तापमानात घट झाल्यावर साधारणपणे थंडी, ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये ‘वॉकिंग न्युमोनिया’ किंवा ‘मायकोप्लाझ्मा न्युमोनिया’च्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या लहान मुले आणि ४० पेक्षा अधिक वयाच्या प्रौढांमध्ये याची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जगभरात २०२३ पासून ‘मायकोप्लाझ्मा न्युमोनिया’ किंवा ‘वॉकिंग न्युमोनिया’च्या प्रादुर्भावात वाढ होत आहे.
वॉकिंग न्यूमोनिया म्हणजे काय?
‘वॉकिंग न्युमोनिया’ हा ‘एटिपिकल न्युमोनिया’ या नावानेही ओळखला जातो. तो ‘मायकोप्लाझ्मा न्युमोनिया’ नावाच्या विषाणुंमुळे होतो. ‘वॉकिंग न्युमोनिया’ हा न्युमोनियाचा सौम्य प्रकार आहे. हा फुप्फुसाचा संसर्ग असून ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये आढळतो. याची लक्षणे श्वसनाच्या अन्य आजारांसारखीच असतात. ‘वॉकिंग न्युमोनिया’ झालेल्या रुग्णांना सतत सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे ‘वॉकिंग न्युमोनिया’ झाला की नाही हे कळणे अवघड असते. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. मात्र संसर्ग वाढलेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. हे प्रमाण एकूण रुग्णांपैकी एक टक्का असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘वॉकिंग न्युमोनिया’वर नेहमीच्या प्रतिजैविकांद्वारे उपचार करता येत नाहीत.
हेही वाचा >>> विश्लेषण : तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय का झाले?
न्युमोनियाचे प्रकार
न्युमोनियाचे वेगवेगळे प्रकार असून प्रत्येक प्रकाराची लक्षणे वेगवेगळी आहेत. जीवाणूजन्य, विषाणूजन्य आणि बुरशीजन्य प्रकार आहेत. प्रौढांना साधारणपणे जीवाणूंमुळे न्युमोनिया होतो. न्युमोनिया झालेली व्यक्ती जेव्हा खोकते किंवा शिंकते त्यावेळी त्याच्या नाक किंवा तोंडाद्वारे बाहेर पडणाऱ्या जीवाणूंमुळे प्रादुर्भाव होतो. ‘वॉकिंग न्युमोनिया’ हा जीवाणूजन्य न्युमोनियाच्या प्रकारांपैकी एक. त्याची लक्षणे सहसा सौम्य असतात. या प्रकाराचे निदान सामान्यतः शारीरिक किंवा छातीचे क्ष किरण केल्यानंतर होते. सामान्य प्रकारच्या न्युमोनियामध्ये क्ष किरण काढल्यानंतर फुप्फुसाचा प्रभावित झालेला भाग निदर्शनास येतो. परंतु ‘वॉकिंग न्युमोनिया’ झालेल्या व्यक्तीच्या प्रभावित झालेल्या फुप्फुसाच्या ठरावीक भागात ठिपके दिसतात. विषाणू हे न्युमोनियाचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहेत. सर्दी, फ्लू आणि इन्फ्लूएंझा, करोनासारख्या काही विषाणूंमुळे हा रोग होतो. बुरशीमुळेही न्युमोनिया होतो. निरोगी व्यक्तीला बुरशीजन्य न्युमोनिया होण्याची शक्यता नसते. परंतु रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तीला याची लागण लगेच होण्याची शक्यता असते. तसेच विशिष्ट कामे करणाऱ्या नागरिकांना बुरशीजन्य न्युमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. पक्षी, वटवाघुळ किंवा उंदरांच्या विष्ठामुळे शेतकरी, माळी, बांधकामस्थळी काम करणारे कामगार यांना बुरशीजन्य न्युमोनिया होण्याची शक्यता अधिक असते.
हेही वाचा >>> Women in Defence Forces : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये महिलांचं प्रमाण का कमी आहे?
वॉकिंग न्युमोनियाचे चार टप्पे कोणते?
पहिला टप्पा म्हणजे रक्तसंचय, ज्यामध्ये रुग्णाला खोकला आणि थकवा जाणवू शकतो. दुसरा टप्प्या म्हणजे लाल हेपेटायझेशन. यामध्ये लाल आणि पांढऱ्या रक्त पेशी जीवाणूंच्या संसर्गामुळे वाढतात. त्यामुळे फुप्फुस लाल होते. तिसरा टप्पा म्हणजे राखाडी हेपेटायझेशन, शरीरामधील लाल रक्तपेशींच्या नुकसानामुळे फुप्फुसांचा रंग राखाडी होतो. चौथा टप्पा म्हणजे रिझोल्यूशन. यामध्ये श्वसनमार्ग सुधारतात आणि जळजळ कमी होते, ही अवस्था म्हणजे रुग्णाला बरे वाटू लागते.
‘वॉकिंग न्युमोनिया’ कोणाला होऊ शकतो
वॉकिंग न्युमोनिया सामान्यतः मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया नावाच्या जीवाणूमुळे होतो. मायकोप्लाझ्मामुळे ‘वॉकिंग न्युमोनिया’ लहान मुले, लष्करी प्रशिक्षणात व्यग्र व्यक्ती आणि तरुणांना होतो. तसेच गर्दीच्या ठिकाणी राहणारे व काम करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्यास त्याचा प्रसार वेगाने होतो.
हेही वाचा >>> विश्लेषण : बँक खातेदारांना आता चार नॉमिनेशन्सची मुभा… नवीन बँकिंग कायद्यात आणखी काय बदल?
‘वॉकिंग न्युमोनिया’ची लक्षणे
‘वॉकिंग न्युमोनिया’ शिंकणे किंवा खोकल्यामुळे पसरतो. ‘वॉकिंग न्युमोनिया’ म्हणजेच मायकोप्लाझ्माच्या संपर्कात आल्यानंतर संबंधित व्यक्तीमध्ये १५ ते २५ दिवसांनी लक्षणे दिसू लागतात आणि हळूहळू २ ते ४ दिवसांत ती गंभीर होतात. ‘वॉकिंग न्युमोनिया’ झालेल्या व्यक्तीला दीर्घ श्वास घेताना छातीत दुखते, खोकला, ताप आणि थंडी वाजते, घसा खवखवतो, डोकेदुखी, थकवा, तसेच काही जणांना कानात संसर्ग, अशक्तपणा किंवा त्वचेवर पुरळ यांसारखी लक्षणे आढळतात. तसेच ‘वॉकिंग न्युमोनिया’ बरा झाल्यानंतर काही प्रमाणात अशक्तपणा येतो. ही लक्षणे एक ते चार आठवडे टिकू शकतात.
कोणती औषधे दिली जातात?
‘वॉकिंग न्युमोनिया’ हा उपचारांशिवाय बरा होतो. परंतु त्याची लक्षणे जाण्यास जास्त वेळ लागू शकतो. लक्षणे तीव्र झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. जीवाणूंमुळे न्युमोनिया झाल्यास डॉक्टर प्रतिजैविक देऊ शकतात. औषधांमध्ये झिथ्रोमॅक्स किंवा बियाक्सिन, मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स किंवा टेट्रासाइक्लिन प्रौढ आणि मुलांसाठी वापरण्यात येते. त्याचप्रमाणे फ्लुरोक्विनोलोन या औषधाचाही त्यात समावेश असू शकतो. विषाणूमुळे न्युमोनिया झाला असल्यास नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स तापावर मात करू शकतात. मात्र ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य ठरेल. शिवाय रुग्णांनी पाणी आणि विश्रांती भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते.