि रशियाच्या लष्कराशी हा गट या ना त्या मार्गाने जोडलेला असल्यामुळे लगेचच त्यांचा कारवाया थांबतील ही शक्यता कमी आहे. अन्य देशांतील सरकार किंवा खासगी कंपन्यांकडून कंत्राटे मिळविण्यात वॅग्नर गटाला कदाचित थोडी अडचण येईल, मात्र युक्रेनमधील त्यांचे कारनामे सध्यातरी सुरूच राहणार आहेत. त्यावर लगेच उपाय अमेरिकेला सापडला आहे, असे नाही.
amol.paranjpe@expressindia.com