पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे स्वरूप पाहता पाकिस्तानी लष्कराच्या सक्रिय पाठबळाशिवाय तो अशक्य असल्याचे स्पष्टपणे दिसते. या हल्ल्याच्या काही दिवस आधीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी जम्मू-काश्मीरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेव्हा त्यांनी जाहीर केलेले मनसुबे पहलगाम हल्ल्याशी तंतोतंत जुळतात. लष्करप्रमुख पदाचा कार्यकाळ वाढवत मुनीर यांनी पाकिस्तानातील आपली पकड मजबूत केली. आता भारताविरोधात षडयंत्राची परंपरा ते पुढे नेत आहेत.
मुनीर यांची नियुक्ती कधी? कशी ?
पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख हे इतके प्रभावशाली पद आहे की, देशांतर्गत राजकीय उलथापालथीत त्यांची अंतिम भूमिका असते. पाकिस्तानी लष्कराच्या या सर्वोच्च पदावर नोव्हेंबर २०२२ मध्ये असिम मुनीर यांची नियुक्ती झाली. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) या गुप्तहेर संस्थेचे नेतृत्व त्यांनी केले होते. या संस्थेचे सर्वात कमी काळ सेवा करणारे ते प्रमुख होते. तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान सरकारशी मतभेद झाल्यानंतर आठ महिन्यांत आयएसआयमधूून त्यांची उचलबांगडी झाली होती. पुढील काळात देशांतर्गत परिस्थिती बदलली. लष्कराशी मतभेद झालेल्या खान यांना पायउतार व्हावे लागले. नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मावळते लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या जागी लेफ्टनंट जनरल असिम मुनीर यांची नियुक्ती केली.
लष्करी कारकीर्द
मंगला येथील ऑफिसर्स प्रशिक्षण केंद्रातून मुनीर यांनी लष्करी सेवेत प्रवेश केला होता. फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. फोर्स कमांड नॉर्दर्न कमांड विभागात ब्रिगेडिअर असताना ते जनरल बाजवा यांचे जवळचे सहकारी बनले. परंतु, सर्वोच्च गुप्तचर अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ कमी होता. आयएसआयमधून त्यांची गुजरानवाला कोअर कमांडर म्हणून नियुक्ती झाली. मुख्यालयात क्वार्टरमास्टर जनरलची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
आजीवन लष्करप्रमुख?
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने अलीकडेच पाकिस्तान लष्करी कायद्यात घाईघाईत दुरुस्ती केली, ज्याअंतर्गत लष्करप्रमुखांचा कार्यकाळ तीनवरून पाच वर्षांपर्यंत वाढला. या बदलाने केवळ लष्करप्रमुखांचा कार्यकाळ वाढला नाही तर, चतुर्थ तारांकित (फोर स्टार) जनरलसाठी निवृत्तीची वयोमर्यादादेखील काढून टाकण्यात आली. यामुळे विद्यमान लष्करप्रमुख मुनीर हे नोव्हेंबर २०२५ मध्ये निवृत्त होणार होते. त्यांना २०२७ पर्यंत अथवा पुढील मुदतवाढ मिळाल्यास त्याहून अधिक काळ सेवा बजावता येणार आहे. मुनीर यांची पाकिस्तानवरील पकड मजबूत झाली. त्यांच्यासारखी व्यक्ती प्रदीर्घ काळ पाकिस्तानच्या लष्करप्रमुख पदावर ठाण मांडून बसणे, हे भारताच्या दृष्टीने हितावह नाही.
वादग्रस्त भाषण
आठवडाभरापूर्वी इस्लामाबाद येथे आयोजित परदेशस्थ पाकिस्तानी व्यावसायिकांच्या संमेलनात लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले होते. काश्मीरबाबत आमची भूमिका स्पष्ट आहेे. काश्मीर पाकिस्तानची जीवन रेखा असून तेथील बांधवांना सक्रिय पाठबळ देण्याचे त्यांनी सूतोवाच केले होते. आम्ही हिंदुंपेक्षा सर्वार्थाने वेगळे आहोत. आमचा धर्म, रिती-रिवाज, परंपरा आणि विचार वेगळे आहेत. आमची महत्त्वाकांंक्षाही वेगळी आहे. येथूनच द्विराष्ट्राच्या सिद्धांताचा पाया रोवला गेला. आम्ही दोन राष्ट्रे असून एक नाही. आमच्या संस्थापकांनी हा देश तयार करण्यासाठी त्याग आणि संघर्ष केला. त्याचे संरक्षण कसे करायचे, हे आम्हाला ठाऊक असल्याची दर्पोक्ती त्यांनी भारतास उद्देशून केली होती. त्यांचे हे वादग्रस्त भाषण पहलगाम येथील भारतीय पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याच्या योजनेला पाकिस्तानी लष्कराकडून आकार दिल्याचे निदर्शक मानले जाते.
सुरक्षा, परराष्ट्र धोरणावर प्रभाव
पाकिस्तानच्या स्थापनेपासून म्हणजे १९४७ पासून पाकिस्तानी लष्कर देशात अत्यंत प्रभावी शक्ती राहिली आहे. लष्करी बळावर त्यांनी कित्येकदा निवडून आलेली सरकारे उलथवली. आजतागायत सुमारे ३६ वर्षे पाकिस्तान लष्कराने देशावर राज्य केल्याचा इतिहास आहे. लोकनियुक्त राजवटीत महत्त्वाच्या निर्णयात ते पडद्यामागून प्रभाव पाडतात. परराष्ट्र धोरण, सुरक्षा अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रावर पाकिस्तानी लष्कराचे पूर्णत: वर्चस्व आहे. आजवर प्रत्येक पाकिस्तानी लष्करप्रमुखाने भारतविरोध आणि जम्मू-काश्मीरचा प्रश्न तेवत ठेवणे हे एककलमी धोरण ठेवले. खुल्या युद्धात वारंवार पराभव झाल्यामुळे संबंधितांनी छुप्या युद्धास खतपाणी घातले. विद्यमान लष्करप्रमुख असिम मुनीर हेदेखील त्याच मार्गाने वेगाने निघाल्याचे लक्षात येते. पाकिस्तानची एक देश म्हणून आजही पाकिस्तानी लष्कराकडून भूमिका, धोरण निश्चिती होणे हे भारतासाठी तापदायक आहे.
कमकुवत स्थळ कोणी शोधले?
गतवर्षी दहशतवादी कारवायांचा केंद्रबिंदू काश्मीरकडून जम्मूकडे सरकल्याचे अनुमान काढले गेले होते. कारण, अवघ्या चार-पाच महिन्यांत जम्मू भागात अनेक दहशतवादी हल्ले झाले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर जम्मूतून भारतीय सैन्याची मोठी तुकडी चीनच्या सीमेवर तैनात झाली. अशा हालचालींवर पाकिस्तानी लष्कर बारकाईने लक्ष ठेवून असते. जम्मू क्षेत्रातील पोकळीचा लाभ सीमेपलीकडून प्रशिक्षित दहशतवादी पाठवून घेतला गेला. आता काश्मीरमधील पहलगाममधील पोकळी शोधण्यात आली. आधुनिक यंत्रसामग्री, ड्रोन, टेहळणी यंत्रणेशिवाय व्यापक क्षेत्रात अशी कमकुवत ठिकाणे शोधणेही अशक्यच. दहशतवादी हल्ल्यासाठी पहलगाम निवडण्यात पाकिस्तानी लष्कराचीच सक्रिय भूमिका राहिल्याचे लक्षात येते.