सोमवारी (१९ ऑगस्ट) इटलीच्या सिसिलीच्या किनाऱ्यावर हिंसक वादळ येऊन धडकले. वादळाचा तडाखा बसल्याने समुद्रातील एक लक्झरी जहाज बुडाले; ज्यात एकाचा मृत्यू झाला आणि किमान सहा जण बेपत्ता आहेत. तज्ज्ञांनी सांगितले की, ही दुर्घटना समुद्री चक्रीवादळामुळे घडली. त्याला वॉटरस्पाउट, असेही म्हणतात. समुद्रात हे वॉटरस्पाउट नक्की कसे तयार होतात? हल्ली त्यांची संख्या वाढली आहे का? त्यामागील कारण काय? याविषयी जाणून घेऊ.
बुडालेल्या जहाजात मोठ्या उद्योगपतींचा समावेश
१२ प्रवासी आणि १० क्रू सदस्यांसह २२ लोक या जहाजात होते. वादळाच्या तडाख्यामुळे हे जहाज बुडाल्यानंतर काहींना वाचविण्यात यश आले आहे; तर आणखी सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता असणार्यांमध्ये ५९ वर्षीय तंत्रज्ञान उद्योजक माईक लिंच यांचा समावेश आहे. त्यांना ‘ब्रिटिश बिल गेट्स’ म्हणूनही ओळखले जाते, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे. माईक लिंच हे सॉफ्टवेअर कंपनी ‘ऑटोनॉमी’चे संस्थापक आहेत. १९९६ साली या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. डेव्हिड कॅमेरॉन पंतप्रधान असताना माईक लिंच त्यांचे विज्ञान सल्लागार होते. २०११ मध्ये यूएस कंपनी हेवलेट-पॅकार्डची फसवणूक केल्याच्या आरोपातून त्यांना जूनमध्ये मुक्त करण्यात आले. बेपत्ता झालेल्या सहा लोकांमध्ये लिंच यांची मुलगी हॅना लिंच हिचाही समावेश आहे. त्यांची पत्नी अँजेला बाकेरेसला वाचवण्यात यश आले आहे.
हेही वाचा : ताडाचे झाड वाचवणार लोकांचा जीव? ओडिशा सरकारने २० लाख झाडे लावण्याचा निर्णय का घेतला?
वॉटरस्पाउट्स म्हणजे काय?
वॉटरस्पाउट म्हणजे पाण्यावर तयार होणारे हवेचे आणि धुक्याचे चक्रीवादळ. मोठमोठ्या चक्रीवादळांच्या तुलनेत ती कमकुवत असतात. सामान्यत: वॉटरस्पाउट सुमारे पाच ते १० मिनिटांच्या कालावधीपर्यंत टिकू शकतात. वॉटरस्पाउट सुमारे १६५ फूट व्यासाचे असू शकते. या परिस्थितीत वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटर असू शकतो. उष्ण कटिबंधीय पाण्यात वॉटरस्पाउट अधिक सामान्य आहेत; मात्र तरी ते कुठेही दिसू शकतात. जेव्हा हवेत जास्त आर्द्रता आणि तुलनेने उबदार पाण्याचे तापमान असते तेव्हा वॉटरस्पाउट उदभवतात.
वॉटरस्पाउटचे प्रकार कोणकोणते?
सामान्यतः दोन प्रकारचे वॉटरस्पाउट आहेत. पहिले म्हणजे टॉर्नॅडिक वॉटरस्पाउट आणि दुसरे फेअर-वेदर वॉटरस्पाउट. टॉर्नेडिक वॉटरस्पाउट हे वास्तविक चक्रीवादळ असते; जे पाण्यावर तयार होते किंवा जमिनीवरून पाण्यात जाते. “हे चक्रीवादळ गडगडाटी वादळांशी संबंधित आहे आणि त्यांच्याबरोबर अनेकदा जोराचा वारा, गारपीट आणि वारंवार वीज कोसळण्याच्या घटना घडतात,” असे यूएस एजन्सी नॅशनल ओशनिक अॅण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA)च्या अहवालात म्हटले आहे. त्यांचा आकारही तुलनेने मोठा असतो. टॉर्नेडिक वॉटरस्पाउटमध्ये समुद्र रौद्र रूप धारण करतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो.
फेअर-वेदर वॉटरस्पाउट अनुकूल हवामानात तयार होतात. फेअर-वेदर वॉटरस्पाउट अधिक सामान्य आहेत. ते फक्त पाण्यावर तयार होतात. त्यांच्या नावाप्रमाणेच ते अगदी योग्य हवामानात तयार होतात. ते कमी धोकादायक व सहसा लहान असतात. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, माईक लिंच यांच्या जहाजाला धडकलेले वॉटरस्पाउट मोठे आणि विनाशकारी असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा : Kolkata Rape-Murder Case: पॉलिग्राफ चाचणी म्हणजे नक्की काय? कोलकाता प्रकरणात ही चाचणी कशासाठी?
अलीकडच्या वर्षांत त्यांची वारंवारता वाढत आहे का?
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, ”समुद्राचे तापमान जसजसे वाढत आहे, तसतशी या घटनांची वारंवारता वाढत आहे. बार्सिलोना युनिव्हर्सिटीने बॅलेरिक बेटांसभोवतालच्या वॉटरस्पाउटचा अभ्यास केल्यावर असे आढळले की, जेव्हा समुद्राचा पृष्ठभाग खूप उबदार असतो तेव्हा त्यांची शक्यता जास्त असते. सध्या सिसिली प्रदेशातील समुद्राचा पृष्ठभाग १९९०-२०२० च्या सरासरीपेक्षा २.५ ते ३ अंश सेल्सिअसने जास्त गरम आहे.”